बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र ! अमृताहुनी गोड असलेल्या माझ्या मराठी भाषेची सेवा करण्यासाठी ब्लॉगचे माध्यम लाभले आहे. मराठी भाषेला समृध्द करण्यासाठी आमचाही खारीचा वाटा......
Monday, May 21, 2012
Sunday, September 16, 2007
राधा ही बावरी
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
अताशा असे हे मला काय होते......
|
अताशा असे हे मला काय होते
कोण्याकाळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येतो॥१॥
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते पात हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्यांचा॥२॥
असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून रोज जातो बूडूनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा॥३॥
न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे त्ययाचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासात
न कुठले नकाशे न अनुमान काही॥४॥
कशी ही अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावे, कुणी उत्तरावे
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरवे॥५॥
अताशा असे हे मला काय होते......
Saturday, September 15, 2007
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी....

लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती
इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती
सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती
गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती
Sunday, September 9, 2007
आठवतो तो नदी किनारा..........

आठवतो तो नदी किनारा जिथे
तू मला भेटायला यायचीस
तू मला मिठीत घ्यायचीस
आठवतो तो नदी किनारा जिथे
हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो
आठवतो तो नदी किनारा जिथे
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली
आठवतो तो नदी किनारा जिथे
वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
एक क्षितिजरेष दिसायची
मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या घराची
वीट मात्र ढासळली नाही..........
Friday, September 7, 2007
Sunday, September 2, 2007
Saturday, September 1, 2007
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नळाखाली हात धरुनच पाणी प्यायचय,
कसाबसा डबा संपवत..तिखट-मीठ लावलेल्या
चिंचा-बोरं-पेरू-काकडी सगळं खायचय,
सायकलच्या चाकाला स्टंप धरुन
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
घंटा व्हायची वाट बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करुन
सायकलची रेस लावुनच घरी पोचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या
दोन तारांमधुन निघुन बाहेर पळायचय,
ती पळुन जायची मजा अनुभवायला ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पण
हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचय,
आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी
त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
कितीही जड असू दे.. जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचंच ओझं पाठिवर वागवायचय,
कितीही उकडत असू दे.. वातानुकुलित ऑफिसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडुन बसायचय,
कितीही तुटका असू दे... ऑफिसातल्या एकट्या खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर ३ मित्रांनी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंय,
तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
काही नवे वाहतुकीचे नियम......
नियमाचे नाव - Landing Gears
लक्षण - साडी नेसलेल्या काकू Kinetic Honda, Honda Activa यासारख्या एखाद्या वाहनावरुन तुमच्या पासुन १० फुटाच्या पट्ट्यात चालल्या आहेत.
नियम - ताबडतोब जागच्या जागी थांबा आणि त्या काकू अद्रुश्य होइपर्यंत जागचे हलु नका.
विशेष दंडपात्र गुन्हा - काकुंना overtake करण्याचा प्रयत्न करणे, त्याना side मागण्यासाठी horn वाजवणे इ.
संदर्भासह स्पष्टीकरण - विमान land होताना त्याचे Landing Gears जसे बाहेर येतात तसे गाडी चालवताना काकुंचे दोन्ही पाय गाडीच्या बाजुला येउन जमीनीला घासत असतात, आणि तशाच अवस्थेत त्या ४०-५० कि.मी. प्रति तास या वेगाने त्या गाडी चालवत असतात. जवळपास एखादा चौक असल्यास त्यांनी केलेल्या हातवार्यांवरुन त्या ज्या दिशेला जातील असं वाटत असेल त्या दिशेला त्या जातीलंच असं नाही. मी एकदा दुपारी एका रिकाम्या रस्त्यावरुन जात असताना अशाच एका काकुंनी चौकात आल्यावर डाविकडला indicator दिला, उजवीकडे हात दाखवला आणि त्या सरळ निघुन गेल्या !!!!!!!!!!
त्यांना overtake करायला तुम्ही speed वाढवायला आणि रस्त्याच्या बाजुला असलेल्या हातगाडीवरची भाजी बघुन "अय्या! किती छान रताळी" असं म्हणत मागचा-पुढचा (विशेषतः मागचा) काहीही विचार न करता त्यांनी ब्रेक दाबायला एकच वेळ असू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्यांना side मागायला horn वगैरे वाजवलात तर त्या आवाजाने दचकुन त्या आपल्याच गाडिवर पडतात. "kinetic वरच्या काकू" यापेक्षा धोकादायक गोष्ट पुण्याच्या रस्त्यावर शोधुन सापडणार नाही (नाही... मोटारसायकल वरील मुलगी देखील नाही)
नियमाचे नाव - Godzilla
लक्षण - एखादी मुलगी Indigo, Esteem, Scorpio (!!) यासारख्या एखाद्या मोठ्या वाहनातुन तुमच्या पासुन १०० फुटाच्या पट्ट्यात चालली आहे.
नियम - Godzilla अथवा King Kong यासारख्या सिनेमात त्या महाकाय प्राण्याला पाहिल्यावर लोक जसे पळत सुटतात तसा आपला जीव मुठीत धरुन वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत सुटा. (पळताना माफक प्रमाणात आरडा-ओरडा केलात तरी चालेल.) ती गाडी कधी, कशी, कोणाच्या अंगावर येइल काही सांगता येत नाही.
विशेष दंडपात्र गुन्हा - ती मुलगी जर आपल्या वाहनाच्या मागे असेल आणि horn वगैरे वाजवत असेल तर ताबडतोब side द्या आणि "आज आपल्याला शिर सलामत तो पगडी पचास किंवा जान बची तो लाखो पाये... अशा म्हणींचा प्रत्यय आला" अशी मनाची समजुत घालुन घ्या.
नियमाचे नाव - आजोबा crossing
लक्षण - ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आजोबा तुमच्या समोर रस्ता cross करत आहेत.
नियम - ताबडतोब जागच्या जागी थांबा आणि एखाद्या सुजाण नागरिकाप्रमाणे आपल्या मागुन येणार्या लोकांना देखिल ओरडुन ... नाहितर वेड्यासारखे हातवारे करुन संभाव्य धोक्याची जाणिव करुन द्या. कारण आजोबांना जर रस्ता cross करायची लहर आली तर ते " मला आता रस्ता cross करायचा आहे आणि तो मी करणारच" या दृढनिश्चयाने ते आपले दोन्ही हात उंचावुन रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या वाहनांना " थांबा" असा इशारा करुन बाकी कसलिही पर्वा न करता चालायला लागतात .. मग त्या निश्चयापुढे आपल्यासारख्या " आज दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा/क़ॉफी प्यायची नाही" असला साधा निश्चय पाळता न येणार्या पामरांची काय कथा?
विशेष दंडपात्र गुन्हा -गाडी आजोबांच्या फार जवळ नेऊन थांबवणे. असे केल्यास किमान अर्धा तास रस्त्याच्या कडेला रणरणत्या उन्हात उभे राहुन " आजच्या पिढीचं काय चुकतं" या विषयावरिल व्याख्यान ऐकण्याची तयारी ठेवा.
सध्या एवढ्या नियमांचे नीट पालन करा. दुरदर्शन वर सांगतात ते लक्षात ठेवा ..... " मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" , " गाडी नीट चालवा, घरी कोणितरी तुमची वाट पाहत आहे" " दुर्घटनासे देर भली" इत्यादी.
आपलाच एक शुभचिंतक (आणि समदुःखी वाहनचालक)
ती ५ मिनीटं !

"हो!! उठतोय, फक्त ५ मिनीट झोपू दे"
हे माझं रोज झोपेतुन उठतानाचं पेटंट वाक्यं. अगदी लहानपणापासुनचं. त्या शेवटच्या ५ मिनीटांच्या झोपेसाठी मी खुप पुर्वीपासुन झगडत आलो आहे. खरं तर या ५ मिनीटांच्या झोपेवरुनच तुमची झोप पूर्ण होते का नाही ते ठरत असतं. आदल्या रात्री तुम्ही किती वेळ झोपता याशी त्याचा काही संबंध नाही. तुम्ही ४ तास झोपा नाहीतर १०, झोप पूर्ण की अपूर्ण ते या ५ मिनीटानी ठरतं. ही ५ मिनीटांची झोप पुरणपोळीवर घेतलेल्या तुपासारखी असते, पुरणपोळी कितीही चांगली झाली तरी त्याची चव तुपाशिवाय अपूर्णच, किंबहुनी तुपाशिवाय खाल्ली तर पोळी बाधतेच.
ही ५ मिनीटं तुम्हाला मिळाली तर त्या दिवसा सारखा शुभदिवस कुठला नाही. दिवसभर तुमचा मुड प्रसन्न राहतो, सारखं एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं, सगळ्यांशी (हो! बॉसशी सुद्धा) चांगलं बोलावं आणि वागावसं वाटतं, रस्त्यावरुन जातांना तो ओलांडू पाहणार्या आजींना मदत केली जाते, अहो एवढंच कशाला ? चालता चालता गुणगुणत असलेल्या गाण्यावर एखादी मस्त dance step आपल्याला कधी जमुन जाते हे कळत पण नाही. थोडक्यात म्हणजे एखाद्या "super fresh" टुथपेस्टच्या जाहिरातितल्या व्यक्तिसारखा आपला दिवस जातो. आता अशा दिवसांचे फायदे किती आहेत बघा. आपला मुड चांगला असल्यामुळे खाणं-पिणं छान असतं,त्यामुळे तब्येत चांगली राहते... अगदी बी.पी. का काय म्हणतात ते पण नॉर्मल राहतं, गुणगुणण्यामुळे गाण्याचा रियाज होतो. बॉसशी चांगलं वागल्यामुळे promotion चे चान्सेस वाढतात. आजींना मदत केल्याबद्दल थोडं पुण्य पदरात पडतं. थोडक्यात प्रगतिच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होते.
याविरुद्ध जर ही ५ मिनीटं आपल्याला मिळाली नाही तर आपण दिवसभर चिडचिड करत असतो. रस्त्यावरुन जाताना कोणी मधे आलं तर त्याच्या अंगावर खेकसतो आणि त्याचे शिव्याशाप पदरात पाडुन घेतो. ऑफिसात बॉसशी भांडण करुन आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेतो. अशा दिवशी साधा ताकभात खाल्ला तरी तो घशाशी येउन acidity होते.
आता हे पाहिल्यावर प्रगतिचा मूलमंत्र का काय तो सापडला असं तुम्हाला वाटेल. पण हे सगळं इतकं सोपं असतं तर ना!
कुठलीही चांगली गोष्ट सांगितली की त्याचे विरोधक तयारच असतात. लोकांचं (विशेषतः आयांचं) या ५ मिनीटांशी इतकं वाकडं का असतं काय माहित. काही लोक त्याला उगाचच मनोनिग्रहाचे मापदंड लावतात. "५ वाजता ठरलं म्हणजे ५ वाजताच उठायचं, ५ वाजुन ५ मिनीटांनी नाही" असले काहीतरी अघोरी विचार असतात त्यांचे. आणि ५ ला म्हणजे ५ लाच उठुन हे करतात काय? तर कुठे टेकड्याच चढ. नाहीतर सगळे एका ठिकाणी जमुन वेगवेगळ्या स्वरात हसतंच बस वगैरे वगैरे. अरे छान अजुन थोडा वेळ लोळावं, घरी दात न घासता पण चहा मिळत असेल तर तो प्यावा, सकाळचा एखादा (इतरांनी गायलेला) राग ऐकावा. कशाला जीवाला एवढे कष्ट?
आयांचं वेगळंच काहीतरी असतं. त्यांनी मारलेल्या पहिल्या हाकेत आपण उठलो नाही तर तो त्यांना त्यांचा नैतिक पराभव वाटतो. मग चिडुन त्या आपल्याला उठवतातच. सुटीच्या दिवशी "आत्ता उठ, नंतर दुपारी हवा तेवढा वेळ झोप" असलं काहीतरी बिनबुडाचं विधान करतात. अरे! दुपारी कसलं झोप? "जो बुंद से गयी हौद से नही आती! " अशी म्हण मला फेकाविशी वाटते. पण तो पहिला "जोSS" म्हणताना मला मोठ्ठी जांभई येते आणि त्याचा फायदा घेउन आई तिथुन निघुन जाते. कसं आहे, ५ मिनिटांची किंमत काय आहे हे ती ५ मिनीटं कधीची आहेत यावर अवलंबुन असतं. कडकडुन भुक लागलेली असतांना जेवण मिळण्यासाठी लागलेली ५ मिनीट आणि आवडीचं पोटभर जेवण झाल्यावर थोडीशी पण हालचाल न करता जाणारी ५ मिनीट यात काही फरक आहे का नाही?
असो! कधी ही ५ मिनीटं मिळतात तर कधी नाही. त्यांच्यासाठी रोजचा होणारा झगडा ही पण त्यातलीच मजा. कधी आपण झोपावं आणि कधी आईला आपल्याला उठवल्याचं समाधान मिळू द्यावं ... तिनं केलेली दुधीभोपळ्याची भाजी आवडत नसतांनाही आपण खातो कारण उरलेल्या अर्ध्या भोपळ्याचा उद्या ती हलवा करणार असते ... तसं.
Sunday, August 19, 2007
तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर
मटण सौ रुपय्या किलो, सौ रुपय्या किलो, आपली संपुर्ण बत्तीसी विस्कारुन, दुकानदाराने भाव सांगितला. त्याचे बत्तीस ही दात सोन्याचे होते. झाले दोघांची लग्गालग्गी, गुद्दादुद्दी सुरु झाली. भांडण सरपंच बाई पर्यंत पोहोचले. दोघांचे म्हणणे ऐकल्या नंतर बाईंनी आपला फैसला सुनावला.
मान उजवीकडे वळवुन भाऊरावांकडे बघुन त्या म्हणाल्या तुम्हारा ही बराबर. मग हळुवारपणे मान डावी कडे वळवुन मटणवाल्याला म्हणल्या तुम्हाराभी बराबर.
सरपंचबाईच्या कानात भल्यामोठाल्या हिऱ्याच्या कुडी होत्या.
सध्या महाराष्टात दोन राजकीय पक्षातील युती तोडण्या / रहाण्या वरुन होण्याऱ्या कुरबुरीवरुन ,युक्तीवादाबद्द्ल ही असेच म्हणावेसे वाटते. तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर
आम्हांस आलेले (प्रेम)पत्रक...

माझ्या खवचट खेचरा,
गेले चार-पाच दिवस तू कोठे उलथला होतास? माझा फोनही घेत नव्हतास! स्वतःला उद्धव ठाकरे समजतोस की काय? लक्षात ठेव, आपली युती अशी नाही तोडू देणार मी! गेल्याच महिन्यात वडाच्या फांदीला फेऱ्या मारून तुला सात जन्म मागून घेतला आहे. या महिन्यातही बरीच व्रते-उद्यापने, उपासतापास येतात. ते "सकाळ'मध्ये साग्रसंगीत येईलच. त्यानुसार सर्व काही यथासांग करण्याचे मी ठरविलेच आहे. तेव्हा तुझी सुटका नाही!!
माझ्या उचलखोर उचापत्या, "सकाळ'मध्ये यंदा श्रावण अतिशय उत्साहाने साजरा करणार आहेत. तेव्हा "सकाळ'वाले "व्रत'स्थ महिलांचे, मंगळागौर जागविणाऱ्या भगिनींचे, उपवास करणाऱ्या पुरंध्रींचे फोटो छापणार आहेत काय, याचीही जरा चौकशी करून ठेव. छापणार असतील, तर नऊवारी साडीची सोय आताच करून ठेवलेली बरी. तुला आठवते? गेल्यावर्षी आपण दोघे मिळून अख्खे हिंदमाता फिरलो, तरी नऊवारी मिळाली नव्हती. तेव्हा मटामध्ये फोटो छापून येत होते! यंदा तरी तू माझा फोटो पेपरात छापून आणणार ना? हवे तर ब्लॉकचे पैसे देऊ आपण त्यांना!! असो.
पण तू खरेच कुठे गेला होतास? तुझ्या कचेरीतले लोक म्हणतात, की तुला पत्रकारांचा एड्स झालाय! - ऍक्वायर्ड इंटेलिजन्स डिफिशियन्सी सिंड्रोम!! माझ्या विसविशीत विसोबा, तुझ्याबाबतचे हे निदान तर मी मागेच केले होते! खरे तर मराठी पेपरांत हा रोग आता बराच पसरल्याचे दिसत आहे. या रोगाचे गावठी नाव "बनचुके' असे असल्याचे म्हणतात. सतत नव्या गोष्टींना नावे ठेवायची, नवे तंत्रज्ञान, नव्या पद्धती यांना नाके मुरडायची अशी काही या रोगाची लक्षणे आहेत. तुझ्या बोलण्यातून, लिहिण्यातून ती सहज दिसतात. नव्यातील चांगल्या गोष्टींचे स्वागत करायला जितक्या लवकर शिकाल, तितके बरे! नाही तर मग तुमचीच एक मोठी विसंगती होऊन जाते. आणि मग लोक तुम्हांला हसतात, तर तुम्हांला वाटते की तुमच्या विनोदांना हसतात! एड्समध्ये असेही भ्रम होतातच म्हणा!
माझ्या रागीट रेडक्या, तुला माझा राग तर नाही ना आला? रागावू नकोस रे! रागावलास, की तू सामनाच्या ले-आऊटसारखा दिसतोस! अरे, अलीकडे तू सामना पाहिलास का? राऊत साहेब रजेवर असून, भारतीताई त्याचे संपादन करीत आहेत, असे काहीसे झाले आहे काय? असो. मी रागावण्याबद्दल बोलत होते. तू माझ्यावर रागावणार नाहीस याची खात्री असल्यानेच खरे तर मी एवढे स्पष्ट लिहित आहे. अन्यथा मला काय अग्रलेख लिहिता येत नाहीत? अग्रलेख म्हणजे लोकसत्ताचे सोडून बरे का! नाही तर तुझा पारा एकदम चढायचा! तुम्ही केतकरी संप्रदायवाले ना!! पण माझ्या आगाऊ अडाण्या, तुम्ही केतकरांना आता सांगत का नाहीत, की त्यांचे अग्रलेख मुख्य अंकाबाहेर छापत जा म्हणून! कारण अलीकडे त्यांच्या अनेक अग्रलेखांचा आणि मुख्य अंकाचा जणू काही संबंधच नसतो! अग्रलेखातले संपादकीय धोरण वेगळे आणि बातम्यांतले वेगळे असे काही विचित्र चालले आहे. हवे तर याविषयी एकदा कक्काजींशीही बोलून घे! माझे, त्यांचे, श्रीकांतजींचे आणि शुभदाताई चौकरांचे मत अगदी सारखेच असेल!!
असो. खूपच लिहिले. एवढे वाचायचे म्हणजे तुला त्रासच! त्यातच काल गटारी होती. म्हणजे डोके अजून उतरले नसेल! "ती' उतरली तर "ते' उतरणार ना!! तेव्हा येथेच थांबते.
एकट्या तुझीच,
सही
वास नाही ज्या फुलांना..............

वास नाही ज्या फुलांना फक्त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.
चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.
प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.
वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे
नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.
वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.
-बा. भ. बोरकर
Friday, August 10, 2007
पुणेरी मराठी........
पुणेकराकडून पुणेकरांसाठी
Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks
............ .. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .
Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls
.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही
Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first
............ ... ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल .
Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client
............ ... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही .
Avoid speaking in regional languages within the office premises
............ .. गावच्या गप्पा घरी !
Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for
............ ... ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत. गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही .
When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office
............ . शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.
Please keep a check on the noise levels in the pantries
............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत.
पुरुषांची मैत्री.......
कसे ????
असे कसे विचारता ????
कसे ते पाहा.
एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते "अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते"
नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 2० मैत्रिणींना फोन करतो.
ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणी सांगतात.
aft 10 days..........
आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.
तेव्हा तो सांगतो "अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो"
बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 2० मित्रांना फोन करते.
त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता.
and and and
उरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात !!! howzatttt!















