Thursday, July 26, 2007

तुझं माझ्यावर प्रेम आहे का ?

तुझं माझ्यावर प्रेम आहे का ? थोडंसं आवरून
थोडंसं सावरून
आरशापुढं उभी रहा
आणि मग सांग
तुझं माझ्यावर प्रेम आहे का ?

तुझ्या काळ्या केसांकडे पाहू नकोस
तुझ्या गोऱ्या गालांकडे पाहू नकोस
मिचमिचणाऱ्या पापण्यांकडे पाहू नकोस
थरथरणाऱ्या ओठांकडे पाहू नकोस
साऱ्या जगाचं गुपीत सांगणाऱ्या-
तुझ्या डोळ्यांमध्ये बघ
आणि मग सांग
ते आता तुझे राहिलेत का ?

खिडकी पटकन बन्द करून घे
माझी शिटी ऐकू आल्यावर
स्वतःशीच काही तरी बोलून बघ
आणि मग सांग
तुझा तरी आवाज तुला ऐकू येतो का ?


डोळे घट्ट मिटून घे
मी समोर दिसल्यावर
प्रतिमा तयार होईलच माझी
पापण्यांच्या आतल्या बाजूला
ती बन्द डोळ्यांनीच पहा
अगदी नाहीशी होईपर्यन्त .... झाल्यावरही....
आणि मग सांग
मी तुला आवडतो का ?

carrom खेळायला बैस
कुणाच्याही समोर
हात वरपर्यन्त ने
striker सोडल्यावर
तो सावकाश खाली येईल
आता मला सांग
मी तुला आठवतो का ?

पत्ते खेळायला बैस
कुणाशीही
गोटूवर राजा पडेल
तू विचार गोटू कुणाचा ?
सगळे हसतील
तू ही करच हसल्यासारखं
आणि मग सांग
तुला हसू आलं का ?

घरी ये माझ्या
मी दिसणार नाही कुठंच
तू विचार 'नितिन कुठंय'?
कुणीच काही बोलणार नाही
ही कविता तुझ्या हाती देतील
ती तशीच घरी घेऊन जा
वाच...
आणि मग मला सांग
तुझं माझ्यावर प्रेम आहे का ?

भारतीय कला.........

कहाणी ही एका वेडया मनाची.................


वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत:ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहून गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


आता सगळं संपलय,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................


पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या वाटही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................

आज माझं मन मला म्हणालं.............


आज माझं मन मला म्हणालं
चल दोघ सागरतटी जाऊया
ती नसली तर काय झालं
आपण दोघंच प्रेमळलाटी वाहुया
निर्मळ लाटा निरखत बेधुंद गाणी गाऊया

आज माझं मन मला म्हणालं
चल सागरतटी जाऊया
तु गहीरा की हा सागर गहीरा
आज दोघांची परीक्षा घेऊया
रात्रभर थांबुन आपणही
चांदण्याच्या संगतीने लहरी चंद्रावर पहारा देऊया

आज माझं मन मला म्हणालं
चल सागरतटी जाऊया
तुझ्या आसवांची या
लहरींशी झुंज लाऊया
कोण जिंकतय कोण हरतय
आज दोघांची ताकद पाहुया
पाऊस बरसला जरी आता वेदनेचा
घाबरु नकोस तु मैत्रीची वळचण आपण कुठंतरी शोधुया

तो मीच असेल............


आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील

जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला

अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील

मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

Tuesday, July 24, 2007

काटा रुते कुणाला ...

काटा रुते कुणाला
आक्रंदतात कोणी
मज फ़ुल ही रुतावे
हा दैवयोग आहे...
शांताबाई शेळके

दु:ख.............




लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे॥


तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे॥


उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे॥


ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे॥

Monday, July 23, 2007

एक प्रेम कथा


ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र।आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.

ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर।तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवट पर्यंत साथ दिली असती."आणी अचानक एके दिवशी चमत्कार झाला.कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.शेवटी यशस्वी शस्त्रक्रिये नंतर दिला दिसू लागले.सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.तो चक्क आंधळा होता.

तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"

तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला।

त्याने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही।

तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे।"

ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली.

कुणीतरी असावं................

Sunday, July 22, 2007

ॐ गणेशायनम:

मीठी..........


उरली आता फ़क्त..........................


तुझ्या निरोपाला आता खुप वर्ष सरली
तरी वाटे जणू ती गोष्ट कालच घडलेली
थांबलेलो होतो मी तिथेच पण तु पुढे निघालेली
उरली होती तेव्हा फ़क्त स्वप्न मनी लपवलेली
मनाला माझ्या तेव्हा मी खुप समजवले
त्या वेड्या ते कधीच न ऐकले
शेवटी आणलचं त्याने डोळयात पाणी
उरली आता फ़क्त या गाली आसवं, ओघळलेली
भले मिलतील तुला हजार साथी
बदलतीलही उद्या आपल्यातली नाती
उजळतील तुझ्या घरी सुखाच्या पुष्कळ वाती
पण, ठणकेल केव्हा ना केव्हातरी जखम सुकलेली
उरली आता फ़क्त ती जखम काळजातली
स्वप्नही तीच आणि त्याच पुन्हा आठवणी
आशेने पाहत राहीली स्वप्ने वेडी ठरलेली
वेढलंय जणू मला आता असंख्य वेदनांनी
उरली आता फ़क्त रात्र दुखां:नी सजलेली

एक प्रवास मैत्रीचा............


मला अजुन भरपूर जगायचं.......


Saturday, July 21, 2007

अजुन आठवे ती वेळ...

अनुभव गाठीशी जमावा म्हणून केलेल्या नोकर्‍याच कधीकधी आपल्याला काही अविस्मरणीय अनुभव देतात। साडेपाच कधी वाजतायत याकडे डोळे लागलेले असायचे त्या चाकरमानी कालखंडातलीच ही गोष्ट. तेव्हा एका जपानी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मी भाषांतरकार/दुभाषी म्हणून नोकरी करत होते. यंत्रसामुग्री तयार करणारी ती एक इंजिनीयरींग कंपनी होती. साहजिकच एखाद्या फॅक्टरीला असणारी सर्व वैशिष्ट्ये (आणि वर जपानी शिस्त!) तिथेही होती. उदाहरणार्थ सर्व स्टाफला (टेक्निकल असो वा नसो) युनिफॉर्म अनिवार्य असणे, लंचटाईम किंवा शिफ्टची वेळ अधोरेखित करण्यासाठी शाळेसारखी बेल होणे वगैरे वगैरे. एक सकाळी नऊची बेल झाली की मग दुपारी लंच अवरची आणि मग संध्याकाळी पहिली बेल ५:२० ला आणि शेवटची बेल ५:३०ला असा सिलसिला असायचा. (५:२०ची बेल अशासाठी की युनिफॉर्म बदलून घरी जाता यावे म्हणून. यासाठी १० मिनिटे उदार मनाने देण्यात आली होती. पण केवळ ऑफिस ते घर इतक्या अंतरासाठी युनिफॉर्म बदलण्याचा मला प्रचंड कंटाळा यायचा त्यामुळे ५:२०लाच मी सर्वांच्या आधी घरी जायला तयार असायचे. युनिफॉर्म मुळे 'अनेक वर्षे एकाच यत्तेत नांदणार्‍या' प्रजेतलीच मी एक असा सर्वांचा समज होण्याची शक्यता नाकारता येत नसे. पण मला त्याची पर्वा नसायची. (अशीच एक समविचारी मैत्रिण तिथे होती. त्यामुळे या युनिफॉर्म न बदलण्याच्या बाबतीत आमच्या दोघींचं 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना' हे मत ठाम असायचं.)
कंपनीचा प्लांट एमआयडीसीतल्या त्या मोठ्या भूभागावर दिमाखात पसरला होता. आजूबाजूस लांबवर नुसतीच पडीक जमिन होती. पावसाळ्यामध्ये दूरवर दिसणारे निळसर डोंगर धुक्याच्या चादरीतून खुणावायचे तर सभोवतालचं हिरवकंच गवत दिवसेंदिवस उंच आणि दाट वाटायचं. या गवतात 'जनावरं' आहेत इथपासून ते मशिनमध्ये जनावर सापडलं अशा अनेक सुरस कथा ऑफिसमध्ये ऐकल्या होत्या. आजूबाजूचा माहौल पाहता ते अगदीच खोटंही वाटायचं नाही.
ऑफिस ते स्टेशन अशी कंपनीची बस सुविधा होती। येताजाता बसमधून ते मनोहर दर्शन भरभरुन घेता यायचं. या कॉन्ट्रॅक्ट बसेस संध्याकाळी पाच वाजताच गेटपाशी हजर असायच्या. ५:२०पासून एकेकजण यायला सुरुवात व्हायची. बहुतेक वेळेस बसमध्ये प्रथम चढणा्र्‍या मी आणि माझी मैत्रिणच असायचो. सर्वजण साडेपाचपर्यंत आले तर ठीक नाहीतर जे हजर आहेत त्यांना घेऊन बस ठीक ५:३०ला सुटायची. मग कोणी जीव घेऊन धावत येताना दिसला तरी थांबायची नाही. शिस्त म्हणजे शिस्त.

पावसाळ्यातल्या त्यादिवशीसुद्धा नेहेमीप्रमाणे आम्ही बसपाशी आलो। हवेत मस्त गारवा होता. थोडंसं उनही पडलं होतं. त्यामुळे खूपच प्रसन्न वातावरण झालं होतं. आम्ही बसमध्ये आमच्या नेहेमीच्या जागी म्हणजे ड्रायव्हरभाऊंच्या ओळीतल्या पुढून तिसर्‍या सीटवर जाऊन बसलो. आता आमच्या गप्पा चालू झाल्या. बसमधल्या मागील जागांवर आणखी एक-दोघेजण आधीच येऊन बसले होते. साडेपाच वाजत आले तसे सर्वजण भराभर येऊ लागले आणि बस भरत चालली. रोजच्यासारख्या गप्पाटप्पा, हास्यविनोद वगैरे चालू झाले. आता साडेपाचला अर्धाएक मिनिट राहिलं होतं. बसमधल्या शेवटून दुसर्‍या की तिसर्‍या सीटवर बसलेल्या एकाला दुसरा म्हणाला, 'ते तुझ्या डोक्यावर काय आहे रे?'
"कुठे काय?" पहिल्याने डोक्यावर हात फिरवला।
"अरे डोक्यावर म्हणजे वर...त्या रॅकवर...काहीतरी आहे....नीट कळत नाहीये काय आहे ते॥" दुसरा।
"अरे क्लीनरचं फडकं राहिलं असेल" पहिला। आणि त्याने वर पाहिलं. दुसर्‍याची नजरही त्या गोष्टीवरच होती. आणि ती गोष्ट हलली!
दोघांनाही ब्रम्हांड आठवलं। विशेषत: पहिल्याला. कारण त्याच्या डोक्याच्या बरोब्बर वर, बॅग ठेवण्यासाठी जो रॅक असतो त्याच्या दांडीला एक वेटोळं होतं. इतका वेळ वर कोणाचंही लक्ष गेलं नव्हतं. आणि ते वेटोळंही स्तब्ध होतं त्यामुळे कसलीच हालचाल जाणवली नव्हती कोणालाच. बरं ज्याचं आधी लक्ष गेलं त्यालाही ते नक्की काय आहे याचा अर्थबोध न झाल्याने त्याने तसं विचारलं होतं. आता मात्र त्यांची चांगलीच तंतरली.
इकडे तेव्ह्ढ्यात साडेपाच वाजल्याची रखवालदाराने शिट्टी मारली होती आणि ड्रायव्हरभाऊंनी सरसावून बस सुरु केली। बस चालू झाली पण हा गदारोळ पुढच्याच क्षणी कानावर आल्याने ती चार पावलं चालून थांबली. बसचा दरवाजा मगाशीच सर्वजण चढल्यावर क्लीनरने बंद केला होता.
आता आतमध्ये हल्लकल्लोळ माजला होता कारण महाराज पूर्ण जागृतावस्थेत आले होते। बसमधली ड्रायव्हरच्या बाजूची म्हणजे उजवीकडची ओळ, मग मध्ये उभं रहायला जागा आणि मग डावीकडची ओळ, यापैकी डावीकडच्या बॅग ठेवायच्या रॅकवर साप मुक्काम ठोकून होता. एकंदरीत बसमधे वाढलेल्या माणसांच्या वावराने आणि बस सुरु केल्यावर होणार्‍या थरथरीने सापाने वेटोळं सोडून सळसळायला सुरुवात केली. लगेच डाव्या बाजूचे सर्वजण उजव्या बाजूस आले. डोकं वाकवून जो तो स्वत:ला सापापासून दूर ठेवू पहात होता. हो नाहीतर सापाशी दृष्टिभेटच व्हायची! कहर म्हणजे दरवाजा बंद होता. तो उघडायला सुद्धा चटकन कोणी धजावेना. शेवटी धीर करुन क्लीनरने चटकन तो उघडला आणि सर्वांना जरा बरं वाटलं. पण पुढे काय?
मी बसच्या पुढील भागात आणि तेही उजव्या बाजूस असल्याने माझ्यापासून साप तसा दूर होता पण त्याचं दर्शन निश्चितच भीतीदायक होतं। हातभर लांबीचा, बारीक आणि पोपटी रंगाचा साप होता तो. आता तो उपद्रवी की निरुपद्रवी, विषारी की बिनविषारी असल्या शंका तेव्हा येणं शक्यच नव्हतं. तो साप आहे एव्हढी 'फॅक्ट' घाबरायला पुरेशी होती.
पण आता साप दांडीवरुन सरपटत पुढे पुढे आणि अगदी दारापर्यंत येऊन पोचला। म्हणजे माझ्यापासून अगदी एक हात अंतरावर. आता मात्र घाबरगुंडी उडाली. झुरळ, पाल, टोळसदृश जमाती आणि आता हा साप....अशापैकी काहीही माझ्यासमोर असलं की दोन गोष्टी माझ्या मनात कायम असतात. एकतर त्या प्राण्याची नजर फक्त माझ्यावरच आहे ही एक माझी ठाम समजूत असते आणि दुसरं म्हणजे त्याने अचानक माझ्या दिशेने उडी घेतली तर माझं कसं होणार?
आमच्या बरोबरच्या एकीला त्या दर्शनाने अतिप्रभावित झाल्यामुळे चक्कर आली। अशी अजून एखादी पुनरावृत्ती होण्यापेक्षा सर्वांनी आम्हा मुलींना बसच्या मागच्या भागात जायला सांगितलं. एव्हाना बाहेर रखवालदारांना सर्व प्रकार कळला होता. त्यातला एकजण दांडुका घेऊन पुढे दरवाजापाशी आला. साप आता अजूनही रॅकच्या दांडीवरच पण दारापासून अगदीच जवळ होता. सापाला दंडुक्यावर उचलण्याच्या सुरुवातीच्या अनेक प्रयत्नांना सापाने अजिबात दाद दिली नाही. जिभल्या चाटत तो परत दांडीवरुन मागे तर येणार नाही ना अशी शंका मनात दाटत असतानाच रखवालदाराला त्याला दंडुक्यावर उचलणे शक्य झाले आणि एका झटक्यात त्याने त्याला बसबाहेर फेकले.
सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अर्थात त्या परिस्थितीतही विनोदबुद्धी शाबूत असणार्‍या वल्ली तिथे होत्याच. कंपनीतले नागेश, नागराज वगैरे नावांचे मालक बसमध्ये होते त्यांना 'आप इसको आसानीसे पकड पाओगे' वगैरे म्हणत छळणं चाललं होतं. पुढेही अनेक दिवस ऑफिसमध्ये चघळायला विषय चांगला मिळाला होता. सुदैवाने कोणालाही दुखापत वगैरे काहीच झाली नाही. पण राहून राहून मनात एकच विचार यायचा.....नशीब साप वरती, रॅकवर होता. कुठल्या सीटच्या खाली असता तर?!!

मी कधीच रिस्क घेत नाही !!!

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो , तेव्हा बायको स्वंयपाक करत असते।
शेल्फमधल्या भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो
मी चोरपावलाने घरात येतो
माझ्या काळ्या कपाटातुन बाटली काढतो
शिवाजीमहाराज फोटोतुन बघत असतात
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कसलीच रीस्क घेत नाही.............(१)

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो
पटकन एक पेग भरुन घेतो ग्लास धुवुन पुन्हा फळीवर ठेवतो
अर्थातच बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो
शिवाजीमहाराज मंद हसत असतात
स्वयंपाकघरात डोकावुन पाहतो ,बायको कणिकच मळत असते,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी...........................................(२)

मी : "जाधवांच्या मुलीच लग्नाचं जमलं का गं?"
ती : "छे! दानत असेल तर मिळेल ना चांगल स्थळ"

मी पटकन बाहेर येतो , काळ्या कपाटच्या दाराचा आवाज होतो
बाटली मात्र मी हळुच काढतो , वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरुन ग्लास काढतो
पटकन पेगचा आस्वाद घेतो.........बाटली धुवुन मोरीत ठेवतो
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी...........................................(३)

मी : "अर्थात जाधवांच्या मुलीच अजुन काही लग्नाच वय झाल नाही?"
ती : "नाही का ऽ ऽ य ! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीय म्हणे.......!
मी : (आठवुन जीभ चावतो) अच्छा ........ अच्छा.....

मी पुन्हा काळ्या कपाटातुन कणिक काढतो
मात्र कपाटाची जागा अपोआप बदललेली असते
फळीवरुन बाटली काढुन पटकन मोरीत एक पेग भरतो
शिवाजीमहाराज मोठ्याने हसतात ,
फळी कणकेवर ठेवुन शिवाजीचा फोटो धुवुन मी काळ्या कपाटात ठेवतो ,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही
कारण मी...........................................(४)

मी : (चिडुन) " जाधवांना घोडा म्हणतेस?
पुन्हा बोललीस तर जीभच कापुन टाकीन तुझी !"
ती : "उगीच कटकट करु नका।बाहेर जाऊन गप पडा."

मी कणकेतुन बाटली काढतो , काळ्या कपाटात जाऊन एक पेग भरतो
मोरी धुवुन फळीवर ठेवतो , बायको माझ्याकडे बघत हसत असते
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालु असतो
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही
कारण मी............................................(५)

मी : (हसत) " जाधवांनी घोडीशी लग्न केल म्हणे"
ती : (ओरडुन) "तोंडावर पाणि मारा ऽ ऽ"

मी परत स्वयंपाक घरात जातो , हळुच फळीवर जाऊन बसतो
गॅसही फळीवर्च असतो , बाहेरच्या खोलीतुन बाटल्यांचा आवाज येतो
मी डोकावुन बघतो..... बायको मोरीत दारुचा आस्वाद घेत असते
या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही
अर्थात शिवाजीमहाराज कधी रिस्क घेत नाहीत
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यत। . . . .
मी फोटोतुन बायकोकडे बघत हसत असतो....
कारण मी कधीच रिस्क घेत नाही.......................(६)

मातला तो चंद्र होता......


मातला तो चंद्र होता
चांदण्यात दंग होता
शुभ्र रात्री घट उलगडले
तुझ्या आठवणी अथांग होत्या।
सोबतीची सारी पाने चुरली
फूल फूल मोहरुन आले
एकाकी त्या श्वासामधुनी
गंध तुझा दरवळला होता।
हे देहाचे शाप विषारी
मिटल्या नेत्री बाधत जाती
गहिवर साठून कोरडा होता
कोण्या अनाम देही विरघळला होता।
धीर सुटावे मना शरीरी
कठोर काजळ साचत गेले
अश्रू लपता लपला नाही
रंग बदलून ओघळला होता.

वारी...............


सय विठोबाची आली
माया माहेरी चालली
दिंडी आषाढात जाई
सृष्टी पालखीस भोई

झाला कीर्तनात दंग
ढग वाजवी मृदंग
ठेका भजनाचा धरी
येती पावसाच्या सरी

गेला देहभाव सारा
नाचे रिंगणात वारा
विठूनामाचा गजर
गात वाहती निर्झर

खांदी पताका भगवी
सूर्य दिशांना जागवी
भक्तीरसात न्हाऊन
मग पालवते ऊन

नभी उधळे अबीर
मन मायेचे अधीर
दिंडी चाले भराभरा
झाली घाई चराचरा

दिंडी पंढरी गाठते
माया ब्रह्मास भेटते
होते पंढरीची वारी
भेटे द्वैत उराउरी

मा फलेषु....



बोल कोणी बोलून गेला

घाव खोल तो करून गेला
ओली होती जखम अजूनही
त्यावर वणवा लावून गेला
थांबविले मी किती दिवसाला
सूर्य नभी चा ढळून गेला
दाटून आले मेघ नभी
पाऊस दूरवर पडून गेला
प्राजक्त उभा अंगणी माझ्या
बहर दुज्याला देऊन गेला
ओंजळीत होती बकुळ सावळी
गंध वाऱ्यावर वाहून गेला
हसून लपविले किती जरी
थेंब अश्रूचा बोलून गेला
मा फलेषु कदाचन .......
सखा श्रीहरी सांगून गेला

Wednesday, July 18, 2007

ताज महल, भारत