Saturday, September 1, 2007

ती ५ मिनीटं !


"हो!! उठतोय, फक्त ५ मिनीट झोपू दे"

हे माझं रोज झोपेतुन उठतानाचं पेटंट वाक्यं. अगदी लहानपणापासुनचं. त्या शेवटच्या ५ मिनीटांच्या झोपेसाठी मी खुप पुर्वीपासुन झगडत आलो आहे. खरं तर या ५ मिनीटांच्या झोपेवरुनच तुमची झोप पूर्ण होते का नाही ते ठरत असतं. आदल्या रात्री तुम्ही किती वेळ झोपता याशी त्याचा काही संबंध नाही. तुम्ही ४ तास झोपा नाहीतर १०, झोप पूर्ण की अपूर्ण ते या ५ मिनीटानी ठरतं. ही ५ मिनीटांची झोप पुरणपोळीवर घेतलेल्या तुपासारखी असते, पुरणपोळी कितीही चांगली झाली तरी त्याची चव तुपाशिवाय अपूर्णच, किंबहुनी तुपाशिवाय खाल्ली तर पोळी बाधतेच.

ही ५ मिनीटं तुम्हाला मिळाली तर त्या दिवसा सारखा शुभदिवस कुठला नाही. दिवसभर तुमचा मुड प्रसन्न राहतो, सारखं एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं, सगळ्यांशी (हो! बॉसशी सुद्धा) चांगलं बोलावं आणि वागावसं वाटतं, रस्त्यावरुन जातांना तो ओलांडू पाहणार्या आजींना मदत केली जाते, अहो एवढंच कशाला ? चालता चालता गुणगुणत असलेल्या गाण्यावर एखादी मस्त dance step आपल्याला कधी जमुन जाते हे कळत पण नाही. थोडक्यात म्हणजे एखाद्या "super fresh" टुथपेस्टच्या जाहिरातितल्या व्यक्तिसारखा आपला दिवस जातो. आता अशा दिवसांचे फायदे किती आहेत बघा. आपला मुड चांगला असल्यामुळे खाणं-पिणं छान असतं,त्यामुळे तब्येत चांगली राहते... अगदी बी.पी. का काय म्हणतात ते पण नॉर्मल राहतं, गुणगुणण्यामुळे गाण्याचा रियाज होतो. बॉसशी चांगलं वागल्यामुळे promotion चे चान्सेस वाढतात. आजींना मदत केल्याबद्दल थोडं पुण्य पदरात पडतं. थोडक्यात प्रगतिच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होते.

याविरुद्ध जर ही ५ मिनीटं आपल्याला मिळाली नाही तर आपण दिवसभर चिडचिड करत असतो. रस्त्यावरुन जाताना कोणी मधे आलं तर त्याच्या अंगावर खेकसतो आणि त्याचे शिव्याशाप पदरात पाडुन घेतो. ऑफिसात बॉसशी भांडण करुन आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेतो. अशा दिवशी साधा ताकभात खाल्ला तरी तो घशाशी येउन acidity होते.

आता हे पाहिल्यावर प्रगतिचा मूलमंत्र का काय तो सापडला असं तुम्हाला वाटेल. पण हे सगळं इतकं सोपं असतं तर ना!
कुठलीही चांगली गोष्ट सांगितली की त्याचे विरोधक तयारच असतात. लोकांचं (विशेषतः आयांचं) या ५ मिनीटांशी इतकं वाकडं का असतं काय माहित. काही लोक त्याला उगाचच मनोनिग्रहाचे मापदंड लावतात. "५ वाजता ठरलं म्हणजे ५ वाजताच उठायचं, ५ वाजुन ५ मिनीटांनी नाही" असले काहीतरी अघोरी विचार असतात त्यांचे. आणि ५ ला म्हणजे ५ लाच उठुन हे करतात काय? तर कुठे टेकड्याच चढ. नाहीतर सगळे एका ठिकाणी जमुन वेगवेगळ्या स्वरात हसतंच बस वगैरे वगैरे. अरे छान अजुन थोडा वेळ लोळावं, घरी दात न घासता पण चहा मिळत असेल तर तो प्यावा, सकाळचा एखादा (इतरांनी गायलेला) राग ऐकावा. कशाला जीवाला एवढे कष्ट?

आयांचं वेगळंच काहीतरी असतं. त्यांनी मारलेल्या पहिल्या हाकेत आपण उठलो नाही तर तो त्यांना त्यांचा नैतिक पराभव वाटतो. मग चिडुन त्या आपल्याला उठवतातच. सुटीच्या दिवशी "आत्ता उठ, नंतर दुपारी हवा तेवढा वेळ झोप" असलं काहीतरी बिनबुडाचं विधान करतात. अरे! दुपारी कसलं झोप? "जो बुंद से गयी हौद से नही आती! " अशी म्हण मला फेकाविशी वाटते. पण तो पहिला "जोSS" म्हणताना मला मोठ्ठी जांभई येते आणि त्याचा फायदा घेउन आई तिथुन निघुन जाते. कसं आहे, ५ मिनिटांची किंमत काय आहे हे ती ५ मिनीटं कधीची आहेत यावर अवलंबुन असतं. कडकडुन भुक लागलेली असतांना जेवण मिळण्यासाठी लागलेली ५ मिनीट आणि आवडीचं पोटभर जेवण झाल्यावर थोडीशी पण हालचाल न करता जाणारी ५ मिनीट यात काही फरक आहे का नाही?

असो! कधी ही ५ मिनीटं मिळतात तर कधी नाही. त्यांच्यासाठी रोजचा होणारा झगडा ही पण त्यातलीच मजा. कधी आपण झोपावं आणि कधी आईला आपल्याला उठवल्याचं समाधान मिळू द्यावं ... तिनं केलेली दुधीभोपळ्याची भाजी आवडत नसतांनाही आपण खातो कारण उरलेल्या अर्ध्या भोपळ्याचा उद्या ती हलवा करणार असते ... तसं.

No comments: