Tuesday, July 31, 2007

तो............


जून-जुलै कोरडा ठणठणीत गेल्यावर खरं तर पाऊस येतोय की नाही, याची सार्‍यांना काळजीच लागून होती. जो तो पावसाळ्याबद्दल बोलू लागला. पण पाऊस मात्र कानावर हात ठेवून दडी मारून बसला होता. तो कुणाचंच ऐकेना. वसुंधरा आपला घाम पुसून पुसून वैतागली. डौलदार वृक्षही कडक उन्हाचा मारा सहन करून संतापलेत. त्या संतापाच्या भरात ते तर हलेना डुलेना. मग गरीब बिचार्‍या माणसाची काय बात?

सगळ्यांनी आशा सोडली आणि एक दिवस मात्र अचानक पावसाला भलताच हुरूप आला. त्यानं जे कोसळणं सुरू केलं की आता थांबायचं नावच नाही. वसुंधरेचे गात्र नि गात्र ओले चिंब झाले. मोठमोठ्या वृक्षांची पावसाचा मारा सहन करता करता भंबेरी उडाली आणि छोट्या छोट्या वेली तर जमीनदोस्तच झाल्या. माणसं म्हणायला लागली, 'बस झालं गड्या आता. थांब न. जरा तर काम करू देत.'

पण मला मात्र अजून खूप पाऊस हवा होता. प्रचंड कोसळणारा पाऊस, कडाडणार्‍या विजा, गडगडणारे ढग, गेलेली वीज, अंधार गुडुप्प. पुढ्यात पडणारा पाऊस सुद्धा डोळ्यांनी दिसणारा नाही: पण जाणवत राहील. रंध्रांरध्राला तो जाणवतो. माझ्या साडीतून पूर्ण शरीराला स्पर्श करून, माझ्या भावनांना ओल देऊनच तो केसांपासून पायापर्यंत हळूहळू ओघळतो आणि तेव्हाच 'तो' येतो. गेल्या कित्येक वर्षाचा हा नियम! पावसांच भयानक रौद्र रूप दिसायला लागलं की अख्खं शहर स्वत:च्या घरात चिडीचूप होऊन जातं.

दारे खिडक्या बंद करून आपआपल्या संरक्षित घरात बसतं. रस्ता निर्मनुष्य होऊन जातो आणि मग तो अवतरतो. किती वर्षाचा हा परिपाठ. मला आठवतं, अकरावीत असताना भर पावसातून शाळेतून मी येत होते. सायकल दामटवत. टपोर्‍या थेंबाचा आक्राळ-विक्राळ कोसळणारा पाऊस, तोही वार्‍यासकट समोरून येणारा वार्‍याला आणि पावसाला चुकवत (जे शक्यच नव्हतं) दप्तर ओलं होणार नाही याची काळची घेत मी सायकलला पायडल मारत होते जाम वैतागून, नशिबाला शिव्या देत, आईची, भावाची, (अरे कुणीतरी माझ्या मदतीला या रे, म्हणून) आठवण करत सायकल ओढत जात होते. आपलं घर आता इथेच असतं तर! असाही विचार दर पावलागणिक येत होता. आणि... आणि... तो आला.

चक्क तो आला. मी डोळे विस्फारून त्याच्याकडे बघतच राहिले. माझ्या हातातली सायकल त्यानं चक्क स्वत:च्या हातात घेतली. माझं दप्तर माझ्या खांद्यावरून घेऊन सायकलला लटकवलं आणि म्हणाला, 'चल आता बिनधास्त.' सायकल ओढणं तुला जरा जास्तच जड झालं होतं. चल मी तुला घरापर्यंत पोहोचवतो. त्याच्या खांद्यावर माझ्या दप्तराचा आणि त्याच्या हातात माझ्या सायकलचा भार देऊन मी खरंच बिनधास्त चालायला लागले. त्याच्या पावलांशी पावळं जुळवत. चालताना त्याला शाळेतल्या खूप गप्पा सांगितल्या. सायलीची गंमत. शशांकचा अगोचरपणा. सारं सारं, पावसात भिजायला मला कसं आवडतं हे ही सांगितलं. तो म्हणाला, ' दर पावसात असं माझ्या सोबत भिजायला आवडेल?'

''नक्कीच आवडेल. पण, तू असतोस कुठे?''
''इथेच तुझ्या जवळपास''
''मला कसा कधीच दिसला नाहीस''
''कसा दिसेन? आजपर्यंत तू कधी माझी आठवणच केली नाहीस?''
''मग आज तरी कुठे केली होती? मला तर दादाची, आईची आठवण येत होती''
''वेडाबाई, पाऊस पडला की शाळेतून घ्यायला आई किंवा दादा यायचं वय राहिलं का आता तुझं? चांगली अकरावीत आहेस. आता मीच येणार तुला पावसात सोबतीला.''
''खरं?''
''खरं.''
तिथुन सोबत करतोतय. केव्हाही प्रचंड पावसात माझ्यासोबत चालायला लागतो. गाडीत असले तरी शेजारच्या सीटवर कधी येऊन बसतो कळतच नाही. खूप गप्पा मारतो. गाणी ऐकवतो. 'सारंग तेरे प्यार में...' हे गाणं ऐकल्याशिवाय तर मी त्याला कधी जाऊच देत नाही. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावरच्या पावसात त्यानं मला अबोल साथ दिली. बिनधोक सहवास दिला. कुठलीही अपेक्षा न ठेवता.

मग याचवर्षी कुठे दडला? आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळतोय. सार्‍यांची सगळीच कामं ठप्प झाली. परवा-परवा बँकेत महत्त्वाचं काम असल्यामुळे जावचं लागलं. येताना गाडी पंक्चर, म्हटलं, आज तरी हा नक्कीच येईल, 'गाडीची स्टेपनी बदलवून द्यायला' पाच मिनीट कोसळणार्‍या पावसात वाट पाहिली. नाहीच आला. त्यातच वायपर गेला. म्हटलं, आता तरी येईल आणि म्हणेल, 'वेडी का काय, एवढ्या धुप्प पावसात वायपर शिवाय गाडी चालवतेस? थांब. एक मिनिटात स्क्रू फिट करून देतो'. पण नाहीच आला. मीही जिद्दीनं तशीच गाडक्ष चालवली.

आज आता चक्क पेट्रोल संपलय. गाडी रहाटे चौकात ड्राय होऊन उभी आहे. गाडीत बसून तू येण्याची वाट पाहते आहे. अर्धातास झाला. आता तू येणारच नाहीस, असं वाटतय. पण का रे? असा अचानक याच वर्षीच्या पावसात कुठ गडप झाला? काविसरलास? पण कसं शक्य आहे? सोळाव्या वर्षीच्या पावसात भेटल्यापासून थेट पन्नाशीपर्यंत सोबत केलीस. मग अचानक कसा विसरशील?

वाट बघून बघून थकले आणि गाडी तिथेच सोडून अॅटो केला. सिग्नलजवळ अॅटो थांबला. उगीचच इकडे तिकडे नजर फिरविली. पंक्चरच्या दुकानाजवळ आमची छकुली उभी आणि तिच्या शेजारीच तिची कायनेटिक हातात घेऊन 'हा' उभा. छकुली मात्र आपल्या पंक्चर गाडीचा भार त्याच्या हातात देऊन मस्त डाळिंबी दात दाखवत, भुरभुरणारे केस सावरत, त्याच्या डोक्यावर टली मारत त्याला गप्पा सांगण्यात दंग. म्हणजे... छकुलीलाही आज दादाची किंवा ममाची आठवण नाही?...

एवढी वर्ष जोडीने भोगला पाऊस
जोडीनं उतरलो भरतीत...
इथून पुढे पाऊस आणि तो छकुलीसाठीच...
पण..
एवढे वर्षे तू मला अबोल सोबत केलीस
अस्तित्वासह माझ्यात राहिलास...
कोण होतास तू?
माझा सखा?
माझी सावली
माझ्या पावसाळी आयुष्याचं निमित्तकारण
माझ्या तारुण्याला जाग आणणारी सोबत
माझ्या ओल्या श्वासांची लय
माज्या यातनांच्या वणव्यावर फुंकर घालणारी झुळूक?
कोण ...कोण होतास तू?

हिंदोळा.........

घड्याळात रात्रीच्या बाराचे ठोके घण घण पडत होते. नि:शब्द शांततेत घणघण आणखीच तीव्रतेने जाणवत होती. संध्याकाळच्या सात वाजल्यापासून ती त्याची वाट बघत होती. शहरापासून दूर एकटे-दुकटे घर असलेल्या वस्तीत नुकतंच त्यांनी भाड्यांच घर घेतलं होतं. या चार खोल्यांच्या घरात ते तिघंच. दोघं पती-पत्नी आणि छोटसं सहा महिन्याचं बाळ. तिला दिवसभर सोबत बाळाचीच. त्याचं दिवसभर ऑफिस आणि सामाजिक चळवळीशी थोडाफार संबंध असल्याने सायंकाळ कुठेतरी सभेला, मिटींगला भाषणाला जायचे. एकूण ती घरात जास्तीत जास्त एकटीच.

या एकटेपणाचाच तिला भयंकर उबग आला होता. 'लग्न' या एका शब्दाने, विधीने, कृतीने आपलं पार आयुष्यच किती बदलून गेलंय याचाच ती अलीकडे सारखा विचार करीत असायची. खरं तर ती स्वत: अत्यंत हुशार, कर्तबगार, एक्टीव्ह विद्यार्थिनी, कॉलेजात कोणताही कार्यक्रम असो, राही व्यासपीठावर नाही आणि व्यासपीठावर येऊन तिला बक्षीस नाही, असं कधी झालचं नाही.

वयाच्या सतराव्या वर्षी विनोबाजींच्या गो-हत्या प्रतिबंधक चळवळीत तिने भाग घेणार्‍या विदर्भातल्या 21 तरुणांमध्ये ती एकुलती एक तरुणी होती. अशा अनेक चळवळीत तिचा सक्रीय सहभाग असायचा. अशा चळवळीतूनच त्या दोघांचा परिचय प्रेम आणि प्रेमाची परिणती, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्नात झाली होती. नेह‍मीच्या ठाम स्वभावानुसार आपल्या घरच्यांचा विरोध लक्षात घेऊन तिने आधीच ठणकावून सांगितले

'तुम्ही माझं लग्न करून दिलं तर उत्तम अन्यथा मी तर याच तरुणाशी लग्न करणार'. आपल्या लेकीचा जिद्दी स्वभाव लक्षात घेता आपल्याच हाताने आपल्या पायावर कशाला धोंडा पाडून घ्यावा, हे जाणून त्यांनी योग्य वेळ बघून तिचे लग्न लावून दिले. ते आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. पण ती स्वत: एका मोठ्या जबाबदारीत गुंतली गेली, हे त्यावेळी तिच्या लक्षातही आले नाही.

लग्न या एका कृतीने तिचे आयुष्यच पार बदलून गेले. सर्वात पहिला आणि मोठा फटका बसला तो तिच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला. ऐन परीक्षेत त्याच्या बहिणीचे लग्न आले. घरचेच लग्न म्हटल्यावर सुनबाई परीक्षा देऊन तिला कलेक्टर थोडीच व्हायचे होते! ना परदेशात जायचे होते!! लग्नामुळे तिची परीक्षा बोंबलली. हिवाळी परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली आणि कडक डोहाळ्यांनी तिचा जीवन मेटाकुटीस आला. इतका त्रास की अंगावरच्या वस्त्रांचंही अनेक वेळा तिला भान राहत नसे.

परीक्षेची तिसरी संधी घ्याची म्हटलं ती सासर्‍यांची बायपास सर्जरी तिच्याच घरातून. ‍अं‍तिम वर्षाच्या परीक्षेचा पार बट्ट्याबोळ आणि आता तर दिवसभर बाळाचंच करण्यात वेळ कसा जातो कळतच नाही. कुठे कार्यक्रमाला जाणे नको की नाटक सिनेमा बघणे नको. तो मात्र मोकळा. सगळीकडेच जायला यायला. जणू लग्न तिला एकटीलाच करायचे होते. तिचीच लग्नाची गरज होती. तिचंच एकटीचं बाळ आहे. त्याला काही कर्तव्यच नाही. ती पोळी लाटत असेल आणि बाळ रडत असले तरी तो तिथून ओरडणार,
''अग घे ना किती वेळचा रडतोय.''
''तुम्ही घ्या मी स्वयंपाकात आहे.''
''मी वाचतो आहे. तू हात धुऊन लवकर घे त्याला.''

तिला ‍चीड येते त्याची. हे काय सुशिक्षित माणसाचं वागणं झालं?
स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणारा हा माणूस साधं बाळाच्या संगोपनात शेअर नाही करू शकत. हा काय आयुष्यात आपलं सुख दु:ख वाटून घेईल? कोणत्या सोबतीची शपथ घेतली यानं आपल्या सोबत? या घरात एकत्र राहण्याची? तेही त्याच्या सवडीने. रात्रीचा एक वाजला. अद्याप यायचाच आहे. प्रतीक्षा करून करून मी थकलेय. पण याचा पत्ताच नाही. मी तरी का म्हणून रोजच सायंकाळपासून याची वाट बघते? आज तो तिला जाताना सांगून केला होता की मी लवकर येतोय. तू तयार रहा. आपण 'ती फुलराणी' बघायला जाऊ या. ती आनंदली. कित्येक दिवसात नाटक बघितंलच नव्हतं. नाटक तिचा वीक पॉईंट. पण बाळ लहान असल्यामुळे की त्याला घेऊन कशी जाणार? तो रडला तर...!

पण तो मात्र एवढ्यात वसंतराव देशपांडे नाट्यगृहात लागलेली सारी नाटंक बघून मोकळा... तर ती तयार होऊन त्याची सहा वाजल्यापासून वाट बघत राहिली. आता रात्रीचा एक वाजून गेला. हे नेहमीचंच. तो सांगूनही येणार नाही, हे अंधुकसं आतून तिला कुठेतरी वाटत होतं. 'विश्वास' ही भावनाच मेली. फालतू आहे, असं तिला अलीकडे वाटायला लागलंय. विश्वास असतों म्हणून अपेक्षा असतात, आणि अपेक्षा आहेत, म्हणून अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या वाट्याला येतं, दु:ख या दु:खाचे क्षण माणसाला किती व्यापून टाकतात. थकवतात आणि मग एखाद्या सुखाच्या क्षणालाही एका दीर्घ वेदनेची कळाच भोगण्याचा शाप आपल्या वाट्याला येतो... ती उसासते. परत घड्याळात बघते. एक वाजून बावीस मिनिटे.

कुठे बसला असेल एवढ्या रात्रीपर्यंत? नाटकाला एकटाच मित्रासोबत निघून गेला असेल तरी एव्हाना यायलाच हवं ना! या पुरुषांना घरच्या लोकांची काही काळजीच नसते काय? आधीच घर हे असं विरळ वस्तीतलं. काही झालं तर कितीही ओरडा कुणाला म्हणून आवाज जायला नको. शिवाय एवढ्या रात्री याचेही असे एकट्याने येणे बरोबर आहे काय? रोज केवढं वाचतोय आपण पेपरमधून, अपघात, लुटमार, मारठोक, स्वभाव बघितला तर असा चिडखोर. एवढ्या रात्री जायचं तरी कुठे... कुणाला विचारायचं... ना आपल्याकडे फोन ना काही. ती वाट बघून आणि या भलत्या सलत्या मनात येणार्‍या विचारांनी शिणून जाते.

वैतागते. उगाचंच घरात इकडल्या तिकडे भटकत राहते. पुस्तकाची रॅक उगाचंच उचकटते. गजानन मुक्तिबोध हातात घेते. त्यांचा सिगारेट ओढणं आपण किती निषिद्ध मानतो. वाईटपणाचं लक्षण. पण माणूस मोठा झाला की, त्यांनी काहीही केलं तरी त्याचं कौतुक. त्याचं ग्लोरिफिकेशन होतं. एक प्रसिद्ध प्राध्यापक. कवी म्हणे, वर्गात मुलांना शिकविताना सिगारेट ओढतात. धुम्रपानाशिवाय ते चांगले शिकवूच शकत नाही. एक बहाद्दर प्राध्यापक दारू प्यायल्याशिवाय शिकवू शकत नाही. दारूशिवाय जर ते बोलायला लागले तर त्यांचं शरीर थरथरत राहतं. मोठेपणाची किमया! बेलचा आवाज. ती चक्क धावतच जाऊन दार उघडते. दार उघडताच दारूचा दर्प त्याच्यासह आत येतो. झालं तिचं टाळकं खराब.

ती त्याच्यावर ओरडतच. 'सायंकाळी येणार होतास, तो आता आलास. शिवाय पिऊन. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत घरात मला एकटीला ठेवून बाहेर दारू ढोसत बसतो. घराची काही काळची?''

''घरात असल्यावर काळजी कशाला? आणि मी दारू प्यायल्याने तुला काय त्रास होतोय?''

''तुझ्या दारू पिण्याचा त्रास मला होणार नाही तर काय लोकांना होणार?''

''तुला कशाचा त्रास? मी तर जेवून पण आलो. आता गुपचूप झोपणार. तुला काही ''बोलल्यानंच त्रास होतो असं काही आहे काय? बोललो.''? रात्रीच्या दोन वाजेपर्यंत तू आला नाहीस, त्याचा मला त्रास होणार नाहीऊ? दारूसारख्या जगातल्या सर्वात वाईट गोष्टींवर तू पैसे खर्च करतो, याचा मला त्रास होणार नाही?''

''ए ... ज्यादा बकबक करू नकोस. दारूवर माझा पैसा खर्च केलाय. तुझ्या बापाच्या भरवशावर नाही पीत. माझा मी कमवतोय. मला माझा पैसा कसाही उडविण्याचा अधिकार आहे. जादा बकबक नकोय.''

बडबडतच तो बेडरूममध्ये निघूनही गेला. ती स्तंभित. त्याच्याकडे पाहातच राहिली. तिला कळलचं नाही. एकदम माझ्या बापापर्यंत जाण्याचं कारणंच काय? माझा नवरा दारूवर त्याच्या कमाईचे जरी असले तरी 'आपलेच' पैसे खर्च करत असेल, तिला दारू पिणं आवडत नसेल, तर ती आपल्या सहचर्‍याला एवढंही म्हणू शकत नाही? कां म्हणू नये? तिला सर्वात जास्त जर चीड कशाची येत असेल तर... तर या दारूची आणि दारू पिणार्‍यांची. माझा नवरा हा माझा आहे तर त्याचा पैसाही माझा आहे, त्याची प्रतिष्ठाही माझी आहे. त्याच्या वेळेवर माझा आग्रहीपणा असू शकतो हे हा नाही समजू शकत?

मी... माझं... मला... या अहंकारातच हा जगणार आहे काय? मग मी कोण? माझं इथे काय स्थान? काय काम? मी याच्यासोबत लग्न करून माझं सर्वस्व सोडून याला जीवनभराची सोबत करायला आले आणि हा म्हणतो... माझा पैसा... माझं पिणं. व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला तर याला चालेल काय? स्त्री पुरुष दोघेही सारखेच जीव ना? मग माझ्यासाठी वेगळे नियम आणि याच्यासाठी वेगळे नियम असे कसे? केवळ हे अर्थार्जित आहे म्हणून याला हा अधिकार मिळाला आहे? मी अर्थार्जित होऊ शकत नाही? अर्थार्जित होणे म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे होतं काय?... नाही. तसे तर अजिबात नाही. मी उद्या नोकरीला लागले आणि वाट्टेल तेवढा वेळ बाहेर राहायला लागेल, तर याला चालू शकेल?... छे शक्यच नाही. मग हा पुरुष म्हणून याला हा अधिकार मिळू शकतो? का शेवटपर्यंत माझ्यासारखीनं हिदोळा होऊनच जगायचं काय? मनात नकळत प्रश्न उठला.

मुठीतलं चांदणं...............


काही तरी लिहावसं वाटतं

काही तरी करावंसं वाटतं

तुझ्यासोबत फार बोलावंसं वाटतं!

तुझ्याविना करमेनासं होतं

प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आणि

तुझ्यासाठीच घालवावासा वाटतो

विचार मनात फक्त तुझाच असतो

मला ठाऊक नाही हे नेमकं का होतंय ?

पण हे खरं

मैत्रीने बंदिस्त केलंय

प्रेमाने मनाला वेड लावलंय

तुझं हास्य मनाला बेधुंद करतं

चेहरयावरचं तुझं निखळ हास्य

मुठीत बंदिस्त करून

जगाला ओरडून सांगावंसं वाटतं

माझ्या मुठीत चांदणं लपलंय

माझ्या मुठीत चांदणं लपलंय

निबंध : माझा आवडता पक्षी

Monday, July 30, 2007

बघा आज पुन्हा ते नव्या जोमाने वाहु लागलयं


सनई -चौघडे आज वाजणार
मांडवात आज वर-वधु नटणार
मन माझं मात्र रडंतय
अरे म्हणुन काय झालं
बघा आज नवं स्वप्नं सजु लागलयं

अनोळखी दोन मनं आज जुळणार
बागेत आज दोन नवी फ़ुलं उमलणार
मन माझं मात्र कोमेजलय
अरे म्हणुन काय झालं
फ़ुल होण्याचं स्वप्न त्यानेही कधीतरी पाहीलयं

मला लढायचे नव्हते तरीही मन लढलं
लढता लढता ते हरणार हे मी जाणलेलं
आणि शेवटी काल ते हरलं
अरे म्हणुन काय झालं
बघा आज ते खुश आहे कारण त्याने लढुन पाहीलय

ती गेल्यानंतर मन माझं भरपुर रडलं
नंतरचे त्याने सगळ्या दिवसांना रडतंच काढलं
आसवांच वारं काल थोडं थांबलेलं
अरे म्हणुन काय झालं
बघा आज पुन्हा ते नव्या जोमाने वाहु लागलयं

Sunday, July 29, 2007

भारत @ २०२५




स्वतंत्र भारत आज साठीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या साठ वर्षांत जग एकदाच नव्हे तर अनेकदा बदलले. चहूअंगांनी बदलले. भारतही आमूलाग्र बदलला. बहरला. यातले काही बदल तर थक्क करणाऱ्या वेगाने घडले. राजीव गांधी यांनी एकविसाव्या शतकाची भाषा १९८५मध्ये पहिल्यांदा केली तेव्हा 'आपला देश तर अजून मध्ययुगात आहे. मग हे एकविसावे शतक ते कोणते?' असे कुत्सित प्रश्ान् त्यांना विचारण्यात आले. त्यांना कम्प्युटरयुगाची चाहूल लागली, तेव्हा त्यांची हेटाळणी करण्यात आली. पण भारताची मुदा असणाऱ्या या एकविसाव्या शतकात, आज ना उद्या भारत हा महासत्ता होणे आणि परदेशांत राहणारे भारतीय म्हणजे 'ब्रेन ड्रेन' नसून 'ब्रेन बँक' आहे, या गोष्टींची चर्चा समाजाच्या थेट तळापर्यंत पाझरली आहे. एक वैज्ञानिक भारताचा राष्ट्रपती झाला आणि त्याने इसवी सन २०२०मधल्या संपन्न भारताचे चित्र जगापुढे ठेवले.

या साऱ्या पार्श्वभूमीवर 'भारतञ्च२०२५' रेखाटण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'नेे खुले आवाहन केले, तेव्हा राष्ट्रपतींनी घातलेली कालमर्यादा आणखी पाच वर्षांनी पुढे नेण्यात आली. आजपासून साधारण दोन दशकांनी भारत कसा असेल, हे आम्हाला आमच्या वाचकांकडून जाणून घ्यायचे होते. त्यांच्या प्रतिक्रियांची दखल 'महाराष्ट्र टाइम्स'च्या दिवाळी अंकात घेणार आहोत आणि त्यातल्या निवडक प्रतिक्रियांना दिवाळी अंकातल्या खास विभागात स्थानही देणार आहोत, असे तेव्हा मुद्दामच जाहीर केले नव्हते. दोन दशकांनंतरचा भारत कसा असेल, असा विचार करतानाही प्रामुख्याने अपेक्षित होतेे ते देशातले तेव्हाचे राजकारण आणि त्या अनुषंगाने होऊ शकणारे बदल. राजकारण देशाच्या वाटचालीच्या मधोमध तर असतेच; पण ते आकार घेते तेव्हा त्यात सर्वाधिक प्रमाण असते लोकेच्छेचे! ही लोकेच्छा, लोकरूची आणि लोकसंवेदना 'मटा'मार्फत पुन्हा लोकगंगेपर्यंत पोहोचावी, हा प्रतिक्रिया मागवण्याचा हेतू होता. तो वाचकांच्या प्रचंड प्रतिसादाने अपेक्षेबाहेर सफल झाला. दोन दशकांनंतरच्या देशस्थितीचे मानसचित्र देशभर विखुरलेल्या वाचकांनी कळवले. त्यात चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, बडोदा इथल्या वाचकांप्रमाणेच महाराष्ट्रभरचे वाचक होते.. प्रतिक्रियांचा कित्येक दिवस नुसता पाऊस पडत होता. यामध्ये सर्व वयोगटांचे वाचक होते. कित्येक पावसाळे पाहिल्यावर थोडासा जूनपणा आलेले जसे होते, तसे मिसरूड फुटल्याक्षणी स्वत:च्या स्वतंत्र विचारांची पालवी फुटलले टीन-एजरही होते. या प्रतिक्रिया वाचताना आपण जणू महाराष्ट्राच्या समूहमनाची घुसळण होऊन निघालेले नवनीत पाहात आहोत, असे वाटत होते!

निवडक पत्रांमधला वेचक भाग, तसेच उल्लेखनीय पत्रे पाठवणाऱ्या वाचकांची नावे सोबत दिली असली, तरी सगळ्या पत्रांचा मिळून एक सारांश सांगता येईलच. राजकारणाचा विचार करणाऱ्या बहुतेक वाचकांच्या मनात आता 'घराणेशाही आणि या घराणेशाहीला विरोध करायला हवा', असा विचारच राहिलेला नाही. कदाचित सर्वच पक्षनेत्यांच्या घरात तेच घडत असल्याने वाचकांना तसे वाटत असेल. पण आणखी दोन दशकांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या किंवा राहुल गांधी, वरुण गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांनी देशाच्या पातळीवर नेतृत्व करण्यात वाचकांना आता काहीच गैर वाटत नाही. उलट सर्वच वाचकांना या आणि इतरही सर्व तरुण, सुशिक्षित नेत्यांकडून खूप अपेक्षा आहेत. या तरुण नेत्यांच्या आई-वडिलांनी काही चुका केल्या असल्या, तरी हे तरुण त्यातून योग्य तो धडा घेऊन नीट वागतील, अशी खात्रीही बहुतेकांना आहे.

राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विकासाचा, समृद्ध भारताचा जो नवा अजेंडा सेट केला आहे; तो बहुसंख्य वाचकांनी मनोमन स्वीकारला आहे. त्यांनी भारताचे भविष्यातले सारे राजकारण या विकासाच्या अजेंड्यात सामावून टाकले आहे. त्यामुळेच दोन दशकांनंतरचे राजकारण कसे असेल, याचे उत्तर वाचक निस्संदिग्धपणे ते विकासाचे असेल, असे देतात. विकासाच्या या कल्पनेत भारताने सुपरपॉवर होणे हे जसे आहे, तसेच भारतात एकही माणूस निरक्षर, उपाशी आणि बेकार राहता कामा नये, ही आचही आहे. देशाचे सारे राजकारण गेल्या दशकात विकासकेंदी झाले आहे. त्याचे स्पष्ट प्रतिबिंब प्रतिक्रियांमध्ये पडले आहे.

काही वर्षांपूवीर् लोकशाहीला शिव्या देण्याची फॅशन होती. आपल्या लोकांना डिक्टेटरच हवा, वगैरे बोलले जायचे. पण एखाद्-दुसरा अपवाद वगळता कोणीही लष्कराने राज्य चालवावे, लष्करी क्रांती झाली तरच देश वाचेल, असे म्हटलेले नाही. उलट बहुतेकांनी साठ वषेर् लोकशाही टिकल्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. अनेकांनी परदेशी विचारवंतांचे (विशेषत: इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल) उतारे काढून ते भारतीयांनी कसे खोटे पाडले, हे दाखवून दिले आहे. या साऱ्या विचारवंतांना स्वातंत्र्यानंतर भारताची लवकरच वाट लागेल, शकले उडतील, अशी भीती (की आशा?) वाटत होती.

भारताचे कधी ना कधी तुकडे पडणारच आहेत. 'बाल्कनायझेशन' हेच आपले भविष्य आहे, असली दळभदी स्वप्ने भारतीय विचारवंतांनाही पडत असतात. या विचारवंतांपेक्षा मराठी समूहमनाचे 'गट फिलिंग' महत्त्वाचे मानले, तर भारताचे तुकडे पडण्याइतके मोठे संकट कोसळेल, असे कुणाला वाटत नाही. उलट अनेकांनी दक्षिण आशियाची जबाबदारी शेवटी भारतावरच असल्याने 'सार्क'मधल्या सर्व देशांना भारताने मदत देऊन उभे करावे, असे सुचवले आहे. उद्या देश चालवणाऱ्या तरुण नेत्यांना या परिस्थितीची दखल घ्यावीच लागेल, असेही अनेकांनी बजावले आहे. राजकारणाविषयी लिहिताना वाचकांनी दाखवलेले 'जिओ-पोलिटिकल' (भूराजकीय) भान थक्क करणारे आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशाच्या आयुष्यात दोन दशकांचा काळ म्हणजे फार मोठा नाही. पण सध्याचा बदलांचा वेग पाहता एवढ्या काळातही काय काय घडू शकते, याचे चित्र रेखाटता येते. तसे चित्र राजकारणाला मध्यवतीर् ठेवून वाचकांनी रेखाटले आणि त्यातून दोन दशकांनंतरच्या भारताचे एक रूप साकार झाले. ते आहे समर्थ, संपन्न पण सुसंस्कृत लोकशाही देशाचे. महासत्ता झालेल्या आणि शहाण्या नेत्यांच्या हातात भवितव्य सुखरूप असणाऱ्या देशाचे. गरिबी, बेकारी या प्रश्ानंची जाण असणाऱ्या नेत्यांचे.

शेकडो वाचकांच्या मनातून उमटणारे 'मेरा भारत महान!' म्हणायला लावणारे असे हे चित्र!

- सारंग दर्शने
...........................
बहुरत्ना वसुंधरा!

दोन दशकांनी भारत जगात सर्वोच्च स्थानी असेल, असा माझा विश्वासच आहे. तसे स्वप्न आपले राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिले आहेच. ते खरेच होईल. पण भारत किंवा महाराष्ट्र नवतरुणांच्या द्वारेच महान होईल, असे नाही. त्याला अनुभवाची जोड ही हवीच. महाराष्ट्राची अस्मिता बाळगणारे आणि राष्ट्राभिमानाने परिपक्व असणारे नेतृत्वच देशाला पुढे घेऊन जाईल. भारतीय संस्कृती सर्वाधिक प्राचीन आहे. भारतमातेच्या पुण्याईवरच हा देश टिकेल. बहुरत्ना वसुंधरा हाच आमचा विश्वास आहे.

- जयवंतीबेन मेहता,
माजी केंदीय राज्यमंत्री, मुंबई
....................

पुन्हा सुवर्णयुग!

भारताची प्रगती वाखाणण्यासारखी आहे. साखरेचा महापूर, शिलकी धान्यसाठा, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या राजवटींमुळे झालेली यांत्रिक प्रगती, राजीव गांधी यांनी आणलेला कम्प्युटर, त्यामुळे आयटीत चाललेली घोडदौड, पी. व्ही. नरसिंहरावांनी खुली केलेली जागतिक बाजारपेठ... याशिवाय भारत आज विज्ञानातही आघाडीवर आहे. आजचा शिक्षित तरुण या साऱ्यांची फळे इसवी सन २०२५मध्ये चाळिशीत असेल तेव्हा पुरेपूर भोगेल. हाच तरुण आशिया, यूरप आणि अमेरिकेची उरलीसुरली क्षितिजे काबीज करेल. लोकशाही तेव्हा अधिक सुदृढ असेल. सोनियांचा मुलगा, पवारांची मुलगी अशी व्यक्तिनिष्ठा राहणारच नाही. व्यक्तिनिष्ठ, प्रांतिक, भाषिक अशा पक्षांवर बंदीच आलेली असेल. धर्म, देव व देवळे राहतील; पण त्यांचे अवडंबर नसेल. विज्ञानामुळे स्थैर्य येईल, तसेच सामान्य जनतेला सारी ऐहिक सुखे मिळतील. पाकिस्तानचा बंदोबस्त अमेरिकाच करेल. इतर छोटे, तसेच उपखंडातील देश भारताची मदत घेतील. भारतात पुन्हा सुवर्णयुग अवतरेल.

- नरेंद दळवी, कांदिवली, मुंबई
.......................

लोकसंख्या हेच आव्हान!

पुढील वर्षी स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव. स्वातंत्र्यानंतर सर्व क्षेत्रांमध्ये अपेक्षेपेक्षाही अधिक बदल घडले. दुसरीकडे सामाजिक जाणीव आणि मूल्ये यांचा मात्र विसर पडतो आहे. राष्ट्रपतींचे महासत्तेचे स्वप्न प्रत्येक भारतीयाने पाहिले, तर ते वास्तवात येण्यास वेळ लागणार नाही. देशात लोकशाहीची पाळे-मुळे घट्ट रोवली गेलीत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेत बदल होण्याचा प्रश्नच नाही. मात्र, शहरांप्रमाणेच खेड्यांकडेही जास्त लक्ष द्यावे लागेल. तसेच, आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार हवा. अन्यथा सामाजिक ऐक्य धोक्यात येईल! 'गरीब होतायत आणखी गरीब आणि श्रीमंत होतायत आणखी श्रीमंत' या स्थितीतही बदल घडवून आणावाच लागेल. भविष्यात एकाच पक्षाला बहुमत मिळणे कठीण दिसते.

तरुणांना भ्रष्टाचाराबद्दल आजतरी तीव्र घृणा आहे. त्यामुळे ही मंडळी राजकारणात परिपक्व होतील, त्यावेळी भ्रष्टाचाराचा वेग कदाचित मंदावेल! लोकसंख्या रोखण्याचे कठोर उपाय आणि जातीय सलोखा वाढवणे ही खरी आव्हाने त्यावेळी असतील!

- अजित लोणे, विद्याविहार, मुंबई
.........................

महाराष्ट्र आधार या भारताचा...

' बदल' हाच कोणत्याही प्रगतीचा पाया असतो. इस २०२५मध्ये आपला देश एक विकसित देश असेल. आपल्याकडे लोकशाही असल्याने महत्त्वाचे निर्णय संसदेत होतात. त्यावेळची संसद आजच्यापेक्षा वेगळी आणि अधिक चांगली असेल. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर; तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पातळीवर मोठ्या जबाबदाऱ्या असतील. चांगल्या विचारांच्या, सत्प्रवृत्त नेत्यांकडे देशाचे नेतृत्व गेल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र हा कायमच देशाचा महत्त्वाचा प्रांत राहिला आहे. २० वर्षांनीही महाराष्ट्र हाच देशाचा आधारस्तंभ असेल.

- रशिदा हवालदार, पनवेल.
........................

भ्रष्टाचार आणि काश्मीरप्रश्न!

आजची प्रगती आणि जागतिक महत्त्व पाहता इ.स. २०२५मध्ये भारताचे वर्णन 'शक्तिशाली राष्ट्र आणि संपन्न देश' याच शब्दांत करावे लागेल. अन्नधान्यात आपण स्वयंपूर्ण असू. जातीयवादाचे विष संपलेले असेल. खून, दंगली, हुंडाबळी अशा गुन्ह्यांसाठी आजच्यापेक्षा अधिक कठोर कायदे असतील. संरक्षणक्षेत्रातली घोडदौड पाहता चीन आणि पाकिस्तान आपल्यासमोर झुकलेले असतील. आयटीच नव्हे, तर अणुशक्ती, अवकाशातील युद्धशास्त्र यातही भारत आघाडीवर असेल. शेतीत आपण चीन आणि इस्त्रायलला मागे टाकू. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व भारताकडे चालून येईल. एक अब्ज लोकसंख्येची शक्ती प्रबळ असेल; तसेच त्यांची विचारधाराही प्रगल्भ होईल. भारत पर्यटकांचे आवडते ठिकाण होईल. मात्र, या वाटचालीत आहेत दोनच अडथळे : भ्रष्टाचार आणि काश्मीरप्रश्न!

- नीलेश उदावंत, कोपरगाव
...........................

दहशतवादापेक्षा आशावाद जुना!

विश्व दहशतवादाच्या सावटाखाली जगत असताना भवितव्यावर भाष्य करणे धारिष्ट्याचे ठरेल. पण दहशतवादापेक्षा जुना असणारा आशावाद जगण्याची ऊमीर् देत असतो. सध्या काँग्रेसकडे राहुल, सचिन, मिलिंद, ज्योतिरादित्य, प्रिया अशा तरुण नेत्यांची फौज असल्याने तेव्हा काँग्रेसचा झेंडा दिमाखात फडकत असेल. आयटीशी परिचित असे हे सधन नेते सरकारी कामकाजात अधिक पारदर्शकता आणतील. पण गरिबी, बेकारी, लोकसंख्या यासारख्या ज्वलंत प्रश्ानंची दाहकता ते कशी कमी करतात, यावर त्यांचे खरे यश अवलंबून आहे.

महाराष्ट्रात उद्धव आणि राज यांच्या सेना परस्परांशी लढत राहिल्या, तर सुप्रिया सुळे आणि त्यांचे राष्ट्रवादी साथी राज्यात मॅरॅथॉन इनिंग्ज खेळल्याशिवाय राहणार नाहीत. भाजप आणि उजव्या विचारांच्या पक्षांकडे तरुण नेत्यांची वानवा दिसते. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. स्वार्थी आणि चंगळवादी मध्यमवर्गाचा टक्का वाढत चालल्याने सामाजिक चळवळी यशस्वी होण्याची शक्यता कमी. मात्र, एखाद्या दूरदृष्टीच्या नेत्यामुळे नद्याजोडणीसारखे प्रकल्प मार्गी लागले, तर देशाचे अर्थकारण, समाजकारण आणि भूगोलच बदलेल.

- अभिजित गोगटे, बोरिवली, मुंबई
...........................

प्रगती व गोंधळ यांचा संगम

भारतीय क्रिकेट, हिंदी सिनेमांचे बॉक्स ऑफिस, सेन्सेक्स यांचे अनिश्चिततेशी जितके जवळचे नाते आहे, त्याहीपेक्षा जास्त भारताचे अनिश्चिततेशी नाते आहे. आज एवढी प्रगती झालेली असेल, असे १९८०मध्ये कुणी सांगू शकले असते का? सध्याची वाटचाल अशीच चालू राहिली, तर प्रगती आणि गोंधळ यांचा अभूतपूर्व संगम पाहावयास मिळेल. युवापिढीचा आकार प्रचंड वाढतोय. ही पिढी मतदारच न राहता थेट राजकारणात घुसेल. 'प्रोफेशनल अॅप्रोच', जोडीला प्रसिद्धी आणि वरची कमाई यांचे आकर्षण हा त्यांचा 'यूएसपी' राहील. महिलांच्या राजकीय आकांक्षांना धुमारे फुटतील; महिला नेतृत्व आक्रमक होत जाईल. वाढते शहरीकरण, लहरी हवामान, पायाभूत सुविधांची प्रचंड गरज, आथिर्क स्थिती आणि बेकारी हे पैलू राजकारणावर हुकूमत गाजवतील. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व 'मॉन्सून'प्रमाणे बदलत राहील.

- रामचंद हरी प्रभू, काणकोण, गोवा
...............................

महालोकशाहीची महासत्ता!

' इथे सगळे सुखी होवोत, निरोगी राहोत, कुणाच्याही वाट्याला दु:ख न येवो' या वैश्विक जाणिवेची कळत-नकळत उपासना आणि जोपासना करत आलेला भारत दोन दशकांनी पूर्ण साक्षर, समर्थ असेल. गेली ६० वर्षे महालोकशाहीच्या पायावर उभी राहात असलेली ही एक महासत्ता आहे. भ्रष्टाचार, दारिद्य, निरक्षरता असूनही भारतीय लोकशाही टिकून राहिली, हा पाश्चात्त्य विचारवंतांना चमत्कार वाटला होता. तो चमत्कार आहेच; पण दैवी नव्हे, मानवी! 'स्वत: जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या' ही जीवनपद्धती हा भारतीयांचा जीवनमंत्र. २०२५मध्ये स्वतंत्र भारतात जन्मलेले सारे भारताची धुरा वाहात असतील. त्यांची कार्यक्षेत्रे वेगळी असली, तरी ते विश्वाच्या संदर्भात भारताचा आणि भारताच्या संदर्भात विश्वाचा विचार करतील.

भारतीय शिक्षणपद्धतीने त्यांच्यावर केलेले संस्कार वाया जाणार नाहीत.

- श्रीधर तावडे, कुर्ला, मुंबई
..........................

बिग केऑस...

एखादी आगगाडी ताशी ६० किमी वेगाने जात असेल तर ती ठराविक काळाने किती अंतर कापेल, कुठे असेल हे सांगता येते. याच प्रकारे वीस वर्षांनंतरच्या भारताविषयी बोलता येईल. १९४७नंतर आजवर उद्योगधंदे, अर्थव्यवस्था, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आयात-निर्यात, पर्यटन, दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, शेती, व्यापार, रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक इत्यादी क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती विलक्षण वेगाने होत आहे. यातील अडथळे? वाढती लोकसंख्या, जातीय आणि धामिर्क भेदाभेद, अकार्यक्षम शासनसंस्था, स्वार्थलोलुप समाज व राजकीय व्यवस्था, नियम व कायदे यांची पायमल्ली, भ्रष्टाचार, जीवघेणी स्पर्धा, दहशतवाद, अमेरिका आणि यूरपची दादागिरी, सीआयएसारख्या संस्थांच्या कारवाया आणि भारतीयांच्या ठिकाणी असणारा राष्ट्रविन्मुख दृष्टिकोन या साऱ्या पार्श्वभूमीवर २०२५मधील भारत प्रचंड अराजकाच्या अवस्थेत असेल. राज्यव्यवस्था अधिकृतपणेच गुंड आणि परकीयांच्या हातात असेल. थोडक्यात तेव्हा असेल बिग केऑस!

- ज. दा. टिळक, ठाणे
..........................

सोन्याचा धूर निघेल!

बेसुमार लोकसंख्येच्या प्रदूषणाने विळखा घातलेला भारत कधीच महासत्ता होऊ शकणार नाही, अशी विचारवंतांची वचने आपण सतत ऐकत आलो आहोत. पण आणखी दोन दशकांनी आपली लोकसंख्या हाच आपला 'प्लस पॉईंट' असेल. त्यावेळी आपली ६० टक्के लोकसंख्या युवकांची असेल. भारत हा तेव्हा 'तरुण' देश असेल. महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि सळसळते रक्त यामुळे सर्वच क्षेत्रांत परिवर्तनाची सुप्त लाट तयार होईल. आथिर्क व आध्यात्मिक क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल. जगभर अमेरिकन डॉलरमध्ये होणारे व्यवहार तेव्हा भारतीय रुपयांत झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशातले धार्मिक, भाषिक आणि जातीजमातींचे भेदभाव संपवून देशाच्याच अस्मितेला प्राधान्य देणारी तरुण नेत्यांची पिढी उदयास आली असेल. संसदही तरुण असेल. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत असे म्हणतात. सर्वच क्षेत्रांत नेतृत्व करणारे तरुण हा लौकिक भारताला पुन्हा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री वाटते.

- वाहीद उमरोद्दीन शेख, नाशिक

............................

हवेत निष्ठावान तरुण

राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत साकार होण्यासाठी ताज्या दमाचे, पुरोगामी, निष्ठावान तरुण हवेत. अर्थात, वयाचा निकष हा अनेक निकषांपैकी एक. भारतासारख्या खंडप्राय आणि जाती, पंथ, धर्मांसह अद्भुत वैविध्याने नटलेल्या या देशाचे नेतृत्व करणारा तरुणवर्गही तितकाच उदारमनस्क, देशकार्याला धर्म मानणारा, राजकारणापेक्षा समाजकारणावर अव्यभिचारी निष्ठा असलेला, स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. आज तरुणांची मानसिकता अशी आहे का?

परंतु सर्व पक्षांकडे अपेक्षेने पाहावे असे काही तरुण नेते आहेत. काँग्रेस याबाबत खूपच समृद्ध आहे. त्याचे श्रेय त्या पक्षाच्या इतिहासाबरोबर त्याच्या सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष विचारसरणीला आहे. राहुल, सचिन, ज्योतिरादित्य समर्थ नेतृत्व देऊ शकतील. सुप्रिया सुळे स्वतंत्र प्रज्ञेच्या वाटतात. स्वत:चा ठसा उमटविण्याचा त्यांचा प्रयत्न आश्वासक आहे. प्रिया दत्त वडिलांचा सामाजिक सेवेचा वारसा चालवतील.

- दत्ता राशिनकर, चिंचवड, जि. पुणे
................................

कण्णा, त्रेधा आणि जगत

इसवी सन २०२५... राहुल गांधी प्रचंड मताधिक्क्याने निवडून आल्यावर पंतप्रधान होणे त्यांना काहीच कठीण नव्हते. त्यांच्या इटालियन पत्नीला आता इंग्रजीबरोबरच हिंदीही चांगले येते. पण मातोश्री सोनिया त्याला म्हणाल्या की 'बाबा रे, हे लोक उगाच आपल्यामागे लागतात. त्यापेक्षा तूही मनमोहनसारखा एखादा हाताशी धरून आरामात उपभोग घे. राज्य जरा अंगी तरी लागेल. गुलाम नबी आझाद हे पिकलं पान असलं तरी आपल्या खास माजघरातले. त्यांना पंतप्रधान करू. शिवाय ते मुशर्रफनाही मंजूर आहेत ना!

' कण्णा हजाऱ्यांशी स्वित्झर्लंडमध्ये बोलणी झालीत. त्याला चारपाच प्रकरणे काढू दिली, तर तो मॅनेजेबल आहे. त्याला मी त्याचे काका अण्णा हजाऱ्यांच्या वेळेपासून ओळखते. त्रेधाशीही मी बोललेय. गुजरात सरकारने 'मृगजळावर' मोठे धरण बांधण्याचा जो प्रस्ताव आणलाय, त्याला आपणही वरवर विरोध करायचा. कळलं? मग मेधाची शिष्या त्रेधा त्रास देणार नाही. राहता राहिला लालूंचा लुल्ला. अरे, आपणच नाही का त्याला हार्वर्डला पाठवला? फारतर त्याला विमानमंत्री करून टाक. आणि हो, त्या जगतला परराष्ट्रखाते दे. तसे मी नटवरना फार वर्षांपूवीर् कबूल केले होते. शिवाय सद्दामचा मुलगा उदय आता इराकचा सत्ताधीश झालाय. त्याच्याशी जगतची दोस्ती आहे. सुप्रियाला काहीच नको देऊ. तिच्या वडिलांना इटली आवडत नव्हती ना? बकअप राहुल!'

- अरुण भालेराव, घाटकोपर, मुंबई

................................

कृतार्थ मेधा पाटकर!

आणखी दोन दशकांनी महाराष्ट्राची तरुण पिढी उच्चशिक्षित असेल, त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि अविरत प्रयत्नांमुळे हिंदुस्थानात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असेल. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांतील तरुण राजकारणी एक होऊन दिल्लीत आपला ठसा उमटवतील, यात शंका नाही. काही नावे पुढीलप्रमाणे : प्रतीक प्रकाशबापू पाटील, प्रशांत हिरे, धैर्यशील माने, अमित देशमुख, मालोजीराजे, विनय कोरे, संभाजी निलंगेकर, उन्मेश जोशी, राहुल मोरे, बिपिन शंकरराव कोल्हे, पंकज भुजबळ, राजेश टोपे, समीर भुजबळ, नरेंद घुले, रणजितसिंह मोहिते-पाटील, अमरसिंह पंडित, राणा जगजितसिंह पाटील, राजेंद मुळीक, देवेंद फडणवीस, राजीव राजळे, रणजित कांबळे, शंभूराज देसाई, सागर मेघे, धनंजय मुंडे, राजेश पाटील, विश्वजित कदम, विनोद तावडे, अतुल भातखळकर, जितेंद आव्हाड.

सुप्रिया सुळे भारताचे नेतृत्व करतील.

राहुल गांधी, वरुण गांधी, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, प्रिया दत्त यांनी आपापल्या क्षेत्रात विधायक काम केल्यास त्यांना सत्तेत सहभाग मिळेल.

मेधा पाटकर यांनी मांडलेले सारे प्रश्ान् तरुण नेतृत्वाने सोडवलेले असतील; त्यामुळे मेधा पाटकर यांना कृतार्थ झाल्याचे समाधान मिळेल. हे सर्व तरुण नेते बकाल मुंबईचे रूपांतर आदर्श मुंबईत केल्याशिवाय राहणार नाहीत.

पतंग......

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे निखील लक्ष्मी रोड आणि जंगली महाराज रोड यांना सांधणाऱ्या “प्रेमी-युगूल” ब्रिजवर गाडी निमूटपणे पार्क करत होता. अगदी पतंग हॉटेलसमोरच! “प्रेमी-युगूल” हे निखीलनेच त्या ब्रिजला दिलेले नाव! इथेच एकेकाळी तो आणि ती भेटायचे.
तसा तो रोजच इथे येतो, पण एकटाच. समोरचा रंग उडालेला पतंग पाहून हसतो. आणि एक सिगरेट घेऊन पाच मिनीटांमध्ये निघूनही जातो. खिशातून सिगरेट काढायची आणि कर्तव्य म्हणून धूर आत बाहेर करायचा की झालं. मग मात्र सरळ घरचा रस्ता. वाढत्या वयाबरोबर कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यावा हे त्याला अचूक कळू लागलय! पण आज का कोणास ठाऊक त्याला उगाच तिथे थांबावसं वाटत होतं. आज जवळ जवळ पंधरा दिवसांनी थोडा निवांत वेळ मिळाला होता त्याला.

“पंधरा दिवस… काय केलं होतं बरं मी या पंधरा दिवसात?”
निखील स्वतःच्याच तंद्रीत हरवला.

“कितीतरी प्रॉमिसेस सरळ सरळ तोडले होते. बाकी कोणाचं काही नाही पण माझ्या लाडक्याला पतंग आणि मांजा आणून द्यायचा होता...”
रिकाम्या वेळी आयुष्यातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीची आठवण न होणे जरा कठीणच! आणि त्यामुळेच याक्षणी निखीलला सगळ्यात जास्त हळहळ मुलाला दिलेला शब्द न पाळल्याची वाटत होती.

“त्याला पतंग उडवायची भारी हौस! अगदी बापावर गेला आहे तो त्या बाबतीत!!”
स्वतःशीच पुटपुटत निखीलने सिगरेट पेटवली आणि धुराबरोबरच त्याचं मन पतंगासारखं उंच उंच उडत गेलं.
हवेत स्वैर उडणाऱ्या पतंगाला सावरायला बऱ्याचवेळा किमान मांजा तरी असतो!!

“एकेकाळी काय पतंग उडवायचो आपण. अगदी वेड लागायचं पतंगांच्या दिवसांमध्ये…”
तसा निखील मुळचा एकही कान्हा मात्रा वेलांटी नसलेल्या, आतून बाहेरून सरळ अशा अहमदनगरचा!
नौकरीनिमित्ताने नगर जे सुटलं ते कायमचच. आता फक्त दिवाळी ते दिवाळी…!

“…दिवाळी संपल्यापासून पतंग उडवायला जी सुरुवात होई, ती तशीच व्यसनाप्रमाणे कलेकलेने वाढत संक्रांतीपर्यंत चाले.”
आठवणी उजळत होत्या आणि खोल पाण्यातला बुडबुडा पृष्ठभागावर येऊन फुटावा त्याप्रमाणे फुटत होत्या.

“अरे काचेचं काय करायचय?” कोणीतरी म्हणायचं.
“करायचय काय, घरात गेलेले बल्ब असतील ते गोळा करू आणि पोत्यात घालून कुटू. आहे काय त्यात?”
ही स्वस्तात काचेची पुड मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत होती.

“चला टायर मिळालं मला, इथेच होतं कचराकुंडीत पडलेलं.”
आणखी एक दोन मित्र मग त्या उत्साहात भर घालित असत. त्या टायरवर शिरस उकळवणे होऊन जाई. टायर विझवणे हा देखील एक खेळ होऊ शकतो हे त्यावेळी त्यांना कळालं होतं! शेवटी कोणीतरी घरून पाणी आणून आग विझवत असे. आणि तेही करायचे नसेल तर सार्वजनिक हपसा नाहीतर उघडी गटारे!

“फाटके कपडे तरी आणा रे तुम्ही.”
सगळ्यात मागे मागे राहणाऱ्या एक दोघांच्या अंगावर ही जोखीम येऊन पडत असे. हे कपडे गोळा करणे म्हणजे एक मजेशीर काम असे. ज्याकुणावर ही पाळी येई त्याला कुठून तरी असे फाटके कपडे चोरून आणावे लागत.

“अरे रंगाचं काय?”
रंग कुठला आणायचा यावरून वादविवाद स्पर्धा चालत आणि त्यात हमखास जिंकणारे रंग असत लाल, केशरी किंवा पिवळा!
या मित्रमंडळींपैकी जो स्वभावाने (आणि शरीरानेही!) सगळ्यात गरीब त्याला गरम गरम शिरस पकडावी लागे! एक जण काच पकडायला, एक धाग्याचा रीळ पकडायला, आणि आणखी एक मांजा चकरीवर गुंडाळायला. कित्येकवेळा दोऱ्याचा रीळ मित्रांअभावी तारेत अडकवून ठेवावा लागे. अशा साग्रसंगीत पद्धतीने त्यांचा मांजा सुतवून होत असे. मग एकमेकांत चूरस, कोणाचा पतंग जास्त वेळ आकाशात टिकतो ते. एक ना अनेक युक्त्या दुसऱ्याला गौण दाखवण्याच्या, कमी लेखण्याच्या. या सगळ्या अहमहमिकेसाठी अर्ध्यातून पोटदुखीच्या नावाखाली शाळा बुडवणे; कुठलेतरी सर किंवा बाई त्यांचे आजी किंवा आजोबा वारल्यामुळे घरी गेले आहेत म्हणून सुट्टी आहे अशी घरच्यांना; आणि आपला काका किंवा मामा आजारी आहे अशी शाळेत थाप मारणे अशा अनेक करामती निखीलला आठवू लागल्या.

“आपली सगळी बोटे या थंडीच्या दिवसांमध्ये कशी पायाच्या भेगांसारखी कायम कापलेली असत.
मग पातळ भाज्या जेवणात वर्ज. आणि तसेही जेवणात लक्ष लागत नसेच. सगळे लक्ष गच्चीतल्या गोंगाटाकडे. पण तरीही आईने भात केलाय की नाही याकडे विशेष लक्ष. आणि जर भात केलाच नसेल तर मग गोन्नी! फाटलेला पतंग चिटकवण्यासाठी गोन्नीचे लालचुटूक फळ तोडताना नाही नाही ते धाडस करायचो आपण त्यावेळी. ते बोरासारखे बारीक चिकट गोड फळ खायचे आणि त्यानेच पतंग चिटकवायचे. आज त्या फळाविषयी चारचौघात बोलायला देखील लाज वाटते आणि एकेकाळी आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे फळ होते ते! नंतर कधी तसले झाडच पाहायला मिळाले नाही. काय मजा आहे, आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांची आपल्याला गरज असते पण ते व्यक्त करण्याची हिंमतच होत नाही. कारण तसं करण्याची एकतर लाज तरी वाटते किंवा त्यामुळे अहंकार तरी दुखावला जाणार असतो...”
हा विचार मनात येताच निखील उगाच मोठ्याने हः करून हसला. आणि परत धुराला सोबत घेऊन विचारांच्या गुहेत पुढे सरकला.

“…पण या सगळ्यापेक्षा खरी मजा येई ती म्हणजे आपल्याला आवडणारा पतंग पाहात राहाणे आणि तो कटला की सैरावैरा त्याच्यामागे धावत सुटणे. मग मारामाऱ्या; भांडणे; पतंग फाडणे; तो फाटलेला पतंग पाहून हळहळणे; रुसणे; हिरमुसणे; आणि कधी कधी रडणे.”
आकाशातल्या रंगीबेरंगी पतंगाच्या जाळ्यासारखेच विचारांचे रंगीबेरंगी जाळे निखीलच्या मन:पटलावर पडले होते. आणि क्षणाक्षणाला त्याचा चेहरा नुकतीच वात पेटवलेल्या पिवळ्याधमक समईसारखा लख्ख उजळत होता.

“संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी अगदी लहान असताना घरून डबे घेऊनच निघायचो. कोणाचा डबा पहिले भरतो यासाठी आणखी एक शर्यत. मग हळूहळू डब्याची जागा प्लॅस्टीकच्या पिशवीने घेतली आणि नंतर तीही नाहीशी झाली. जसे जसे वय वाढत गेले तशी त्या गोष्टीचीही लाज वाटू लागली आपल्याला, आणि क्षणात अनेक आवडती, परिचीत माणसे अनोळखी वाटायला लागली. खूप दूर निघून गेली सरून गेलेल्या वयाबरोबरच! मग उरली फक्त काही खास मित्रमंडळी. ही सगळी मित्रमंडळी रेवड्यांची पाकिटे घेऊन एकमेकांच्या गळाभेटीसाठी हमखास गल्लीत जमायची. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत एकमेकांशी ‘पतंगयुद्ध’ करणारे आम्ही कसे एकमेकांविषयी कुठलाही किंतू न बाळगता निखळ बोलायचो. खरंच तेवढे एकच किती छान होते लहान असताना! पण हळूहळू पतंगाच्या धाग्याप्रमाणे मनावरही पिळ बसू लागले आणि मग काही धागे हा पेच सोडवताना कायमचे तुटले. इतके की पुन्हा गाठ मारून देखील एकत्र आणण्याची सोय राहिली नाही!
काळाच्या ओघात जबाबदाऱ्या वाढत गेल्या. ओढून घेतलेली लफडी त्रासदायक होत गेली. या सगळ्यामुळे स्वभाव बदलत गेला. माणसे बदलली. करीअरसाठी गाव सोडावे लागले. या सगळ्यात आपली संक्रांत कुठेतरी हरवूनच गेली. तसं आवर्जून संक्रांतीला जाणं होतंच. पण संक्रांतीला अगदी शास्त्रापुरताच पतंग हातात येतो हे ही जाणवतय आता.
अगदी संक्रांतीच्या आदल्या दिवशी पुण्यावरून निघायचंच संध्याकाळी उशीरा. नगरला घरी जाऊन झोपायचं. सकाळी उठताच पहिला विचार प्रश्नार्थक, “संध्याकाळी कधी निघायच?” आणि आजकाल वाराही थोडा मनाविरुद्ध वागतो; पुर्वीसारखा हवा तेंव्हा येतच नाही! या सगळ्या कल्लोळातून कसाबसा पतंग वर उडालाच तर अनेक पतंग श्वापदासारखी झडप घालतात. त्यात बिचारा आपला जुन्या विचारांचा पतंग कुठे टिकणार या नव्या लोकांपुढे? परत दुसरा पतंग लावायचा उत्साहच राहात नाही. हे सगळं करता करता संध्याकाळी परत निघण्याची वेळ येते. तिळगुळ घ्यायचा तर राहिलाच पण घरी येणा्ऱ्या छोट्यांना द्यायला देखील वेळ मिळत नाही.”
या सगळ्या विचारांच्या घोळक्याने निखीलचे मन पुन्हा काजळू लागले. आणखी काही चांगल्या आठवणी हाताशी येतायत का हे पाहाण्यासाठी त्याने पुन्हा गच्च डोळे मिटले. पोळ्यावर दगड मारताच जसे मधमाशांचे मोहोळ उठावे तसे पुन्हा एकदा विचारांचे मोहोळ निखीलच्या मनात उठत होते. आणि दिशाहीन भरकटत होते. कधी अंगणात; कधी अंगणातल्या झाडापाशी; कधी गच्चीवरल्या गवतावर; कधी त्या गवतावरच्या पांढऱ्या फुलांवर; कधी त्या फुलांवर बसलेल्या पोपटी, पिवळ्याधमक, हिरव्या, सप्तरंगी फुलपाखरांवर; तर कधी बाभळीच्या काट्यांत; कधी उंच उंच ऍन्टीनामध्ये; कधी इलेक्ट्रीकच्या तारांवर; कधी औदुंबराच्या झाडात; आणि कधी कधी परत निळ्या निळ्या आकाशात; रंगीबेरंगी पतंगांत!
पुन्हा एकदा त्या सुखद आठवणींमुळे निखील तरतरीत वाटू लागला.

“रस्त्यावर कित्येकदा पतंग पकडायच्या नादात जय्यत तयारीने निघायचो आणि कायम रहदारीला अडथळा करायचो. कित्येकदा अनेक मित्र या धांदलीत गाडीखाली सापडता सापडता वाचलेले... “
हे आठवताच निखीलच्या अंगावर सर्रकन काटा आला. पायाला बसलेल्या डांबराच्या चटक्याची आठवणही ताजी झाली.
“काय भयानक प्रसंग होता तो. पतंगाच्या मागे पळत पळत कुठे चाललोय याचे भानच राहिले नव्हते. आणि अचानक आपण किंचाळलो “आई ग!”
रस्ता दुरुस्ती चालू असताना आपण अनवाणी तिथे गेलो आणि काळाकुट्ट डांबराचा खडा पायात रुतला होता. नक्की वेदना कशामुळे होतायत हेच कळत नव्हतं. खडा पायात रुतला म्हणून की डांबर पोळले म्हणून!”

“आऽह!”
नकळत हलक्या आवाजात वेदना निखीलच्या ओठांवर आली. आठवणींतून भानावर येत निखीलने हात प्रतिक्षिप्तपणे झटकला. सिगरेट संपल्याने बोटापाशी जळणाऱ्या फिल्टरचा त्याला जोरदार चटका बसला. त्याने चटकन ते थोटूक खाली फेकले

…विषय असाच कुठून कुठे भरकटत गेला असता; जर निखीलला सिगरेटच्या थोटकाचा चटका बसला नसता.
तेवढ्या पाचच मिनिटांत निखीलच्या डोळ्यासमोरून अनेक संक्रांती निघून गेल्या होत्या. सगळ्या संक्रांती क्षणिकच का होईना पण वेगवेगळा आनंद देणाऱ्या, आज मात्र अगदी सगळ्या तशाच सरळसोट आणि आळणी वाटत होत्या. मागे राहात होती ती फक्त एक अनामीक हुरहुर…

“आज तसल्याही सुखाला आपण पारखे आहोत….”
हा विचार मनात येताच त्याला परत त्याच्या लाडक्याची आठवण झाली.

“आज छोकऱ्याला नक्कीच पतंग घेऊन जाऊ!”
किमान तेवढे तरी केलेच पाहिजे हा विचार निखीलच्या मनात आला.

गाडी काढण्यासाठी निखील वळला आणि क्षणभर सुन्न मनाने तिथेच थांबला. यापुर्वी कित्येक पतंग हातून फाटूनही, पावसाच्या हलक्या हलक्या सरींनी आकाशातच भिजूनही, भांडणात ते स्वतः फाडूनही त्याला जेवढे खिन्न वाटले नसेल तेवढे वाटू लागले. रोज तो त्या पतंग हॉटेलच्या रंग उडालेल्या पतंगाकडे पाहून हसायचा. आज त्याने स्वतः त्या पतंगात रंग भरले होते; पण डोळ्यातल्या पाण्यामुळे तेही धुसर झाले होते. त्याचे उजळलेले मन परत काजळू लागले.

त्याने फेकलेले जळके थोटूक नेमके एका फाटक्या पतंगावर जाऊन पडले होते; आणि तो पतंग रेषारेषांतून भुरुभुरु जळत होता. निखीलच्या आभाळात अनेक विनाधाघ्याचे अगतीक पतंग वाऱ्यावर फरपटत होते! फाटत होते!!

गोटा.......

देवा मला नर्मदेचा गोटाच कर पाहू
रोज रोज हे नवीन अपघात कसे साहू?

सगळ्याच आठवणी आता झाल्यात ओझे
हरेक क्षण फितूर, दुष्मन बनलेत माझे
चुकार, भिकार, टुकार, होकार, नकार
सगळेच विकार मुरलेत खोल आत आता
सांग ना मी एकटा कुणाकुणाला वाहू?
देवा मला नर्मदेचा गोटाच कर पाहू

मी घाबरतो आता माझ्याचसमोर यायला
आरसाही उठतो खायला, त्रास द्यायला
अहम, त्रास, मनस्ताप, विरह, एकटेपणा,
सगळेच ऐकवतात आपआपलेच रडगाणे
या सगळ्यांमध्ये “मी” कोरडा कसा राहू?
देवा मला खरंच नर्मदेचा गोटाच कर पाहू

घन आले घन गेले…


घन आले घन गेले
थेंब उदास राहिले काही,
मातीच्या हातास माझ्या
आभाळाची फाटकी बाही.

घन आले घन गेले
तुला तरी जाणीव नाही,
डोळे भरुन वाहते कशी
गर्द आसवांची शाई.

घन आले घन गेले
मी उजाडलेले पाही,
उन्हाच्या धमन्यांतुनी पुन्हा
दुःख सावलीचे वाही.

जगण्यात बदल हवाय…

आजचा दिवस मजेत गेला
उद्याचा दिवस सजेत जाईल…
जगण्याच्या काही खाणाखुणा
घेऊन हा श्वास हवेत जाईल.

कसल्या कसल्या बंधनात अडकत चाललोय मी?
स्वतंत्र झेंड्यासारखा म्हणे फडकत चाललोय मी!
रोज रोज,
तेच तेच,
तसंच तसंच,
पुन्हा पुन्हा…
पैसा,
नोकरी,
घर,
दार,
नाती,
माती…
रूटीनच्या ठसक्याने
पिचलेली खचलेली छाती.

मला जगण्यात बदल हवाय…

हे सगळं माझ्या हातात असून माझे पाय बांधलेले!

मला जगण्यात बदल हवाय…

थेंब थेंब साठता साठता… हातून पेले सांडलेले!

शब्दांशिवाय माझ्या सोबत दुसरं कोणीच नाही,
डोळ्यांमध्ये सर्व काही… फक्त पाणीच नाही…!!!

नकळत...........

जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ…
अगदी जमल्यासच (आणि लक्षात राहिलंच तर)
फक्त तुझ्या श्वासांची
एक पाकळी पाठवून दे माझ्याकडे
असं म्हणालो होतो माझ्याही नकळत.

माझं हे ‘नकळत’पणच
तू इतकं मनावर घेतलंस की,
समर्पणाची देठं लावलेल्या
लक्षावधी फुलांची वादळं
घेऊन आलीस माझ्या देहाच्या देशात!
जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ…

वळण............


तुझी आठवण आली
मी रडलोच नाही...
दिवसभर पाऊस पडला
मी भिजलोच नाही...

तासंतास म्हटल्या कविता
तुझा चेहरा मख्ख
तुला कविता आवडत नाहीत
मी समजलोच नाही...

आयुष्यभर हसवणूक केली
क्षणोक्षणी फसवणूक झाली
तुझ्या डोळ्यात आलं पाणी
मी फसलोच नाही...

जगणं म्हणजे झाला खेळ
भल्याबुऱ्याची नुस्ती भेळ
कणाकणाने क्षण गेले;
मी जगलोच नाही...

मुक्कामाला शोधत गेलो
ध्यास घेऊन चालत आलो
हवंहवंस वळण आलं
मी वळलोच नाही...

बिनातिकट........


'' मँडम, विदर्भ एक्सप्रेसला चव्वेचाळीस वेटिंग चाहे. सेवाग्राम देऊ का?'' तिकिटाच्या खिडकीतून विचारणा झाली अन् मी भानावर आले.
''अं.... त्याच तारखेचं का?''
'' आधीच्या दिवशीचं पण आहे, कोणचं देऊ''?
'' आदल्या दिवशीचंच द्या. साईड लोअर बर्थ.''
''तीनशे पाच रुपये.''
पैसे देऊन तिकीट घेऊन मी रांगेच्या बाहेर आले. भिंतीलगतच्या एका खुर्चीवर बसले. तशी रिझवर्हेशनची रांग फारशी मोठी नव्हती. मी खूप वेळापासून उभीही नव्हते. विशेष दमले होते अंसही नाही. पण बरेचदा असं होतं. रेल्वेच्या रिझर्व्हेशनच्या रांगेतून बाहेर आले की खूप उदास होते.

हातपाय गळल्यागत होतात, घशाला कोरडं पडते. विशेषत: जेव्हा दादर एक्सप्रेसचं तिकीट काढते तेव्हा तर हमखास.
हो, त्यावेळी या गाडीचं नाव 'दादर एक्सप्रेस' असंच होतं. रोज अप-डाऊन करणार्‍यांसाठी 'फॉट्टी अप' नागपूरहून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सुटायची, वर्धेला साडेअकराला यायची अन् पुलगावला बारा वीसला पोहोचायची.

मी तेव्हा पुलगावला राहून वर्धेला नोकरी करीत होते. तेव्हा गाड्या तीनच. ट्वेंटीनाईन डाऊन- थर्टी अप-हावरा एक्सप्रेस', 'वन डाऊन-टू अप हावरा मेल' आणि 'दादर एक्सप्रेस' बाकी दोन भुसावळ पॅसेंजर्स. तेव्हा रोज, आमचं थर्टीनाइन डाऊन आणि फॉट्टी अप.'

मधे एकदा नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्तानं नागपूरला यावं लागलं. तारीख-महिना आठवत नाही, पण साल होतं एकोणविसशे अडुसष्ट. नुकतीच अठरा वर्षे पूर्ण झाल्याने सरकारी नोकर्‍यांसाठी वणवण चालू होती. जणू काय त्या नोकर्‍या माझ्या सज्ञान होण्याचीच फक्त वाट बगत होत्या. असो. सकाळी नागपूरला आले, मुलाखत झाली आणि दुपारी आत्यांना भेटायला गोकुलपेठेत गेले.

थोड्या वेळात अचानक रेडिओवरून आणि रस्त्यारस्तयावरून रिक्षातून घोषणा सुरू झाल्या- 'शहरात दंगल उसळली आहे. नागपूरच्या विविध भागात कर्फ्यू लागला आहे. लोकांनी बाहेर पडू नये।'

मी हतबल. इथून स्टेशन कितीतरी लांब. आत्याकडे, मला स्टेशवर पोहोचवून द्यायला कोणी नाही. कर्फ्यू किवा दंगल किती वेळ चालेल काही अंदाज नाही. रात्री घरी परतणं आवश्यक होतें. दुसर्‍या दिवशी सकाळी शाळेत जायचं होतं-वर्धेला. कसेबसे दुपारचे चार वाजले. बातमी आली - 'दोन तासांसाठी कर्फ्यूमध्ये सूट दिली आहे. लोकं आपापली आवश्यक कामे करू शकतात.'

तडक निघाले नि धरमपेठच्या दिशेने चालू लागले. शुक्रवार बाजारातून जेमतेम लक्ष्मीभुवन चौकात पोहोचत होते. तोच तोच पुन: गोंधळ, पळापळ, आरडाओरड. लोकांनी थोड्याच वेळासाठी उघडलेली दुकानं फटाफट बंद करायला सुरुवात केली. मी काय करू? कुठं जाऊ? 'बॉम्बे बांगडी स्टोर्स' हे जुनं ओळखीचं दुकान.

लहानपणापासून तिथं जात आलेले, त्याच्याकडे कामही केलेलं. तिथं धावले. काका ... काका म्हणत हाका मारल्या. दुकानदारांनी दार उघडलं. नव्हे, किलकिलं केलं. तब्बल पाच वर्षांनंतर ते मला बघत होते. कुठ सातव्या वर्गात शिकणारी, फ्रॉकमधली शाळकरी मुलगी अन् कुठं आता नोकरी करणारी शिक्षिका... कसं ओळखणार होते ते मला? पर त्यांनी ओळखून दार उघडलं, चटकन आत घेतलं. प्यायला पाणी दिलं आपुलकीनं विचारपूस केली, मी जरा आश्ववस्त झाले.

तासामागून तास जात होते. दुकानात आम्ही तिघचं. काका, मी अन् त्यांच्या पोरसवदा नोकर. बाहेर काही सुरळीत होण्याचं लक्षण दिसेना. सध्याकाळचे साडेसात वाजत आले. काही सुचत नव्हतं. मधूनमधून कोणीतरी काहीतरी बोलून मनावरचा ताण हलका करायचा दुबळा प्रयत्न करीत होते.

'तू थोडावेळ इथंच थांब. मी तुझ्या जेवणाची सोय बघतो.' काका म्हणाले अन् मला जाणवलं आपल्याला खूप भूक लागली आहे. सकाळपासून अक्षरश: काही ही खाल्लेलं नव्हतं. काका नोकराला घेऊन गेले. दुकानात आता फक्त मी. प्रचंड भीती, एकाकीपणा, अस्वस्थता, असुरक्षितता. मनात नाही नाही ते वाईटच विचार, घरी पोहोचण्याची काळजी, सगळ्या गोष्टी नुसत्या थैमान गालीत होत्या. काका केव्हा आले, त्यांनी माझ्यासाठी काय आणलं होतं, मी काय जेवले, काहीही समजलं नाही.

साडेआठ वाजले आणि कर्फ्यूमध्ये थोडी शिथिलता जाहीर झाली. आम्ही मागच्या दारानं बाहेर आलो. दोनचार रिक्षावाले चौकात होते. रेल्वेस्टेशनवर यायला कोणीही तयार होईना. काकांनी बराच प्रयत्न केला तेव्हा एक रिक्षावाला कसाबसा तयार झाला. माझ्या तर संवेदनाच बधिरल्या होता.

'' तो जितके मागेल तितके पैसे दे.'' काकांनी म्हटलं. मी यांत्रिकपणे मान डोलावली. असहाय मानत विचार आला. 'जवळ फक्त पाच रुपयाची नोट आहे. वर्धेपर्यंतचं तिकीट काढायचं आहे. पुढचा पास असला तरी वर्धेपर्यंत तर तिकीट काढावं लागेल.' मनातल्या दडपणामुळे रिक्षावाला कुठून नेतो आहे तेही समजत नव्हतं.

मातामंदिर, धरमपेठ पेट्रोल पंप, व्हेराटी चौक, पटवर्धन हायस्कूल - रस्त्यात लोकांचे जथ्थे. दहशतीचं वातावरण. या अशा भलत्या दिवशी, भलत्या वेळी-एकटी मुलगी रिक्षात बघून लोकांचे विस्फारलेले डोळे, हलकी कुजबूज-सगळं नुसतं जाणवत होतं. काहीही विचार करणं शक्य नव्हतं. ती शक्तीच जणू शिल्लक नव्हती. स्टेशनवर पोहाचले तेव्हा स्टेशनच्या घड्याळात पावणेदहा वाजले होते.

रिक्षातून उतरले. पाच रुपयाची नोट रिक्षावाल्याच्या हातात ठेवली अन् दीनपणे शब्द जुळवत जुळवत म्हटलं- ''यातले दोन रुपये द्या हो मला पुलगावला जायचंय्. वर्धेपर्यंत ति‍कीट काढावं लागेल.''

''बादमें क्या करोगी?'' प्रश्न आला अन् मी रिक्षावाल्याकडे बघितलं. जाळीचा गंजीफ्रॉक, निळी पॅट अन् जाळीची क्रोशाची टोपी घातलेला तो एक मध्यमवयीन मुस्लिम माणूस होता. माझा श्वास वरचा वर तर अन् खालच्या खाली अडकला. आता यांन जास्त पैसे मागितले तर? माझ्या डोळ्यापुढे आंधारी यायला लागली.

''मेरे पास छुटे नही है! लो बेटी, ये पैसे अपने ही पास रखो. काम आएंगे- और अब टिकट कब कटाओगी? ट्रेन छुटने को है- चलो मेरे साथ.''
मी मंतरल्यासारखी त्याच्या मागे निघाले, स्टेशनवर पाय ठेवायला जागा नाही अशी स्थिती. त्यात आर. एम. एस.च्या ऑफिसकडून मला प्लटॅफॉर्मवर नेलं.

बायकांच्या डब्यात बसवलं, म्हणाला, '' डरना नही आज गाडी में टी.सी. नही आने वाला वर्धा तक तो किसी भी हाल में नही. आये तो पेनॉल्टी भर देना. पाच रुपये में हो जाएगा. '' काही बोलायच्या आत तो दृष्टिआड झाला. मी वेंधळल्यासारखी, खांद्यावर पर्स, हातात पाचची नोट अन् पायात येणारी साडी सावरत उभी. मनावर प्रचंड दडपण.

अंगाला दरदरून घाम फुटलेला, पाय लटपटत होते. गाडी सुटेपर्यंत डब्याच्या दिशेने येणारा प्रत्येक माणूस टी.सी भासत होता. एकदाची गाडी सुटली. मी आयुष्यात पहिल्यांदी, शेवटचा बिनतिकीट प्रवास केला. नागपूर ते वर्धा.

''कशाला आली एवढ्या दंगलीत वेड्यासारखी एकटी? तुला मामाकडे जाता नाही आलं?'' ही रामकहाणी ऐकून आई कडाडली.
माझ्या मनात येत होतं - ' ही पाचची नोट आपल्याला आयुष्यभर जपून ठेवता येईल का?''

'प्रेमात पडतांना' ......


तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं।


तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं।


तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं।


हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला।
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं।


ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता।
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...

जीवलागण...............


मी अख्खं भूमंडळ पालथं घातलं असतं

तुझ्या डोळ्यात मला हवा तोभाव शोधण्यसाठी

मी आकाश-पाताळ एक केलं असतं

तुला माझ्यात गुंतवण्यासाठी



पण तू कसा क्षणात उतरविलासमाझा तोरा

वाटे कुणीतरी अलगदफुलासारखा

झेलावा माझा जिव्हाळा

कैक जन्म माझे तयार होते

केवळ अशा एका क्षणावरकुर्बान व्हायला



तू विचारलंस.....

तुझ्या मनात डोकावणारा 'तो' कोण

मी पुन्हा पुन्हा समजावेत

माझाच दृष्टिकोन

मी खरंच नव्हते कातुझ्या खिजगणतीत

अन् मला वेडीला वाटायचं

तू स्रवतोयस आपली


जीवलागण

केवळ माझ्याचसाठी

मग हा दळभद्री आत्मसन्मानाचा

सोहळा तरी कशासाठी

असो, माझे खिन्न उसासे

मला खिजवत म्हणतील की

की तुझा जन्म यासाठी, याजसाठी

त्याने नवीन सावली शोधताच

उन्मळून पाडण्यसाठी.


Friday, July 27, 2007

तोलोलिंग......

आजची रात्र कालच्यासारखी वादळी नाहीये। वारा साफ पडलाय. आभाळही निरभ्र आहे. काल इथेच ढगांची भाऊगर्दी झाली होती हे कोणाला खरं वाटेल? रात्र असूनही समोरची बर्फाच्छादित शिखरं स्पष्ट दिसतायत. चांदण्या रात्री चमचमणारा बर्फ म्हणजे डोळ्यांना मेजवानीच नाही का? पण आज? नाही. आज ही शिखरं ढगांच्या आड जातील तर बरं असंच वाटतंय.

आकाशातली ही ताऱ्यांची आरास नजरेआडच राहिलेली बरी। कधी केली होती माझ्या घराला मी अशी आरास? दिवाळीत? होय, गेल्या दिवाळीतच. दारात काढलेली रांगोळी, त्या रांगोळीच्या शेजारी ठेवलेल्या पणत्या, फराळाचे पदार्थ? नकोच तो फराळाचा विचार. मेलेली भूक पुन्हा जिवंत व्हायची. आणि काय बरं केलं होतं गेल्या दिवाळीत? शकूबरोबर उडवलेले फटाके. होय फटाकेच. हा फटाक्यांचा आवाज कुठून येतोय? इथे? फटाके?.....

आजूबाजूच्या डोंगरमाथ्यावरून कव्हर फायरिंग सुरू झालं वाटतं? म्हणजे आमची दुसरी तुकडी जवळ आली असणार। किती जवळ? खालच्या रिज पाशी? नाही शक्य नाही नाहीतर डोक्यावरून गोळ्यांचा पाऊस पडताना दिसला असता. बरेच दूर असावेत. थांबलं फायरिंग. नसतीलच जवळपास. नाहीतर फायरिंग थांबलं नसतं लगेच. किती शांत वाटतंय आता? जसं काही शांततेनेच आपली बंदूक त्या फायरिंग करणाऱ्याच्या कानशिलाला लावून चाप ओढला. काश....

आम्ही सगळे एकमेकांशी नजरेनेच बोलतोय। टोकाचे दोघे वाकून कोणी जवळ नसल्याची खात्री करतात. खरंतर तिथून काहीच दिसत नाही. पण खात्री केलेली बरी म्हणून. नक्कीच फायरिंग आजूबाजूच्या डोंगरातून झालं. डोक्यावर तोलोलिंग शांतपणे निद्रिस्त झाल्यासारखा वाटतोय. टोकाचे दोघे मध्ये येऊन बसतात. मी एक रिकामा झालेला कोपरा पकडतो. मोठी विचित्र परिस्थिती आहे. आम्ही तोलोलिंगच्या एवढे जवळ आहोत, पण तिथे पोहोचू शकत नाही. ना खाली परतू शकत. शत्रूच्या बंदुकींना माहितेय आम्ही इथे आहोत. पण त्यांना आमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. मागच्या खडकाचा भक्कम आधार आणि समोरचा फ्री फॉल आम्हाला सुरक्षित ठेवतायत. गेले दोन दिवस.

आम्ही सगळे एकमेकांशी नजरेनेच बोलतोय। टोकाचे दोघे वाकून कोणी जवळ नसल्याची खात्री करतात. खरंतर तिथून काहीच दिसत नाही. पण खात्री केलेली बरी म्हणून. नक्कीच फायरिंग आजूबाजूच्या डोंगरातून झालं. डोक्यावर तोलोलिंग शांतपणे निद्रिस्त झाल्यासारखा वाटतोय. टोकाचे दोघे मध्ये येऊन बसतात. मी एक रिकामा झालेला कोपरा पकडतो. मोठी विचित्र परिस्थिती आहे. आम्ही तोलोलिंगच्या एवढे जवळ आहोत, पण तिथे पोहोचू शकत नाही. ना खाली परतू शकत. शत्रूच्या बंदुकींना माहितेय आम्ही इथे आहोत. पण त्यांना आमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. मागच्या खडकाचा भक्कम आधार आणि समोरचा फ्री फॉल आम्हाला सुरक्षित ठेवतायत. गेले दोन दिवस.

घोंघावू लागलेला वारा मला भानावर आणतो। समोरच्या डोंगरातून फायरिंगचे आवाज येतातच आहेत. सगळ्या गोळ्यांचा उद्देश एकच. तोलोलिंग. तोलोलिंग, सोळा हजार फूट उंचीवर असलेलं. कारगिल जिल्ह्यातील एक शिखर. भारताच्या उन्हाळी चौक्या इथे बसत. हिवाळ्यात रिकाम्या केल्या जात. मीही आलो होतो ह्या भागात. पण आज? एक वेगळंच ध्येय, एक वेगळीच कामगिरी. इथून समोरचा श्रीनगर लेह मार्ग नजरेच्या आणि तोफांच्याही पट्ट्यांत.

पायात घातलेले बूट लागत होते कालपर्यंत। चालून चालून झालेल्या जखमा. बर्फदंश. आज मात्र सगळंच बधिर झालंय. सोळा हजार फूट उंची. -५ ते -११ डिग्री तापमानात चढायचं म्हणजे हट्ट्या कट्ट्या जवानालाही अकरा तास लागणार कमीत कमी. आम्हाला किती वेळ लागला? सगळी गणतीच खुंटलेय. कुठे सुरवात केली, कसे इथे पोहोचलो, काही काही आठवत नाहीये. आठवतायत फक्त वरून रोखलेल्या बंदुका, माझा वेध न घेता गेलेल्या गोळ्या, वरून येणारे हातबाँब, कोसळणारे दगड. आठवतायत माझे आईवडील, बायको आणि हो शकू. गोळ्या इथे बरसत होत्या. ते माझ्या गावात सुरक्षित आहेत. पण दोघांचं लक्ष्य एकच. मी. आणि हो. आठवतायत तोलोलिंगवर मरून पडलेले माझे साथीदार. त्या माझा वेध न घेता गेलेल्या गोळ्यांसाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि तोलोलिंगवर पडलेल्या माझ्या साथीदारांच्या शवांसाठी मला जगायचंय, मला लढायचंय, मला तोलोलिंग जिंकायचंय.

बाजूलाच माझा बॅकपॅक पडलाय। काहीतरी घडण्याची वाट पाहतोय बिचारा. निघालो तेव्हा पंचवीस किलोचा होता. आता किती? नक्कीच कमी झाला असणार. अन्न, पाणी, हातबाँब, सगळं संपलंय. ऍकॅडमीत शिकवलं होतं. चालायला सुरवात केल्यावर थोडा वेळ बॅकपॅकचं वजन वाटतं. थोड्या वेळाने मात्र तो शरीराचाच एक भाग होऊन जातो. खरंच. पण किती विरोधाभास आहे त्यांतसुद्धा? खालून निघताना कमीत कमी वजन असावं असं वाटतं. आता इथे वाटतंय पंचवीस किलोपेक्षा थोडं जास्त घेता आलं असतं तर? अजून थोडं अन्न? पण शेवटी ट्रेड ऑफ करावा लागतो. दोन किलो अन्न की शंभर बुलेटस? अन्न नसेल तर भुकेने मरणार, गोळ्या नसतील तर शत्रूच्या गोळीने मरणार. कसं मरायचं? उघड्या बॅकपॅकमधल्या गोळ्यांकडे मी बघत राहतो.

पोटातले कावळे आता ओरडण्याच्या पलीकडे गेलेत। किंवा ते गारठून मेले असतील. पण मला मरायचं नाहीये. नाही मरायचं मला. नकळत हात खिशाकडे जातो. मी एक सिगरेट काढून शिलगावतो. वाह! काय हल्लक वाटतंय. आता हेच अन्न आणि हीच करमणूक. मी जर ह्या सिगरेटच्या धुरासारखा असतो तर? असाच हल्लक होऊन वरपर्यंत गेलो असतो. तोलोलिंगवर. त्या भडव्यांच्या डोक्यात गोळ्या घालूनच शांत झालो असतो. शेजारचा सिगरेटचा झुरका मागतो. मी पुन्हा भानावर येतो. पुन्हा एकदा आजूबाजूला कोणी नाही ह्याची खात्री करून घेतो. आमच्या बंदुकींचा सामना केल्याशिवाय इथे पोहोचणं अशक्य आहे. शक्य असतं तर दोन दिवसात एकदातरी आलेच असते.

आजूबाजूला प्रकाश वाढत चालल्यासारखा वाटतोय। अजून एक सकाळ. अजून एक रात्र. किती वेळ थांबायचं? वाटतं सरळ ह्या खोपच्यातून बाहेर पडावं, झेलाव्यात छातीवर शत्रूच्या गोळ्या आणि संपवून टाकावा हा उंदीर मांजराचा खेळ. जाता जाता शत्रूच्या दोघा तिघांनाही घेऊन जावं. माझ्यासारखेच असतील का ते दोघं तिघं? देशासाठी मरायला तयार असलेले पण तरीही मरायला तयार नसलेले? असतील का त्यांची घरं माझ्यासारखी? त्यांचे परिवार माझ्यासारखे? नक्कीच असतील. मग कशासाठी हे सगळं? त्यांनी मला मारलं तर माझ्या लोकांचे शिव्याशाप त्यांना. मी त्यांना मारलं तर त्यांच्या लोकांचे शिव्याशाप मला. हे असंच व्हायला हवं का?........

..... सर .... आमच्या पाठीशी दोन दिवस संरक्षक म्हणून उभ्या असलेल्या खडकाच्या भेगेतून आवाज येतो। हा खडक सरळ वरपर्यंत एकसंध आहे आणि त्यात ही भेग वरपर्यंत..... हमारे पास हथियार नही है. आप उपर आके आपके ऑफिसरकी बॉडी ले जाईये ........ पाठीमागून छद्मी हसण्याचा आवाज. आवाजातला खुनशीपणा स्पष्ट जाणवतोय. आमच्या हतबलतेला हसतोय साला. अरे गांडीत दम असेल तर ये ना खाली...... हम सिर्फ अपने ऑफिसरकी नही, तुम्हारीभी बॉडी लेकर जायेंगे...... आमचा कॅप्टन गरजतो. गोठलेलं रक्त पुन्हा सळसळू लागतं. थकलेले बाहू पुन्हा स्फुरण पावू लागतात, कारण मला लढायचं असतं. त्या हुकलेल्या गोळ्यांसाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि तोलोलिंगवर बेवारस पडलेल्या माझ्या मित्रांच्या शवांसाठी. माझ्या देशासाठी. आणि हो माझ्यासाठी.

सकाळ आता चांगलीच भरात येत असते। आणखी एक रात्र, आणखी एक सकाळ, आणखी एक युद्ध. शत्रूशी नि स्वतःच्या मनाशी. तोलोलिंग, तोलोलिंगसाठी.

***********************************************************************************


१३ जून १९९९ रोजी तोलोलिंग भारतीय सेनेने पुन्हा जिंकलं. कारगिल युद्धात कामी आलेल्या एकूण जवानांपैकी अर्धे जवान तोलोलिंग घेताना मृत्युमुखी पडले. ही लढाई ३२ दिवस चालली. सुरवातीच्या लढाईत तेवीस वर्षीय कॅप्टन सचिन निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माघार घेत, तीन दिवस, एका अशा ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता, की जिथे, समोर खोल दरी आणि पाठी कडा होता. ह्या ठिकाणाहून आपले जवान आणि शत्रू एकमेकाला बघू आणि बोलूही शकत होते. त्या प्रसंगावरून बेतलेले हे लिखाण आहे. पण मूळ संकल्पनेशिवाय बाकी सर्व लिखाण हे काल्पनिक आहे.

गतस्मृति...................

सध्या टिव्हिवर एक उद्वेगजनक जाहिरात लागते. कुठल्याश्या साबणाची. एक मुलगी (आता साबणाची जाहिरात आहे म्हणजे ती तरुण आहे हे सांगायला नकोच) 'मी आता उटण्याने स्नान करायला जाते' अशी घोषणा करते. त्यावर (तिच्या) घरातल्या सर्वांनाच धन्यधन्य वाटतं आणि तिची आजी येऊन तिची आरती करते! ही महान जाहिरात संपल्यावर आम्ही एकमेकांच्या चेहेर्‍यांकडे पाह्तो. सगळ्यांनाच ही जाहिरात पाहिल्याचा पश्चात्ताप झालेला दिसतो आणि आपसूकच पूर्वीच्या म्हणजे ऐंशी-नव्वदच्या सुमारातल्या जाहिरातींचा विषय निघाल्याशिवाय रहात नाही. घरात अलिकडे बर्‍याचदां हा दिषय छेडला गेला आणि भराभर एकेक जाहिराती, त्यांच्या कॅप्शन्स, जिंगल्स आणि पात्रांसकट आठवत गेल्या..एकामागोमाग एक. आणि मग आठवल्या तश्या लिहून ठेवाव्याश्या वाटल्या. काही शब्द चुकीचे असण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्हाला ते माहित असतील तर जरुर सांगा.

दिल्ली दूरदर्शन आणि फ़ारतर डीडी मेट्रो एव्हढ्यातच टिव्हिचं विश्व सामावलेल्या तेव्हाच्या काळात मस्त सिरियल्स आणि जाहिराती असायच्या। सिरियल्स शिस्तीत १३ भागांमध्ये आटपायच्या. खरं तर त्यावेळच्या सिरियल्स हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. बुनियाद, चुनौति, ये जो है जिंदगी, कच्ची धूप, खान्दान, फ़ौजी, उडान पासून ते आमच्या बालमनाला सुखावणार्‍या स्पायडरमॅन, विक्रम और वेताल, ही-मॅन, जंगल-बुक, डीडीज कॉमेडी शो, टेलिमॅचेस या सर्वांचे धागे जाहिरातींनी जोडले गेलेले असत. चाल, बोल, थीम या सर्वच अंगांनी परिपूर्ण असणार्‍या तेव्हाच्या जाहिराती कधीच संतापजनक किंवा अश्लिल वाटल्या नाहीत.

इलेक्ट्रिकल बल्ब आणि ट्युब्ज तयार करणार्‍या 'बजाज' ची जाहिरात मला सर्वात आवडायची। बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या तिन्ही स्टेजेस मधून आता सुमारे सत्तरीचे असलेले आजोबा सांगतात,

जब मैं छोटा बच्चा था
बडी शरारत करता था
मेरी चोरी पकडी जातीsssss
जब रोशन होता बजाज

क्या रंगीन जवानी थी
इक राजा इक रानी थी
राजा रानी शर्मा जातेsssss
जब रोशन होता बजाज

अब मैं बिल्कुल बुढा हूं
गोली खाकर जीता हूं
लेकीन आज भी घर के अंदरssss
रोशन होता बजाज

तशीच बजाज स्कूटरची जाहिरात। एकेक दृश्य त्यातलं इतकं भावणारं होतं आणि ओळीही चटकन लक्षात राहणार्‍या. "बुलंद भारत की बुलंद तसबीर...हमारा बजाज"



अजून एक गंमतीदार जाहिरात होती। ब्रिटानिया कोकोनट बिस्किटांची. त्या जाहिरातीचे बोल असे होते:

एक नारियल पेड से टूटा
गिरते ही वो बीचसे फ़ुटा
सेक कापकर उसे पकाया
खूब कुरकुरा उसे बनाया
ब्रिटानिया कोकोनट क्रंची



दुसर्‍या ओळीत नक्की काय शब्द होते आता आठवत नाहीत। पण शेवटी नारळ एका झटक्यात फ़ोडलेला दाखवायचे आणि आतमधून मस्त तयार गोल गोल बिस्किट्स बाहेर पडायची. आमच्या निरागस मनाला ते खरं वाटल्याने जेव्हा जेव्हा घरी नारळ फ़ोडला जायचा तेव्हा आतमधून तशीच बिस्किट्स बाहेर पडतील का असं वाटायचं.

परवा सुरभि बघताना अजून एक आवडती जाहिरात अचानक समोर आली। 'अमुल्या' ची. इतक्या वर्षांनी ती जाहिरात पाहताना इतकी मजा वाटली! तश्या अमूलच्या सर्वच जाहिरातींचा जवाब नाही पण ही जाहिरातसुद्धा छान होती. स्मिता जयकर किती यंग दिसतात यात!

वही कॉफ़ी वही चाय
पल मैं नया स्वाद जगायें...
अमूल्या..!
बस! यूं घुलमिल जाय
स्वाद निखारे
रंग जमाये..
अमूल्या...!

अमूलचं नाव निघालंच आहे तर अमूलच्या जिंगल्सची उजळणी झाली नाही तर या आठवणी अपूर्ण राहतील। चारोळींच्या साध्या सोप्या जिंगल्स छोटी मुलं म्हणतात वेगवेगळ्या प्रसंगी. अमूल श्रीखंड खाण्याचे हे प्रसंग कसे विसरता येतील!

मेहेमान जो आयेंगे
मौके मिल जायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!

पार्टी मनायेंगे
सबको बुलायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!

शादी मैं जायेंगे
बाजा बजायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!


एरवी पान-तंबाखूचा कितिही तिटकारा असला तरी पानमसाल्याच्या जाहिराती कधीच चुकवल्या नाहीत। पानपरागची ती अशोक कुमार आणि शम्मी कपूरची जाहिरात विसरणं कसं शक्य आहे! त्यातले ते खास डायलॉग्ज.........

"सुनिये लडके के मा-बाप आये है" मुलीची आई किंवा कोणीतरी म्हणतं।

"आयिये आयिये॥" नेहेमीच स्वागत समारंभ।

" बारा्त ठिक आठ बजे पहूच जायेगी। लेकिन हम आपको एक बात कहना तो भूल ही गयें! " शम्मी कपूर।

सर्वजण टेन्शनमध्ये एकमेकांकडे बघतात। लगेच शम्मी कपूर पुढे,

"घबराइये नही! हमें कुछ नही चाहिये। हम तो सिर्फ़ इतना चाहते हैं की आप बारातियों का स्वागत पानपराग से किजीये।"

हे ऐकल्यावर रिलॅक्स झालेले अशोक कुमार पानपराग हळूच काढून म्हणतात,

"ओह हमें क्या मालूम आप भी पा्नपराग के शौकीन हैं! ये लिजिये पानपराग!"

पान-पराग पानमसाला॥ पान पराग!!


पिक्चर पहायला बाहेर थिएटरमध्ये गेल्यावर सिनेमा सुरु व्हायच्या आधी दोन जाहिराती लागल्याशिवाय सिनेमा सुरु होत नसे। एक ही पान-परागची आणि दुसरी विकोची 'कुदरत' वाली लांबलचक जाहिरात. त्यापैकी पान-परागचं 'लेकीन हम आपको एक बात कहना तो भूल ही गये' हे वाक्य आमच्या मित्रमंडळीत अजूनही वापरलं जातं.


दुसरी एक 'पान-पसंद' ची जाहिरात लागायची। छोटी आणि छान. पान-पसंद खाल्यावर माणसाचा मूड कसा बदलू शकतो ते अर्चना जोगळेकर मस्त दाखवायची, आधी रागात येऊन:

"शादी? और तुमसे? उफ़! (इथे ती सॉलिड नाक मुरडते ते शब्दांत लिहिणं कठीण आहे।) कभी नही!"

आणि मग पान-पसंद खाऊन ती तेच वाक्य लाडात म्हणते। :))

पान-पसंदचीच मला वाटतं भारती आचरेकरांचीही जाहिरात होती। त्याचे शब्द नेमके नीट आठवत नाहियेत. "मुझे गुस्सा मत दिलाओ...अपनी बीबीपर हुकुम चलाते हो?" असं काहिसं त्या प्रथम रागात आणि नंतर मऊपणे म्हणतात. :)

डाबरच्या जाहिरातीत अमिताभ असणं आता अपरिहार्य झालेलं असलं तरी त्यामुळे डाबरची पूर्वीची ही जाहिरात मी कधीच विसरु शकणार नाही। एक टिपीकल हिंदी मिडियम स्कूल आणि तीच खाकी कलरच्या गणवेशातली मुलं वगैरे. वर्गात फ़ळ्यावर मानवी दातांची आकृति काढली आहे.


मास्तरजी: बच्चोंSSS ये है हमारी दातों की बनावट। राजू! तुम्हारे दात तो मोतियों जैसे चमक रहे हैं...

(मास्तरांचे दात अतिशय वाईट आहेत)

राजू: क्यों ना हो मास्तरजी! मैं डाबर का लाल दंतमंजन जो इस्तमाल करता हूं।


हल्लीच्या कुठल्याश्या टूथपेस्टच्या जाहिरातीत प्रत्येकाची दातांची कवळी तोंड उघडल्यावर कॅमेर्‍याच्या फ़्लॅशसारखी चमकताना दाखवली आहे। अतिशयोक्ती हा जाहिरातविश्वाचा अविभाज्य भाग मानला तरी इतकी अतिशयोक्तीही खटकते, खरं तर हास्यास्पद वाटते. टूथपेस्टने टूथपेस्टचं काम करावं, बल्बचं नाही. म्हणून टूथपेस्टची जाहिरातही टूथपेस्टचीच वाटली पाहिजे आणि बल्बची जाहिरात बल्बचीच. बल्बवरुन आठवली जुनी ECE बल्बज आणि ट्युब्जची जाहिरात. एका गृहस्थाला बायको, शेजारीपाजारी सर्वजण ECE बल्ब आणण्याची पावलापावलावर आठवण करुन देतात.


"भूल न जाना
ECE बल्ब लाना
बाबाबा बल्ब...
ज्यादा दे उजाला
दिनोंदिन चलनेवाला
ECE bulb and ECE tube!


जावेद जाफ़रीच्या 'सिनकारा'ची जाहिरात 'ऑल टाईम फ़ेवरीट' प्रकारात मोडते। या जाहिरातीचे बोल आजही ऑफ़िसांमध्ये बोलले जातात यात शंका नाही.

"ये बेचारा
काम के बोझ का मारा
इन्हें चाहिये
हमदर्द का टॉनिक
सिनकारा"


किंवा 'कोल्डरीन' ची जाहिरातही ऑफ़िसमध्ये एखाद्याला सतावायला उपयोगी अशीच होती। एखाद्याचे हाल कामामुळे (खरं तर बॉसमुळे) बेहाल झालेले दिसले की त्याच्याभोवती कोंडाळं करुन त्याला अजून त्रास द्यायचा.....


"ये क्या हाल बना रखा हैं"
"कुछ लेते क्यूं नही.."
मग शेवटी एकासुरात,
"कोल्डरीन ली?"


जाहिरातींचा विषय 'निरमा'ची आठवण निघाल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही। सर्व वॉशिंग पावडरी, साबण बार यांची राणी म्हणजे निरमा. काळानुसार अवतीभवती कितीही बदल झाले तरी निरमाची फ़्रॉकातली मुलगी गोल फ़िरायची काही थांबली नाही. नाही म्हणायला निरमाच्या जाहिराती बदलत गेल्या पण निरमाचे "निरमा...निरमा, निरमा डिटर्जंट टिकिया, इसके झाग ने जादू कर दिया" हे बेसिक बोल विसरता येणार नाहीत. नंतरही दिपिकाची (म्हणजे रामायणातली सीता) 'निरमा सुपर' ची जाहिरात बर्‍यापैकी प्रसिद्ध झाली होती ज्यात दुकानदार तिला "मान गये" "किसे?" "आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोंको" अशी दाद देतो. साबणाचाच विषय निघालाय तर एक जाहिरात माझ्या डोक्यात फ़िक्स बसली आहे. पण ती रेडिओवर लागायची. मला वाटतं डबल बी किंवा अशाच काही नावाच्या साबणाची ती जाहिरात होती.

ये ढेर से कपडे मैं कैसे धोउं
अच्छा साबुन कौनसा लाऊ
कपडों को जो उजला बनायें
उम्र बढायें, चमक लायें
कोई बता दें, मुझकॊ कोई बतादें


दिवसातून एकदा तरी ह्या ओळी कानावरुन गेल्या नाहीत असं कधी झालं नाही। :)

खरंच तो काळ किती छान होता॥असं आता हजारदा वाटतं। निर्व्याज हास्याचा आणि निरागस बाल्याचा. संध्याकाळी खेळताना आवडत्या जाहिरातीचे सूर कानावर पडले की घरी धावत असू आम्ही. रविवार 'रंगोली' ने सुरु होऊन 'विक्रम वेताळ'सारख्या मालिकांनी अधिक रंगत जायचा. चिंता कधी केलीच तर दुसर्‍या दिवशी असणार्‍या शाळेची. त्यापलिकडे विश्वच कुठे होतं! टीव्हीचे हे दोनच चॅनेल्स आम्हांला पुरुन उरायचे. पण आता शंभर चॅनेल्सच्या गर्दीत हे दोन्ही हरवून गेलेत!!

पण अलिकडेच ऐकलं, 'व्योमकेश बक्षी' डीडी-१ वर परत सुरु केलंय म्हणे.......पहायला हवं....कदाचित त्याबरोबर जुन्या जाहिरातीसुद्धा लागतील।! :)

दु:ख.............

लहरत गेले झाड धुक्यातून

अन हसले आभाळ जरासे

थेंब दवाचे असे थबकले

अन फसले आभास जरासे॥


तळ्याकाठची रानकेतकी

झुके तळ्याशी उगीच जराशी

रुप न्याहाळता डोहामधले

थरथरले थेंब जरासे॥


उगीच हसणे रुसणे उगीचच

कारणाविना अन मुसमुसणे

गीत स्वरांचे ओथंबलेल्या

ऐकुनि थांबले पक्षी जरासे॥


ती येता मग गर्द सावली

डोहामध्ये अंधार साचला

स्मितांच्या प्रतिबिंबाखालून

एक जन्मले दु:ख जरासे॥

मुंबई, मराठी आणि मराठी माणूस

खरंच मुंबईचा मराठी आणि मराठी भाषिकांशी संबंध उरलेला नाही का? विविध आक्रमणांना तोंड देत केरळी, तमिळ आणि बंगाल्यांनी आपली अस्मिता राखली. पण मुंबईकरांनी मात्र 'मराठी'ची नाळ तोडली आहे...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुंबई, मराठी आणि मराठी माणूस या विषयावर लिहायचे ठरवले, तेव्हा ही एकाच विषयाची तीन अंगे आहेत असे वाटले होते; पण त्याविषयी अधिक विचार करू लागलो, तेव्हा असे ध्यानात आले की, हा एक विषय नसून तीन स्वतंत्र विषय आहेत व त्यांचा एकमेकांशी संबंध लागेलच, असे नाही. म्हणजे असे की, मुंबईचा मराठीशी संबंध नाही, मराठीचा मराठी माणसाशी संबंध उरलेला नाही आणि मराठी माणसाचे मुंबईशी काहीच नाते शिल्लक नाही. हा असा गोंधळाचा आणि दुर्दैवी मामला आहे. त्यावर चर्चा करणेही क्लेशकारक असले, तरी हे शहर, ही भाषा आणि हा माणूस जगवायचा असेल, तर त्यावर आत्ताच आणि सर्व राजकीय व सांस्कृतिक अभिनिवेश बाजूला ठेवून विचार व्हायला हवा.

खरेच मुंबईचा मराठीशी आणि मराठी भाषिकांशी संबंध उरलेला नाही का? काहीजण त्वेषाने आणि मुठी आवळून गर्जतील, मुंबई मराठी माणसाचीच आहे. या महापालिकेची भाषा मराठी आहे. दुकानांवर मराठीतून बोर्ड लावण्याची सक्ती आहे. बेस्ट बसेसवरच्या पाट्या मराठीत आहेत आणि हुतात्मा चौकाजवळ कोरण्यात आलेल्या १०५ हुतात्म्यांपैकी बहुतेक नावे मराठी भाषिकांचीच आहेत. हे सारे खरे आहे. त्यापेक्षा महत्त्वाची बाब ही की, मुंबईच्या २२७ नगरसेवकांपैकी बहुसंख्य मराठी भाषिक आहेत. ३४ आमदारांमध्येही बहुसंख्य मराठी आडनावेच दिसतील. सहापैकी दोन खासदार मराठी आहेत. सर्व राजकीय पक्षांचे मुंबईचे अध्यक्ष मराठी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (सध्या तरी!) आणि महापौरही मराठी आहेत. तरीही या शहराचे मराठीपण हरवले आहे, हे वास्तव मान्य करावे लागते.

पहाटे उठल्यावर आपण 'जागरण'मध्ये कबिराचे दोहे, मीरेची भजने आणि पंकज उधासची भक्तिगीते ऐकतो, नंतर ब्रेकफास्ट घेताना टाइम्स वाचतो. रिक्षावाल्याला 'अंधेरी वेस्ट को चलो'ची आज्ञा फर्मावतो, नंतर तिकिटाच्या खिडकीत डोके खुपसून 'चर्चगेट रिटर्न' मागतो. ट्रेनमध्ये शेजारच्या प्रवाशाशी 'आज स्टॉक कितना उपर जायेगा?' याची चर्चा करतो. ऑफिसात बॉस आणि सहकाऱ्यांबरोबर फर्मास इंग्रजीत व्यवहार करतो. लंच अवरमध्ये फिल्म फेअर किंवा मिरर वाचतो. बेस्टच्या कंडक्टरशीही न चुकता हिंदीतच बोलतो. संध्याकाळी मुलाचा होमवर्क तपासतो आणि नंतर साँस आणि बहूच्या सिरियल्स बघत झोपी जातो.

मराठीशी आपला संबंध येतो कधी?

आपण न चुकता मराठी पेपर वाचतो, कधी मराठी नाटकाला जातो, सणाच्या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड खातो, गणपतीला धोतर नेसतो आणि रामदासांची 'सुखकर्ता, दु:खहर्ता...' आरती जोरजोरात म्हणतो आणि मुंबईत मराठी माणसाचे काही खरे नाही, असे म्हणत मराठी राजकारण्यांच्या नावाने बोटे मोडतो. मुंबईतील मराठी माणसाचा मराठीशी इतकाच संबंध उरला आहे.

दक्षिण मुंबईतील गिरगाव, मध्य मुंबईतील गिरणगाव, दादर, विलेपार्ले, गोरेगाव या मुंबईतील मराठी माणसाच्या परंपरागत वसाहती. आज परिस्थिती अशी आहे की, यापैकी एखादा अपवाद वगळता कुठेच मराठी माणूस बहुसंख्येने उरला नाही. मराठी साहित्यात गिरगावची मराठी 'चाळसंस्कृती' मानाने आणि थाटात वावरली. आज गिरगावातून मराठी माणूस परागंदा झाला. तिथे परप्रांतीय आले. त्याबद्दल मराठीतर लोकांना दूषणे देणे, हा मराठी माणसाचा आवडता टाइमपास. गिरगावातील चाळींतील घरे मराठी माणसाने कुणाच्या धाकाने रिकामी केली? कुणी त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढले? यातले काहीच खरे नाही. मराठी कुटुंबे गिरगावातल्या चाळीतून स्वखुशीने बाहेर पडली आणि डोंबिवली, कल्याण, वसईला स्थलांतरित झाली. त्यांच्या घरांत गुजराती व्यापारी आले. मराठी कुटुंबांनी आपली घरे केवळ कौटुंबिक कलह आणि लाखो रुपयांचा मोह यापायी सोडली. त्याबद्दल इतरांना दोष का द्यायचा?

गिरणगावात १९८२ साली संप झाला आणि मध्य मुंबईची संस्कृतीच बदलली. संपामुळे गिरण्या बंद पडल्या आणि कोकणी चाकरमान्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. गिरण्यांच्या जमिनींवर मॉल, गगनचुंबी इमारती आणि बोलिंग क्लब्ज, डिस्कोथेक्स आले. बेकार गिरणी कामगार गावाकडे गेला आणि त्यांच्यापैकी अनेकांची मुले भाईंना शरण गेली आणि पुढे तीही उद्ध्वस्त झाली. दादरच्या सिद्धिविनायक मंदिरापुढील भक्तांची गर्दी पाहा. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ताटकळणाऱ्या मोटारींच्या ताफ्यातून गणेशाला नमस्कार करण्यासाठी कोण येते? त्यात मराठी माणसे किती? विलेपार्ल्याची उपनगरी मराठी संस्कृती हे मुंबईचे एक अभिमानस्थळ होते. तिथल्या दीनानाथ नाट्यगृहात आता रविवारी रात्रीही ऑर्केस्ट्राचे प्रयोग लागतात. मृणाल गोरेंचा प्रभाव संपला आणि गोरेगावातील सत्त्वशील मराठी संस्कृतीही हटली.

ती कुठे गेली, याचा पत्ताच नाही.

सोने-चांदीच्या पेढी, वसई, नाशिक, जळगावच्या भाज्यांचा व्यापार आणि मासे विक्री हे मराठी माणसाचे हुकमी व्यवसाय. तिथेही कमालीची पीछेहाट. सोने, जवाहिराच्या व्यवसायातील हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकी नावे वगळली, तर हा श्रीमंती व्यवसाय अन्य भाषिकांच्या ताब्यात केव्हाच गेला. भाजी आणि भय्या हे समीकरण बनल्यालाही आता कित्येक वर्षे लोटली. रत्नागिरीचे हापूस आंबे विकण्यासही दारात भैय्या येऊ लागला आणि आपण बिनदिक्कतपणे त्याच्याकडून हापूस घेऊ लागलो. मुंबईतील मच्छिमार समाज, तिथल्या कोळणी आणि त्यांचे टेचातले वागणे, यावर अनेक चित्रपट आणि नाटकांना विषय मिळाले. ससून डॉक्सपासून ठाण्याच्या खाडीपर्यंतच्या या कोळणी कुठे गेल्या? 'ताजे मासे' जाऊन 'ताजी मछली' कशी आली? केसांवर आणि कपाळावर ओघळणारे बर्फाचे पाणी टिपत बांबूच्या टोपलीतून 'मावरं' आणणाऱ्या कोळणींची जागा अॅल्युमिनियमच्या घमेल्यातून 'मछली' आणणाऱ्या बिहारी मुसलमानाने घेतली आणि त्याच्याकडे मासे स्वस्त मिळतात, यावर आपणही खुश झालो. बिहारींना होलसेलने मासे विकले की, बाजारात दिवसभर बसण्याचे किंवा दारोदार फिरण्याचे कष्ट नकोत, म्हणून मच्छिमारांनीही आपला परंपरागत धंदा विकला.

या आणि अशा अनेक गोष्टी.

टॅक्सी आणि रिक्षा हे मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य अंग. त्यावर उत्तर भारतीयांचीच अनभिषिक्त सत्ता आहे. शहर आणि उपनगरांत फूटपाथ अडवून बसलेले फेरीवाले परप्रांतीयच आहेत. हार्बर लाइनला लागून झालेल्या झोपड्यांपासून धारावी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, मालाड इथे सर्वत्र दररोज वाढणारी झोपडपट्टी आणि त्यातील प्रजा मुंबईबाहेरच्यांचीच. याला कोण जबाबदार? एकगठ्ठा व्होटबँक बुडायला नको, म्हणून झोपड्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावणारे सिंग, शर्मा, त्रिपाठी, मलिक हे आणि असे राजकारणी याला जबाबदार आहेतच; पण यांना कायदेशीर संमती देण्यास मदत करणारी मराठी माणसेच. झोपडपट्टीवाल्यांना अधिकृत दर्जा मिळण्यासाठी रेशन काडेर् लागतात. खोटे पुरावे देऊन ही कार्डे तयार होतात. शिधावाटप कार्यालयांत अल्प मोबदल्यात ही कामे करून देणारे कर्मचारी मराठी. रस्त्यावर जागा अडवून बसलेल्या फेरीवाल्यांना लायसन्स देणारे महापालिकेच्या वॉर्डातील कर्मचारीही मराठी आणि रिक्षावाल्यांना बिल्ले करून देणारे पोलिस व वाहतूक खातेही मराठी माणसांचेच. त्यांच्याकडून ही कामे करवून घेणारे नगरसेवक, आमदार व मंत्रीही मराठीच. दोष द्यायचा कुणाला?

जी अवस्था मराठी माणसाची, तीच मराठी भाषेची. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी; पण महाराष्ट्राच्या राजधानीत मात्र ती भिकारणीसारखी लक्तरे लेवून दयेची भीक मागत उभी आहे. राज्यकारभाराची भाषा मराठी असली, तरी व्यवहाराची भाषा मात्र हिंदी व इंग्रजी. दुकानांचे बोर्ड मराठीत असायला हवेत असा नियम आहे, म्हणतात. कोलकात्यात, चेन्नई, बंगलोरमध्ये त्या त्या राज्यांच्या भाषांमधले बोर्ड दिमाखात फडकत असतात. मुंबईत मात्र अस्सल मराठी मुलखांतही सारे बोर्ड इंग्रजीत आणि कायद्यातून पळवाट काढण्यासाठी कोपऱ्यात छोट्या अक्षरांत मराठीत. हे असे घडते, कारण आपल्या भाषेबद्दल इथल्या स्थानिक जनतेस आस्था नाही; अभिमान तर नाहीच.

गेल्या दहा वर्षांत मुंबई महापालिकेने एकही नवी मराठी शाळा काढली नाही; उलट अनेक शाळांतील मुलांची संख्या कमी झाल्याने मराठीच्या तुकड्या व काही ठिकाणी शाळाही बंद कराव्या लागल्या. खाजगी संस्थांनी तर मराठीचा नाद केव्हाच सोडला. मराठी संस्कृतीच्या शिक्षणसंस्था म्हणून ज्यांचा गौरव केला जात होता, त्या संस्थांनी इंग्रजी माध्यमाच्या तुकड्या सुरू केल्या व त्यातील प्रवेशासाठी मोठाल्या देणग्याही कमावल्या. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान मिळत नाही. त्यामुळे या शाळांची फी दामदुपटीने वा त्याहूनही अधिक असते. पण मुलांच्या भविष्याची काळजी घ्यायची, तर इंग्रजी शाळेची मोठ्ठाली फी भरलीच पाहिजे, अशी मराठी समाजाचीही मानसिकता आहे. इथे इंग्रजीतून शिक्षणाला विरोध करण्याचा हेतू नाही. इंग्रजीतून शिकल्याने आपल्या पाल्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल, अशी भाबडी आशा ज्यांना वाटते, त्यांनी अवश्य मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालावे. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे आणि त्यामुळे जगाची प्रगतीची कवाडे उघडतात, हे एकदम मान्य. पण मुंबईतील मराठी माणूस शिक्षणाची भाषा आणि संस्कृती यांची कमालीची गल्लत करतो. केरळमध्ये इंग्रजी माध्यमातील शाळांचे प्रमाण सर्वाधिक असूनही 'केरळ कौमुदी' आणि 'मल्याळम मनोरमा' या मल्याळी वर्तमानपत्रांचे खप दशलक्षाच्या घरात आहेत. याचे कारण केरळी, तामीळ, बंगाली समाजाने आपली संस्कृती अभेद्य राखली. इंग्रजीत शिकून मुंबई, दिल्ली, दुबई किंवा न्यूयॉर्कमध्ये नोकरी करणारे तामीळ तरुण आजही आईला अम्मा आणि वडिलांना अण्णा म्हणतात, त्याबद्दल मुले वा त्यांच्या पालकांना शरम वाटत नाही. मराठी कुटुंबातील आई-बाबा मात्र केव्हाच इतिहासजमा झाले. त्यांची जागा मम्मी-पप्पांनी घेतली. मूल वर्षभराच्या वयात पहिले बोल बोलायला लागते, तेव्हाच 'आई'ची 'मम्मी' करून आपण त्याची मराठी संस्कृतीशी नाळ तोडली.

मराठी नाटके ही मराठी संस्कृतीची आगळी वेगळी श्रीमंती.

हल्ली नाटके चालत नाहीत. थिएटर्सची संख्या वाढली आणि चांगल्या संहिता मिळेनाशा झाल्या, ही त्याची काही कारणे असली, तरी मराठी प्रेक्षक हरवला, हे महत्त्वाचे कारण आहे. मुंबईतील ठिकठिकाणच्या मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमुळे मराठी चित्रपट एका शोसाठी का होईना, प्रदर्शित होतात. पण त्यांना मुंबईत प्रेक्षक मिळणे मुश्कील होऊन बसले. नाटके आणि चित्रपट यांना सरकार आता अनुदान देते. त्यामुळे निर्मात्यांचे खिसे भरले; पण सरकारी अनुदानामुळे प्रेक्षक कसे येणार? मराठी चोखंदळ प्रेक्षक दादर, विलेपार्ल्यातून थेट विरार, वसई, कल्याण, डोंबिवलीपर्यंत फेकला गेला; तर रोजच्या प्रवासाच्या दगदगीतून नाटकासाठी फुरसद कुणाला? मराठी वाचकांचा दुष्काळ आणि चांगल्या साहित्यकृतींचा अभाव हे दुखणे आता जुने झाले. पण त्यावर इलाज सापडलेला नाही.

एकूण मराठी संस्कृतीची मुंबईत परिस्थिती चांगली नाही.

'राजा कालस्य कारणम्' असे म्हणतात. मुंबई, मराठी आणि मराठी माणूस यांचे नाते तुटण्यासही राज्यकर्ते कारणीभूत आहेत. हे राज्यकर्ते कुणा एका विशिष्ट पक्षाचे नसून ती सर्वपक्षीय स्वार्थी आणि पैशाला चटावलेल्या चोरांची सोनेरी टोळी आहे. या सर्वांनी मिळून कट केला आणि आणि राजकीय स्वार्थ आणि स्वत:ची भोगवृत्ती यापायी मुंबईचा खुले आम बाजार मांडला. मुंबईतील १९९०पर्यंतच्याच झोपड्या अधिकृत कराव्यात, असा नियम होता. शिवसेनेची सत्ता १९९५मध्ये आली आणि त्या वर्षीपर्यंतच्या झोपड्या एका रात्रीत अधिकृत बनल्या. त्यात पुढील पाच वर्षे वाढच होत राहिली; पण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या 'युती' सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले; कारण हीच मते आपल्याला पुढील निवडणुकीत पुन्हा सत्तेची दारे मोकळी करतील, हा वेडा आशावाद. पण याच नव्याने आलेल्या मतदारांनी पुढच्या १९९९च्या आणि त्यानंतर २००४मधील निवडणुकीतही शिवसेनेच्या विरुद्धच मतदान केले. पुढे सत्तारूढ झालेल्या दोन्ही काँग्रेसच्या आघाडी सरकारांनीही महाराष्ट्राबाहेरील लोकांना मज्जाव केला नाही. त्यामुळे मते आणि हप्ते दोन्ही वाढले; पण मुंबईचे मराठीपण मात्र पुसले जाऊ लागले.

परप्रांतीयांना मुंबईत आणण्यास मराठी राज्यकर्तेच जबाबदार आहेत, हे ध्यानात ठेवायला हवे.

शिवसेनेच्या काळात मुंबईत अनेक फ्लायओव्हर्स आले. तीस फूट उंचीच्या आणि दोन-तीन किलोमीटर्स लांबीच्या फ्लायओव्हर्सवरून नव्या गाड्या सूं सूं वेगाने धावू लागल्या. शहरी श्रीमंतांच्या प्रवासाच्या अपेष्टा कमी झाल्या. पण या फ्लायओव्हर्सची योजना उद्योगांना चालना देण्यासाठी झाली होती, हेच राज्यकर्ते विसरले. नव्या फ्लायओव्हर्सवरून नवे लोंढे मुंबईत येत राहिले आणि त्यावरूनच मुंबईतील उद्योग सुरतेपासून सूरजकुंड, गुरगाँवपर्यंत पोहोचले. या उद्योगांवर अवलंबून असलेला मराठी माणूस बेकार बनला; पण राज्यकर्त्यांना त्याचे ना सोयर ना सूतक. दरम्यानच्या काळात मुंबईचे उद्यमनगरी हे रूप पालटून ती व्यापारी राजधानी बनली. औद्योगिक शहरात संपत्ती निर्माण होते. व्यापारी महानगरात तिचे केवळ वाटप होते. संपत्तीच्या निमिर्तीत ती निर्माण करणाऱ्यांना, कामगारांना वाटा मिळतो. तिचे केवळ वाटप होते, तेव्हा त्यात काहींनाच लाभ होतो. मुंबईचे तसेच झाले. त्यामुळे चाळी, गिरण्या पडल्या आणि गगनचुंबी मनोरे आले. त्यात जे कोणी राहायला आले, त्यांचे मुंबईच्या संस्कृतीशी, इथल्या मराठी माणसाशी रक्ताचे वा मनाचे नातेच नव्हते. त्यातून निर्माण झालेल्या तेढीमुळे मुंबईचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन कोसळले. जाहीर सभा, मिरवणुका, मोर्चे ही सारी मराठी मनाची उभारीची स्थळे; ती सारी हवेत विरली. उरले फक्त टीव्हीसमोरचे जिणे.

मुंबईला मिळालेली अमराठी नोकरशाहीसुद्धा मराठीच्या ऱ्हासाला जबाबदार आहे.

खाजगी क्षेत्रात टाटा, गोदरेज या पारशी उद्योग समुहांचा अपवाद वगळता मराठीचे प्रभुत्व केव्हाच नव्हते. पण निदान सरकारी पातळीवर तरी मराठी सनदी अधिकारी होते. स. गो. बर्वे, सुकथनकर, म. वा. देसाई या आणि अशा अनेक ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी नोकरशाहीवर पकड ठेवली. त्यामुळे मराठी संस्कृतीही जिवंत राहिली. आज अशी परिस्थिती आहे की, मुंबईतून कारभार हाकणारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, दूरदर्शन केंदाचे प्रमुख, मुंबईचे पोलिस व महापालिका आयुक्त, महानगर टेलिफोनचे जनरल मॅनेजर, म्हाडा आणि एमएमआरडीएचे मुख्य अधिकारी, मुंबईचे कलेक्टर हे सारेच अमराठी. त्यांच्याकडून मराठी जनांचा आणि मराठी भाषेचा उद्धार कसा व्हायचा? सार्वजनिक क्षेत्रातील नोकरशाही अमराठी अधिकाऱ्यांच्या हातात गेल्याने रेल्वेतील भरतीपासून दूरदर्शनच्या कार्यक्रमापर्यंत सर्वत्र मराठीची पीछेहाट होत गेली. यावर आंदोलन हा प्रभावी उपाय असला, तरी आंदोलन करण्याइतकी प्रभावी वृत्ती समाजात असावी लागते. तिचाच अभाव असल्यामुळे नोकरशाहीच्या हुकमतीखाली लोकनियुक्त प्रतिनिधीही दबले गेले. त्याचा परिणाम दिसतोच आहे.

हरघडीला विकसित होणाऱ्या बहुसंस्कृतीच्या महानगरांत एका कोणत्याही समाजाला आपली मक्तेदारी टिकवता येत नाही. तसे हट्टाने वागणारे काळाच्या प्रवाहात एकाकी पडतात व वाहूनही जातात. मुंबई हे असेच महानगर आहे. सतराव्या शतकात बोहरी, पारशी, नंतर मलबारी व गुजराती, गेल्या शतकात दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय यांची आक्रमणे मुंबईवर होत राहिल्याने या शहरावर मराठीचा एकछत्री अंमल कधीच नव्हता. तसा तो असण्याची आवश्यकताही नाही. पण कोणत्याही शहराच्या मूळ संस्कृतीचा ठसा पूर्णपणे पुसला गेला, तर शहराची संस्कृती आधी भ्रष्ट व नंतर नष्ट होते. मुंबईवरील मराठीचा ठसा असाच नाहीसा होऊ लागल्याने या शहराच्या भविष्याबद्दलच चिंता वाटते. मुंबईत बॉम्बस्फोटांच्या मालिकेने साऱ्या जगाला हादरवले. पण दुसऱ्या दिवशीच शहर पुन्हा पूर्वपदावर आले, त्याबद्दल सर्वांनी मुंबईकरांना सलाम केला. प्रत्यक्षात हे शहर मृत झाल्याचे लक्षण आहे. संस्कृती हरवलेल्या या शहरात शेजार आहे; पण सोबत नाही. घर नंबर आहे; पण घरपण नाही. कोलकाता, बंगलोर, चेन्नई ही महानगरेही बाहेरून आलेल्यांना सामावून घेत आहेत; पण त्यामुळे कोलकात्याचे बंगालीपण, बंगलोरचा कानडी स्वभाव आणि चेन्नईतील तामीळ तरंग आटले नाहीत.

मुंबईत मात्र तसे घडले, हे दुर्दैव.

मुंबईतील मराठीचा ऱ्हास होण्यास आणखी एक कारण म्हणजे या शहरास अनेक वर्षांत सांस्कृतिक नेतृत्व मिळाले नाही. नाना शंकर शेठ, न्या. महादेव गोविंद रानडे आदींनी स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक चळवळी मुंबईतून चालवल्या. प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांनी राजकारणाबरोबरच समाजकार्यातही लक्ष घातल्याने देशाच्या नकाशावर मुंबईतील मराठी माणूस तळपत राहिला. पण महाराष्ट्राची स्थापना झाली आणि नंतर मात्र या शहराची ध्वजा फडकवत ठेवणारे सामाजिक नेतृत्वच हरपले. शिवसेनेच्या रूपाने मराठी माणसाची राजकीय शक्ती उभी राहिली; पण या शक्तीनी मतांच्या अपरिहार्यतेमुळे मराठीपणापेक्षा हिंदुत्वाला जवळ केले आणि मराठी माणूस एकटा पडला. विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर यांच्यासारखे विख्यात साहित्यिक मुंबईतच घडले व वावरले; पण सांस्कृतिक मुंबईचे नेतृत्व त्यांनी कधी केले नाही. मुंबईने नूतन, तनुजापासून माधुरी दीक्षित, स्मिता पाटील, विजया मेहता, अमोल पालेकर यांच्यासारखे अनेक नाट्य-चित्र कलावंतही दिले. पण तेही आपल्या करियरभोवतीच घुटमळत राहिले. मुंबईतील मराठी संस्कृतीची जपणूक कुणी केली नाही. मराठीत प्रायोगिक रंगभूमीच्या रूपाने अस्सल मराठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली; तिने बंगालीशी स्पर्धा केली. पण या चळवळीतील सारे कधी ना कधी सिनेमा, व्यावसायिक नाटके आणि टीव्ही सिरियल्समध्ये रुळले व सामावले गेले, तेव्हा ती चळवळही कोमेजली व खुरटली. कारण नवी रोपे लावायला कुणाला गरज, उत्साह वा फुरसद नव्हती.

ना मराठी शाळा, ना मराठी साहित्य, ना नेतृत्व, ना विचार अशा अवस्थेत मुंबईतील मराठी माणूस व मराठी भाषा यांचे भवितव्य काय? 'माझा मऱ्हाटाचि बोलुं कवतिके, परि अमृतातेंहि पैजा जिंके...' अशी ज्ञानेश्वरांपासून गेली सातशे वषेर् प्रगत झालेली मराठी भाषा मरणार नक्कीच नाही; कारण तिने अनेक आक्रमणे झेलली व पचवली. जग बदलते, तशी वळणे भाषेनेही घेणे आवश्यक आहे. भाषेच्या शुद्धीचा आग्रह धरणारे भाषेला मुख्य प्रवाहापासून तोडतात. व्याकरण व शब्द यांच्या शुचितेचा अहंकार बाळगणारे भाषेच्या वृद्धीचा व समृद्धीचा विचार ठेवत नाहीत. गेल्या काही वर्षांत जगात टीव्ही, कम्प्युटर, इंटरनेट, रॉकेट्स, स्कड मिसाईल्स, सीडीज, डीमॅट अकाऊंट्स, मल्टिप्लेक्स, मॉल, स्कूटर्स अशा नवनव्या वस्तू, विज्ञान व संकल्पना जन्माला आल्या आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बसल्या. त्यांच्यासाठी प्रतिशब्द देऊन भाषिक विद्वत्ता सिद्ध करण्याच्या नादात नव्या पिढीला भाषेपासून दूर सारले जाते. बस, रेल्वे, पोलिस, शर्ट, पँट, रेडिओ हे शंभर-दीडशे वर्षांपूवीर् इंग्रजी व अन्य भाषांतून आलेले शब्द मराठीत चपखल बसले व अस्सल मराठी बनले; तर नव्याने आलेल्या संकल्पनांचे मूळ शब्द मराठीत घेण्यात अडचण कसली? यामुळे काहींची सांस्कृतिक कुचंबणा जरूर होईल; पण भाषेला जीवदान मिळेल.

आता प्रश्न मराठी माणसाचा. तो शहर आणि अनेक उपनगरांतून उखडला गेला. कधी गिरण्या, कारखाने बंद पडल्याने; तर कधी व्हीआरएसच्या दुष्टचक्रात अडकल्याने अवेळी रिटायर व बेकार झाला. आता तो बृहन्मुंबईच्या सीमापार विरार-वसई, कल्याण-डोंबिवली-कर्जतपर्यंत विखुरला गेला. जगाच्या इतिहासात असे घडतच राहते. उत्तर आशियातून असेच परागंदा झालेले आर्य भारतात आले. पश्चिम आशियातून उपजीविकेसाठी जमिनीच्या शोधात बाबर भारतात आला. पशिर्यातून पारसी समाज असाच अस्तित्व टिकवण्यासाठी नवसारीला पोहोचला. चीनमध्ये माओ-त्से-तुंगने आपल्या समाजाला वाचवण्यासाठी लाँग मार्च केला. जगभरचे ज्यू इस्त्रायलमध्ये एकमेकांच्या आसऱ्याने राहिले व त्यांनी एक शक्तिमान राष्ट्र उभे केले.

मुंबईतून तडीपार झालेल्या मराठी माणसाचे याच शहरात येत्या काही वर्षांत पुनर्वसन झाले नाही, तर २०२५पर्यंत हाच मराठी माणूस मुंबईबाहेर वसई, विरार, पनवेल, कर्जत, उरण, पेण इथे दुसरी मुंबई वसवेल. परागंदा झालेल्या मराठी माणसाबरोबर मुंबईचेही स्थलांतर होईल. तिथे मराठी संस्कृती पुन्हा रुजेल व बहरेल.

पण तेव्हा आताची मुंबई सांस्कृतिक ऱ्हासामुळे शहर म्हणून संपून गेलेली असेल.

तिला कुणी शांघाय म्हणेल, कुणी पॅरिस, तर कुणी सिंगापूर; तिच्यात मुंबईपण मात्र सापडणार नाही.

-भारतकुमार राऊत,

Thursday, July 26, 2007

निर्दोश

''मॅडम, तुमच्या बाबतीत काय होतं सांगू का? तुम्ही, समोरचा माणूस जे बोलतो, त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवता आणि अपेक्षेप्रमाणे घडलं नाही की नर्व्हस होता, स्वत:ला त्रास करून घेता।'' माझी ऐकेकाळची विद्यार्थिनी आणि आजची सहकारी शिक्षिका पोटतिडकीनं बोलत होती.


नेहमीप्रमाणे माझी कोणाच्यातरी बाबतीत फसगत झाली होती नि त्यापायी भला मोठा भुर्दंड भरावा लागल्यानं मी स्वत:शीच चिडचिड करीत होते। खरंच! असं का होतं? आपण प्रत्येकावरच विश्वास ठेवतो? आयुष्यात इतका संघर्ष सोसल्यावर, जगाचे टक्केटोपणे खाऊनही आपल्यात सुधारणा का होत नाही? एखाद्या गोष्टीचं कारण नक्की माहीत असूनही त्याबाबत अनभिज्ञ असण्याचा आव तर नव्हे ना हा?


त्या आमच्यापैकी कुणाच्या 'भाभी' होत्या ते नक्की आठवत नाही। पण आम्ही सगळ्याजणी त्यांना 'भाभी' म्हणत असू. त्या होत्या मराठीच, पण माहेर ‍िबलासपूरचं असल्यानं बोलायच्या हिंदी. त्यांचं बोलणं गोड, मधाळ. शब्द आर्जवी. त्यांची 'ए सुन री...' म्हणत जवळीक साधायची लकब आम्हाला फार आवडायची.


ते दिवसच तसे होते। छोट्या छोट्‍या गोष्टी आवडण्याचे, कवितांमध्ये रमण्याचे, मोठेपणक्ष 'शास्त्रज्ञ' होण्याचं स्वप्न बघण्याचे, 'मेरे मेहबूब'सारख्या चित्रपटात धो-धो रडण्याचे. त्यावेळी गणेशोत्सवात अत्रे-वरेरकरांची नाटकं व्हायची, शरद मुठेंचा 'फेरीवाला' गाजायचा.


'गंगा-यमुना डोळ्यात उभ्या का? जा मुला जा एसेस्ला बसायला' त्यांच्या विडंबन गीतानं खुलण्याचे। बुलढाण्यासारख्या लहानशा गावी एकच सभागृह तिथेच सारे कार्यक्रम व्हायचे. 'सभागृहाबाहेरच्या विहिरीजवळच्या चिंचेच्या झाडावर रात्री-अपरात्री ‍पांढर्‍या कपड्यातल्या व्यक्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या नकला करतात, अशी माहिती शाळेत कुणीतरी आणल्यामुळे आम्ही त्या बाजूला न बघता सभागृहाबाहेर पडायचो.


तडक भाभींच्या घरी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी दप्तर तिथं ठेवलेली असायची। परतल्यावर भाभी कितीतरी वेळ आम्हाला कार्यक्रमाबद्दल विचारीत राहायच्या. त्या आमच्यापेक्षा फारशा मोठ्या नसाव्यात. लग्न होऊन खूप दिवस नव्हते झालेले. दोन-अडीच वर्ष झाली असावीत. पाळण्यातलं बाळ होतं त्यांच. तेही आमच्यासाठी आकर्षणाचा विषय होतं.


'भाभी इतक्या जवळ राहून कार्यक्रम बघायला का येत नाहीत,' हा विचारही कधी मनात आला नाही। लग्न, सासुरवास, सुनेला बाहेर जाण्याची बंदी वगैरे गोष्टींशी आमचा सुतराम संबंध नव्हता. एक दिवस शाळा लवकर सुटली तशी नेहमीप्रमाणे आम्ही भाभींकडे निघालो. त्या कधीच्या, क्रोशानं विणायची बाहुली शिकविणार होत्या.


आज अनायसे वेळ आहे, शिवाय दोन दिवसांपूर्वी त्यांचा भाऊपण आला होता। त्यानं भाभींसाठी 'पिहर'हून काय काय आणलंय् तेही बघायचं होतंच. घराचं फाटक उघडून, अंगण ओलांडून आम्ही दाराशी पोहोचलो अन् तिथंच थबकलो. छपरीचं दार लोटलेलं होतं, आतून मोठमोठ्यानं बोलण्याचे आवाज येत होते. आम्ही दबकन् दाराशी उभ्या राहिलो.


''मैं सच बोल रही हूँ मांजी, मैंने नहीं लिए पैसे। मुझपर विश्वास किजिए.'' भाभी कळवळून सांगत होत्या.

''कसल सच नि काय? मग इथे रेशनसाठी काढून ठेवलेले वीस रुपये कुठे गेले? तूच तर होतीच घरी।''

''पर माँ जी मैं क्या करूंगी पैसे लेकर?''

''वा ग वा, म्हणे क्या करूंगी? दिले असतील भावाला। नाही तर आणलं असेल त्याचं काही.''

''माँ जी मैं तो बाहर भी नहीं जाती।''

''बस झालगं गं तुझं तेच रडगाणं। खोटपणा सगळा.''

पुढं काय झालं कुणास ठावूक! आम्ही आपला काढता पाय घेतला। सगळ्यांचे चेहरे गोरेमोरे झाले होते. हे सगळं आमच्यासाठी नवीन होतं. एकमेकीशी एक अक्षरही न बोलता आम्ही घरी गेलो.


नंतरचे दोन-तीन दिवस कशालाच वेळ मिळाला नाही। शाळेत प्रॅक्टिकल्स होती. तेव्हा कुणीतरी भाभींची आठवण काढली. त्यांना'प्रॅक्टिकल' या प्रकाराची भारी अत्सुकता. ''क्या करते रे तुम उबाल-उबालके! और आईना, मोमबत्ती, टांचणी. डर नही लगता तुमको बम वगैरेसे'' लॅबमध्ये काम करणे म्हणजे अॅटमबॉम्ब बनविणे अशीच त्यांची ठाम समजूत होती. आम्ही त्यांच्या खूप फिरक्या घेत असू आणि मग आठवून-आठवून हसत असू.


''ए तुला कळलं का, भाभींचं बाळ आजारी आहे।''

भाभी म्हणाली त्याला सारखा ताप येतो म्हणे।''

''कशानं असेल ग?''

''कुणास ठावूक! काकू तर म्हणतात की, भाभी खोटं बोलते पैसे चोरल्याचं कबूल करीत नाही म्हणूनच देवानं ही शिक्षा दिली।''

''अगं पण तिच्या खोटेपणाची शिक्षा बाळाला का?''

''काय की? पण भाभी सारख्या म्हणतात - बाळाला देवी टोचल्या नाहीत आणि ताप आला तेव्हा डॉक्टरकडे न जाता सासूबाईंनी त्याला बुवामहाराजांकडे नेलं म्हणूनच ताप वाढला त्याचा। मी खोटं बोलले नाही की चोरी केली नाही.''


तो विषय तिथंच थांबला। पुढेचार दिवस माझी कोणाशीच भेट झाली नाही. सोमवारी सुटी झाली होती अन् माला बरं नसल्यानं मी एक दिवस शाळेत गेले नव्हते. मनात भाभींचा विचार पिच्छा सोडत नव्हता. शेवटी सगळं आईला सांगितलं - ''एवढी देवभोळी, काल्पनिक गोष्टींना, भूतखेतांना घाबरणारी भाभी खरंच खोठ बोलली असेल का?''


''असेलही कदाचित!'' आई म्हणाली, ''अगं तिच्या माहेरची परिस्थिती नसेल चांगली, दिले असतील भावाला। होतो मोह एखाद्या वेळी. पण तिनं सांगून टाकायला पाहिजे सासूबाईंना सगळं.

चार दिवसांनी शाळेत गेले, पाहिल तास होताच सगळ्यांचा घोळका माझ्याभोवती।''एक वाईट बातमी आहे.''


''भाभीच बाळ!'' माझ्या ओठावर थरथरले शब्द आले- ते हसरं - गोजिरं बाळ डोळ्यापुढे आलं अन् काळजाचा ठोका चुकला। ''बाळ ठीक आहे.'' ''मग'' मला धीर धरवेना. शनिवारी बाळाचा ताप खूप वाढला. शेवटी रविवारी डॉक्टरांना आणलंच. पण बाळ सीरियसच होतं. डॉक्टरांनी आशा सोडली. खूप रागावले ते उशीर केल्याबद्दल.


तेव्हा महणे भाभींनी बाळाच्या पायावर डोकं ठेवलं, म्हणाल्या, ''हाच माझा भगवान आहे। मी खोटं बोलले नसेन तर माझा बाळ बरा होईलच.'' बराच वेळ गेला अचानक बाळाचा ताप उतरू लागला. ते हातपाय हलवू लागलं. त्यानं डोळे उघडले नि रडू लागलं. 'चमत्कारच झाला' म्हणत डॉक्टरांनी भाभींना बाळाच्या पायावरून डोकं काढण्यासाठी हलवलं तर...भाभीच वारल्या होत्या. कितीतरी वेळ मी सुन्न होते. त्यानंतर पुन्हा आम्ही त्या घराकडे फिरकलोही नाही.


''मुझपर विश्वास किजिए!'' भाभींचे केविलवाणे शब्द कितीतरी दिवस कानात घुमायचे अन् मी झोपेतून दचकून जागी व्हयाचे. मन अस्वस्थ व्हायचं, जीव घाबरा व्हायचा. तेव्हापासून आजतागायत... समोरच्या व्यकतीवर अविश्वास दाखवायची हिंमत मला झाली नाही... यापुढेही होण्याची शक्यताही नाही.