Friday, April 27, 2007

मी एक कावळा....

बुद्धीला कितीही ताण दिला, तरी बालपणातल्या सर्वात पहिल्या अनुभवाची आठवण म्हंटली की, मला ते वादळ आठवतं. झाडाच्या उंच शेंड्यावर आमचं घरटं होतं. सोसाट्याच्या वार्‍यात झाडाचा शेंडा जवळ-जवळ ५ ते ७ फुट झुकत होता. घरट्यात मी एकटाच होतो. घरट्याबाहेर पण त्याच फांदीला गच्च धरून आई बसली होती. फांदीच्या प्रत्येक हेलकाव्या सरशी, आता आपण एवढ्या उंचावरून पडणार या, भितीने मी अक्षरश: कोकलत होतो. मला आई-बाबांसारखं उडता येत नव्हतं. शेजारी बसलेली आई, सारखी पंखांनी तोल सावरत होती. ती घाबरलेली नव्हती. मधे मधे काव काव करून मला धीर देत होती. पण मला, घरट्याला, सोडून कुठे जात नव्हती. बाबा कुठे बाहेर गेले होते. आईला त्यांचीही काळजी वाटत नव्हती पण या वादळात त्यांनी जवळ असावं, अगदी घरात नाही तरी निदान समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर, नजरेसमोर असावं असं तीला वाटत होतं. संघ्याकाळी मित्रांसमवेत समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर गप्पा मारत बसणं हा माझ्या बाबांचा छंदच होता. पण आज ते (आणि त्यांचे मित्रही) कुठे दिसत नव्हते. मी तर जाम घाबरलो होतो. वार्‍याने फांदी झोका खाऊ लागली की मी डोळे बंद करून घ्यायचो आणि जिवाच्या आकांताने काऽऽव काऽऽव ओरडायचो. आई हसायची आणि सांगायची,'कांही होत नाही. घरट्यातल्या तारा गच्च धरून बस. घरटं कांही पडायचं नाही.' मी तसं करत होतो पण भिती जात नव्हती. किती वेळ त्यात गेला कळलं नाही. पण, बर्‍याच वेळाने वारा मंदावला, झाडाच्या शेंड्याचे झोके घेणं थांबलं. शेंडा हळूवार हलत राहीला. भिती दूर पळाली. मजा वाटू लागली. मी हसू लागलो. आई आता उडून गेली. बहूतेक ती बाबांना शोधायला बाहेर गेली असावी. आई आणि बाबा परतले तो पर्यंत मी झोपलो होतो. त्यांच्या बोलण्याने जागा झालो. बाबांनी त्यांच्या चोचीतून आणलेल्या अळ्या मला खाऊ घातल्या आणि पायात धरलेली एक मोठी अळी आईला दिली. आईने बाबांच्या अंगावर पिसांमध्ये अडकलेले कचर्‍याचे कण आपल्या चोचीने काढून टाकले. बाबा अळ्या छान छान आणायचे. पोपटी रंगाच्या अळ्या मला खूप खूप आवडायच्या. बाबा त्या जास्त आणायचे. पण बाबा तपकिरी रंगाच्या अळ्याही आणायचे. त्या चवीला एकदम बेकार असायच्या, मला मुळीच आवडायच्या नाहीत पण त्या खायला लागायच्या. त्याने पंखात ताकद येते असे आई सांगायची. मी कधी खायचे नाटक करून ती अळी थूंकून टाकली तर बाबा माझ्या डोक्यावर चोच मारायचे. खूप लागायचं. डोळ्यात पाणी यायचं. खाली टाकलेली अळी पुन्हा उचलून आई भरवायची.
पंखात पुरेशी ताकद आल्यानंतर एक दिवस माझ्या उडायला शिकण्याच्या काळ समीप आला. सुरुवातीला एक-एक फांदी खाली उतरत सर्वात खालच्या फांदीवर येऊन बसलो. तिथून बाबांनी पंखांची हालचाल दाखविली. मीही तशीच करून दाखवली. सकाळची प्रसन्न वेळ होती. मी खूप उत्साहात होतो. बालसुलभ वृत्तीने उगाचच काव-काव करीत होतो. नंतर बाबांनी हवेत एक भरारी मारून दाखवली. मनात उत्साह ओसंडून वाहात होता तरी धाडस होईना. मी जागच्या जागीच पंख फडफडवून काव-काव करीत राहीलो. बाबा फांदीवर माझ्या बाजूला सरकले. माझ्या पाठीवर चोच घासली. मला धीर आला. मग बाबांनी पुन्हा एक भरारी घेतली. यावेळी जरा साधी आणि छोटीशीच भरारी घेऊन माझ्या शेजारी येऊन बसले. मी प्रयत्न केला पण पाय फांदी सोडेनात. बाबांनी पाठीवर जोरात चोच मारली. मी काव-काव करीत फांदीवरून पडू लागलो. तेंव्हा तोल सावरण्यासाठी मी जोर-जोरात पंखांची हालचाल केली आणि मला आश्चर्य वाटलं मी हवेत तरंगू लागलो. थोडं पुढे जाऊन मी परत फिरलो आणि फांदी वर बाबांच्या शेजारी येऊन बसलो. बाबांनी पुन्हा पाठीवर चोच घासली. मला खूप बरं वाटलं. आई हसत होती. मला उडता येऊ लागलं. त्या दिवशी मी खूप उडलो. अगदी पंखं दुखे पर्यंत. वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळी फळं खायला मिळाली. आईने सांगितल्या प्रमाणे आमच्या झाडापासून जास्त दूर गेलो नाही. संध्याकाळी घरी परतलो तेंव्हा बाबा आईला अभिमानाने म्हणाले,' हा आता एक पूर्ण कावळा झाला. माझी चिंता मिटली.' आई हसली. तिने माझ्या पाठीवर चोच घासली. पंखांवर, मानेजवळ पिसांमध्ये अडकलेले कचर्‍याचे कण काढून टाकले. त्या रात्री मी छाती भरून श्वास घेतला आणि समाधानाने झोपलो.
मी, आई आणि बाबा आम्ही तिघेही बाहेर पडायचो. वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, भरपूर खाऊन, पाणी वगैरे पिऊन घरी परतायचो. जर चांगले किडे, अळ्या, दाणे मिळवायचे असतील तर पहाटे जरा सूर्य उगवला की लगेच बाहेर पडावे लागे. उशीर झालाच तर अगदी उपाशी राहावे लागत नसे पण मग देवळासमोरच्या पिंपळावर बसून, येणारी जाणारी भक्त मंडळी लाह्या टाकत त्या खाव्या लागत. आई-बाबा भल्या पहाटे बाहेर पडत. पण आई लवकर परते. घरट्यातली घाण बाहेर फेकणं, सगळ्या तारा ओढून-ओढून विस्कटणारं घरटं पुन्हा घट्ट करणं, तारा कमी झाल्या असतील (कधी-कधी माझ्या धसमुसळेपणाने कांही तारा सुटून खाली पडायच्या) बाबांच्या मागे लागून त्यांना नवीन तारा आणायला लावणं, त्यांनी आणलेल्या तारा घरट्यात नीट बसवणं अशी तीची कामं चालायची. बाबा कधी-कधी रंगीत चिंध्याही आणायचे. आईला ते आवडायचं नाही. ती त्या चिंध्या घरट्या बाहेर फेकून द्यायची. कधी बाबांनी त्या टाकून दिलेल्या चिंध्या पुन्हा उचलून आणल्या तर नाईलाजाने घरट्यात ठेवायची. २-४ दिवसांनी बाबांच मन भरलं की तेच त्या चिंध्या उचलून बाहेर फेकून द्यायचे. पुन्हा कुठे नविन चिंधी मिळाली आणायचे उचलून.
घरट्यापासून दूर-दूर गेल्यावर घराकडे परतायची आमची एक युक्ती होती. आम्ही शहरात राहात होतो. प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे वास आम्हाला पाठ होते. त्या-त्या वासांचा मागोवा घेत आम्ही घरट्याकडे परतायचो. प्रत्येक गल्ली-बोळातून, घरांमधून, उकिरड्यावरुन, बेकरी, कसायांची दुकाने, फरसाणची दुकाने, देवळे, झोपडपट्या, गटारे, समुद्र, कोळीवस्ती इथून ठरावीक वास येत. थोड्या फार सरावने या सर्व वासांचा एक 'नकाशा' मेंदूत तयार होतो आणि मग अंधारातही आपलं घरटं कुठे आहे हे ओळखता येतं. माझ्या मित्राने ही ट्रिक मला शिकवली.
आमच्या घरट्यासमोर एक उंच इमारत आहे. त्याच्या ४थ्या मजल्यावर एक छोटी चिमुरडी राहायची. रोज सकाळी ती बाल्कनीत येऊन, आमच्या घरट्याकडे पाहून, कांही तरी खाऊ मला दाखवायची. मी त्या बाल्कनीत जाऊन तो खावा अशी तीची ईच्छा असायची. पण आईने सांगितलं होतं, माणसं लहान असू देत नाहीतर मोठी, त्यांच्या जवळ जायच नाही. मी तिच्याकडे बघून काव - काव करायचो, बाल्कनीच्या बाजूच्या खिडकीवर बसायचो पण बाल्कनीत गेलो नाही. एकदा तिच्या आईने तिला कांही तरी सांगितलं. तसं, बाल्कनीच्या कठड्यावर खाऊ ठेवून ती खोलीत गेली आणि आतून पाहू लागली. मी थोडावेळ वाट पाहीली आणि ती येत नाही असे पाहून झट्कन एक भरारी घेऊन गॅलरीत सावध विसावलो आणि ती बाहेर यायच्या आंत तो खाऊ उचलून आणला. तो केकचा तुकडा होता. मी फांदीवर बसून तो खाऊ लागलो. तीला खूप आनंद झाला. तीने टाळ्या वाजवून आईला दाखवले. आई नुसतीच हसली. तिला विशेष आनंद झालेला दिसला नाही.
पुढे कित्येक वर्ष तो आमचा एक खेळच होता. मला खाऊ दिल्याशिवाय ती कधीच शाळेत गेली नाही आणि तिने दिलेला खाऊ खाल्याशिवाय माझाही दिवस गोड व्हायचा नाही. मी मित्रांबरोबर उडायला जायचो. दूर एका ठीकाणी इलेक्ट्रीकच्या तारांवर आमची शाळा भरायची. आम्ही २५-३० तरूण कावळे होतो. तिथे आम्ही वेगवेगळे सूर मारणे, अर्ध्यातून झट्कन दिशा बदलून उडणे, अगदी जमीनी पर्यंत खाली सूर मारून जमीनीवर न उतरता समोरच्या उंच इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर बसणे, चोच दोन्ही बाजूनीं कठड्यावर घासून तिला धार लावणे, असे खेळ खेळायचो. कधी कंटाळा आला तर शहरातच असलेल्या झोपडपट्टीवर घिरट्या घालायचो. तिथे उकिरड्यावर छान-छान गोष्टी खायला मिळायच्या. तिथेच डुकरांची छोटी छोटी पिल्ले आपली दोरी सारखी शेपटी हलवत चरत असायची. त्यांच्या पाठीवर चोच मारली की ती व्रँक व्रँक असे ओरडायची. मजा यायची. एखादे मोठे डुक्कर किंवा कुत्रा आला तर आम्ही उडून जायचो.
अशी अनेक वर्ष गेली. ती समोरच्या इमारतीतली चवथ्या मजल्यावरची चिमुरडी आता चिमुरडी राहीली नव्हती. मोठी झाली होती. आता ती केक, बिस्किटं खायची नाही. पोळी-भाजी खायची. पोळीचे तुकडे गॅलरीच्या रेलींगवर ठेवायची. मी उचलून आणायचो. कधी कधी तिथेच बसून खायचो. मला केकची आठवण यायची. मला केक खूप आवडायचा. तसं बेकरीच्या मागे उकिरड्यावर कधी-कधी केकचे तुकडे मिळायचे, पण तिने खास माझ्या साठी ठेवलेल्या केकच्या तुकड्यांची चव त्याला नसायची. शिवाय उकिरड्यावर गाई, म्हशी, बकर्‍या हे शींगवाले प्राणी यायचे त्यांची भिती वाटायची. त्यावरून एक गंमत आठवली. आम्ही म्हशींच्या पाठीवर, त्यांचे शींग किंवा शेपटी पोहोचणार नाही अशा जागेवर, बसायचो. १०-१० मिनिटं आरामात त्यांच्या पाठीवर बसून कांही कष्ट न करता दूर-दूर जायचो. कंटाळा आला की म्हशीच्या पाठीवर हलकेच चोच मारायची की ती कातडी थरथरवायची, मजा यायची. असे एक दोन वेळा करून उडून जायचे. हा एक छंदच होता. फक्त कांही ठीकाणच्या मुलांना सांभाळायला लागायचं. ती मुलं दगड घेऊन नेमबाजी खेळायची. त्यांचा नेमही चांगला होता. एकदा मला एक दगड पाठीत बसला. दोन दिवस पाठ दुखत होती. आईने पिवळ्या अळ्या खायला सांगितल्या. सांडपाण्याच्या डबक्याशेजारी उगवणार्‍या झुडपांच्या पिवळ्या फुलांमधे त्या सापडायच्या. दोन दिवसात पाठ बरी झाली.
मनुष्यप्राण्यांमध्ये आम्हा कावळ्यांसंबंधी कांही गैरसमज आहेत. त्यांना वाटतं आम्हा सर्वांनाच पाहूणे येणार असतील तर आधी कळतं आणि मग आंम्ही काव-काव करून त्यांना तसे कळवतो. पण प्रत्यक्षात आमच्यातल्या फक्त ठरावीक कावळ्यांनाच, त्यांना डोमकावळा म्हणतात, हे समजतं आणि ते त्या-त्या घराच्या खिडकीत बसून काव-काव करतात. तसेच, स्मशानात, नदीकाठी मृतात्म्यांचे पिंड खाणारे कावळेही वेगळे असतात. ते जरा राखाडी रंगाचे असतात. आमच्या सारखे गडद काळ्या रंगावर पोटाकडे पांढरट पिसं असणारे नसतात. मृतात्म्यांचे पिंड खाणं आमच्यात कमीपणाचे मानले जाते. किडे, मुंग्या, अळ्या, मेलेली जनावरे (ती पण दोन दिवसांपेक्षा जास्त जुनी नाही) आणि मनुष्यप्राणी खाईल ते सर्व, आम्ही खातो.
झाडावरचं आमचं घरटं माझ्या वडीलांनी बांधलं होतं. तसं आमचं घरटं इमारतीच्या मागच्या बाजूला एका झाडावर इतरांसमवेत होतं परंतु एकदा बाबांचं आणि त्या झाडावर राहाणार्‍या एका दाणग़ट डोमकावळ्याचं कडाक्याचं भांडण झालं. भयंकर चोचा-चोची झाली. मग इतर कावळे मधे पडून भांडण सोडवलं. हे नेहमीच होत राहाणार हे जाणून वडीलांनी इमारतीच्या पुढच्या बाजूस या झाडावर घरटं बांधलं. हे झाड जरा लवचीक आहे. वारा सुटला की इतर झाडांपेक्षा जास्त हेलकावे खातं. म्हणजे घरटं बांधून राहायला अयोग्यच म्हणायला पाहीजे. पण बाबांना झाडांचं ज्ञान चांगलं आहे. ते आईला म्हणाले, 'झाड कितीही हेलकावलं तरी मोडणार नाही. चिवट आहे.' त्यांना झाडाच्या शेंड्यावरची कोवळी पाने चावून कळत असे. ही कला खूप कावळ्यांकडे असते. बाबांनी मलाही ही कला थोडीफार शिकवली आहे. इमारतीच्या पुढे राहावयास आल्याने एक फायदा झाला. चवथ्या मजल्यावरच्या 'त्या' चिमुरडीशी मैत्री झाली.
आता ती खूपच मोठी झाली होती. हल्ली स्कूटरवर बसून कॉलेजात जाऊ लागली होती. अभ्यासामुळे की काय कोण जाणे जास्त दिसायची नाही. कधीतरी रविवारी (त्या दिवशी कॉलनीत इडलीवालासायकलवर बसून येतो) बाल्कनीत दिसायची. कधी पोळी (सकाळी लवकर असेल तर) नाहीतर जेवणाच्या वेळी कधी पित्झाचा नाही तर बर्गरचा तुकडा द्यायची. पण केक नाही. कसं सांगू तिला मला केक दे म्हणून?
त्या दिवशी फार भयंकर घटना घडली. कॉलनीतल्या मुलांच्यापैकी कोणाचा तरी मित्र छर्‍याची बंदूक घेऊन आला होता. बाबा समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर त्यांच्या मित्रांसमवेत बसले होते. त्या माणसाने झाडलेल्या बंदूकीतली गोळी बाबांच्या छातीतून आरपार गेली. बाबा खाली कोसळले. कॉलनीतली सगळी मुलं भोवती जमा झाली. झाडांवर, इमारतीच्या गच्चीवर, इलेक्ट्रीकच्या तारांवर सगळीकडून कावळे जमा झाले. सर्वच जणं काव-काव करत होते. मुलांना नंतर वाईट वाटले. त्यांनी त्या बंदूक वाल्याला घालवून दिलं. कोणी बाबांच्या चोचीत पाणी घालायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शेवटी कॉलनीच्या बागेतच एका कोपर्‍यात खड्डा खणून बाबांना त्यात पुरलं. वर एक आंब्याचे झाड लावून त्यावर माती लोटली. माळ्याने झारीने पाणी ओतलं, मग सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. मी आणि आई तिथेच उभ्या एका ट्रकच्या टपावर बसून हे सर्व पाहात होतो. त्यादिवशी रात्री आई पंखात चोच खूपसून रात्रभर रडत होती. मी आईच्या पाठीवरून चोच फिरवून तिचं सांत्वन करत राहीलो.
या सर्व घटनाक्रमात कॉलनीतल्या बहूतेक गॅलर्‍यांमधून माणसं खाली चाललेला प्रकार दु:खी अंत:करणाने पाहात होते. चवथ्या मजल्याच्या गॅलरीतून 'ती', तिची आई आणि तिचे बाबा पाहत होते. दुसर्‍या दिवशी माझी आई कुठे बाहेर पडली नाही. 'ती'ने गॅलरीत पोळीचे खूप तुकडे ठेवले होते. त्यातील कांही मी आईला आणून दिले. काही मी खाल्ले. बंदूकवाले, बेचकीवाली मुलं, नेमबाजी करणारी मुलं यांच्या पासून दूर राहा, त्यांचा खेळ होतो पण आपल्यासारख्या दुर्बलांचा जीव जातो, असं आईने पुन्हा एकदा मला बजावलं. आमचा दिनक्रम पुर्ववत होण्यास बराच वेळ लागला. पण नाईलाज होता. या काळात 'ती'च्या आईने रोज गॅलरीच्या कठड्यावर पोळीचे तुकडे ठेवले. आमच्या दोघांचेही जेवण व्हायचे. हळूहळू आई सकाळचे किडे, दुकानाबाहेर टाकलेले जोंधळे, टिपायला जाऊ लागली. मी माझ्या मित्रांसमवेत दूरदूर उडायला जाऊ लागलो. उन्हाळ्यात हल्ली ठराविक घरांसमोरच वाळवणं दिसतात. राखणदारी करायला बसलेल्या लहान मुलाची किंवा मुलीची नजर चुकवून पापड पळवणं कांही कठीण जायचं नाही. कधी चांगल्यापैकी कडधान्यही मिळायची. रस्त्यात मरून पडलेले उंदीर, घुशी तर मिळतच परंतु ह्या झुडपातून त्या झुडपात पळताना मिळणारे जीवंत उंदीर पकडणे या सारखा मजेचा खेळ नाही. कधी-कधी माणसं त्यांनी घरात पिंजर्‍यात पकडलेले उंदीर उकिरड्यावर आणून टाकीत तेही कुठे लपण्याआधी पकडण्यासाठी टपून बसावे लागे.
एक दिवस 'ती' स्वत:च्या स्कूटरवरून नाही तर दूसर्‍या कुणा तरूणाच्या कार मधून घरी आली. कोण होता तो? रुबाबदार होता. बराच वेळ त्यांच्या घरी बसला होता. पुन्हा दोघेही बरोबरच बाहेर पडले. बाल्कनीतून तीच्या आईने आणि बाबांनी हात हलवून हसत हसत टाटा केला. ती त्याच्या गाडीत बसून कुठेतरी बाहेर गेली. मी गाडीच्या वरून थोडे अंतर उडत उडत गेलो. कॉलनी मागे पडल्यावर त्याने तीच्या खांद्यावरून हात टाकून तीला जवळ घेतलं, मी परत फिरलो. ती एवढी मोठी झाल्याचे मला कधी जाणवलेच नाही. विचार केला, मोठी कशी होणार नाही, ती काय 'चिमुरडीच' राहाणार आहे? मी सुद्धा मोठा झालोच होतो. माझंही एक गुपित होतच की. हल्ली मित्रांना तीन-तीन, चार-चार दिवस भेटायचो नाही. देवळासमोरच्या पिंपळावरच्या एका कावळीशी माझी मैत्री झाली होती. आम्ही दोघेच दूर-दूर उडायला एकत्र जायचो. डोंगरावर, कडेकपार्‍यात गप्पा मारत बसायचो. अंधार पडायच्या सुमारास परतायचो. आईलाही ती कावळी आवडली होती. शेवटी एके दिवशी ती आमच्या घरट्यात राहायला आली.
हल्ली केकचा तुकडा राहो दूर, पोळीचा तुकडाही मिळायचा नाही. 'ती' लग्न होऊन सासरी गेली आणि माझा पोळीच्या तुकड्यांचा रतिब तुटला. सुरुवातीला 'ती'ची आई खुप दु:खात होती. 'ती'च्या फोटोंचा अल्बम घेवून रडत बसायची. आम्ही दोघांनी ग़ॅलरीत बसून वाकून त्यांच्या घरात हे दृष्य अनेक वेळा पाहीलं होतं. वडील उघड उघड रडायचे नाहीत पण रात्री उशीरा पर्यंत गॅलरीत सिगरेट ओढत बसायचे. हिने कित्येक वेळा मला झोपेतून जागं करून दाखवलं होतं.पुढे हळूहळू त्यांच दु:ख कमी झाल्या नंतर तीची आई पोळीचे तुकडे गॅलरीत ठेवू लागली. पण हल्ली माझं मन व्हायचं नाही ते तुकडे आणायला. त्या घरात 'ती' माझी जीवाभावाची मैत्रीण नव्हती. जिला मी ती 'चिमुरडी' असल्या पासून पाहीलं होतं. जिने स्वत:हून, प्रेमाने मला केकचा तुकडा दिला होता. मी तो खाल्यावर आनंदाने टाळ्या पिटल्या होत्या. आम्हा कावळ्यांना एवढे प्रेम कोण देतो? सगळे आम्हाला 'काळा' म्हणून हिणवतात, आमच्या आवाजाला 'कर्कश्य' म्हणतात. पिंडाला शिवणारा अशी सरसकट सर्वच कावळ्यांची संभावना करून फक्त अंत्यविधीला लागणारा म्हणून 'अशुभ' मानतात. पाहुणे येण्याची सूचना देणार्‍या कावळ्यांनाही देवदूत मानायचे सोडून 'काय करायचे आहेत पाहुणे या महागाईच्या काळात' असे म्हणून हातातली वस्तू फेकून मारून हाकलून त्यांचा अपमान करतात. अशा वस्तूस्थितीत 'ती' प्रेमाने पोळीचा तुकडा खाऊ घालायची.
आता 'ती' सासरी जाउनही बरेच महीने उलटून गेले होते. एक दिवस त्यांची गाडी कॉलनीत आली. गाडीतून तिचे आई-बाबा, नवरा आणि 'ती' खाली उतरले. 'ती' गाडीचा आधार घेऊन सावकाश उतरली. तीच्या आईच्या हातात 'ती'चं बाळ होतं. मी काव-काव करून जोरात हाक मारली. तीने चालता चालता सावकाश वळून माझ्या घरट्याकडे बघितलं. हसली. माझ्याकडे बोट दाखवून नवर्‍याला कांही तरी सांगितलं. त्याने हसून माझ्याकडे पाहीलं. माझी छाती अभिमानाने फुलून आली. ही कौतुकाने माझ्याकडे पाहात होती. आईने माझ्या पाठीवर आपली म्हातारी चोच घासली. तिच्या डोळ्यात पाणी आलं.
तिच्या घराच्या खिडकीवर जाऊन बसणं. आंत डोकाऊन पाहणं. तिच्या बाळाची आंघोळ, दुध पिणं, रडणं, झोपणं सर्व पाहाताना मला 'ती'चं कौतुक वाटायचं. पोळ्यांचा रतिब परत सुरु झाला होता. मी आनंदाने तुकडे गोळा करून आणायचो. ती असे पर्यंत हे चालत राहीलं. आता तीने स्वत:च केक खाणं बहुधा सोडून दिलं होतं. मी पोळ्यांच्या तुकड्यांवर समाधान मानत होतो.
त्यानंतर ३-४ वेळा ती राहायला आली होती. तीची मुलगी आता मोठी झाली होती. माझी पिल्लही मोठी होत होती. लवकरच त्यांना उडायला शिकवयचा दिवस जवळ येणार होता. 'ती' तीच्या मुलीला हात धरून चालायला शिकवत होती. आता मला 'ती'ची भिती वाटत नव्हती. 'ती' तीच्या मुलीला घेऊन बाल्कनीत यायची तेंव्हा कठड्यावर त्यांच्या पासून फक्त दोन हात दूर मी बसायचो. काव-काव करायचो. आज 'ती'ने बशीत कांही तरी खाऊ ठेवून मला हाक मारल्यावर मी लगेच गेलो. 'ती'च्या मुलीच्या हातात कांही तरी खाऊ होता. तोंड सगळं बरबटलं होतं. मी वास लगेच ओळखला. छाती भरून श्वास घेतला, बशीमधे माझ्यासाठी ........केकचा तुकडा होता.

No comments: