Sunday, May 13, 2007

झोप............

संध्याकाळचे साडेसहा सात वाजलेत। नुकताच अंधार होवू घातलाय. संधिप्रकाशाने आसमंत व्यापलाय. आजूबाजूची गर्द हिरवाई जाग्या होत असलेल्या अंधारामुळे अधिकच गर्द दिसू लागलेय. आम्ही अकरा जण रांगेत उभे आहोत. सगळ्यांच्या चेहेर्‍यावर "दमणूक" हीच चार अक्षरं दिसतायत.... आम्ही बसत का नाही? छे, शक्यच नाहीये ते..... एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला दरी. मधे जेमतेम दोन पावलं मावतील एवढी जागा एकामागोमाग अकरा जागा व्यापून आम्ही उभे....काय गरज होती trek ला यायची? तोपण इतका अवघड. घरी आरामात तंगड्या वर करून बसलो असतो आणि TV पाहिला असता....
थोडावेळ आजूबाजूचं भानच जातं। कालपासूनचा घटनाक्रम डोळ्यासमोर येतो. काल अनंतचतुर्दशी, शुक्रवार. घर ते ठाणे, संध्याकाळी साडेसातची लोकल. ठाणे ते पुणे रात्रीची एस्टी......छे लाल डब्यात झोप काही ती मिळत नाही....मग दगडूशेटची मिरवणूक. दोन तीन तास पायपीट. सकाळी लेट झालेली एस्टी. तोरण्याचा पायथा. सापांपासून सावध राहायला सांगणारा तो पोलिस. तीन तासांत तोरणा सर. जेवण. समोर दिसणारा राजगड. तोरण्यावरचा बुधला आणि बुधल्याच्या डाव्या बाजूने खाली उतरणारी पायवाट. मग जीतोड चाल. फक्त चाल चाल आणि चालच.........जांभई येतेय का? इथे? आता? कधी झोपलो होतो शेवटी? परवा. बरोबर, जांभई.....
पुढे गेलेल्या दोघांच्या हाका उरलेल्या अकरांची गुंगी उडवतात। राजगड तर समोर आहे, अगदी समोर. कड्यांपर्यंत जाऊ शकतो, पण वर जायला वाट नाही. दहा जणांची गुंगी आणि अकराव्याची झोप उडते.......जेवढं अंतर आलो तेवढं परत चालायला लागणार. मघाशी वाटलं होतं वाट चुकलो म्हणून.........सव्वीस पावलं माघारी वळतात. समोर एक आदिवासी पाडा दिसतोय. सर्वानुमते थांबायचा निर्णय होतो......पण त्या पाड्यापर्यंत जायचं म्हणजे अजून एक तास तरी जाणार, मग गडावरच का जाऊ नये.....
तेवढ्यात एक मावळा समोरून येताना दिसतो। तो तेराही जणांना गडावर पोहोचवायचं आश्वासन देतो, अवघ्या शंभर रुपयात.....फक्त शंभर रुपये? गंडवत तर नाहीये ना? नसेल.......आता तेरामध्ये दोन तट पडतात. काही म्हणतात आज राजगड शक्य नाही. खाली राहूया. दुसरे म्हणतात. ही तर हार. राजगड सर करायचाच...... थांबावं की जावं?.....पाय म्हणतात थांबावं, मन म्हणतं जावं. मी पायांना थोपवतो आणि मनाला मानतो.
आता आम्ही चौदा। पुढे मावळा, मागे तेरा.......हा कुठे चालला झाडीत? ह्याला तरी माहिती असेल ना राजगडाचा रस्ता? बहुतेक असेल......झाडीत शिरल्यावर अंधार. विजेर्‍या बाहेर येतात. चौदा जणांकडे मिळून तीन. पहिली मावळ्याच्या हातात. दुसरी तेराव्याकडे आणि तिसरी मध्ये कुठेतरी.......कुठे चाललोय? चढतोय खरे म्हणजे वरंच जात असणार....
एक छोटंसं पठार। दोघंतिघं विश्रांती मागतात. दिली जाते. पाणी. पाणी संपतंय. रेशन करायला हवंय. सातव्याच्या पायांत गोळा आलाय. सातवा सगळं पाणी पितो. उरलेल्यात मीठ घालून त्याच्या हातात दिलं जातं..... नक्की पायांत गोळा आलाय का पाण्यासाठी? छे, सातवा असं करणं शक्य नाही......
पुन्हा मावळा पुढे आणि तेरा मागे। सातवा मधून मधून रडतोच आहे. पुन्हा चौदा उतरायला लागतात.....उतरणं नको. जेवढं उतरू तेवढंच पुन्हा चढायला लागणार.......पाय नाराज. मावळा समोरचा डोंगर दाखवतो. ही टेकडी पार केली की चिकटलोच गडाला. पायांची नाराजी थोडीशी कमी.....ह्याला नक्की रस्ता माहितेय का?...
टेकडी पार होते। छोटंसं पठार.....दिवे? हा दिवा कसला? रायगडावर दिवे होते माहीत होतं राजगडावर कधी?.......झुडुपांतून बाहेर पडल्यामुळे वाढलेल्या प्रकाशाला डोळे सरावतात. पांढर्‍या दिव्याच्या जागी पौर्णिमेचा चंद्र दिसायला लागतो..... अप्रतिम. पांढरा शुभ्र दुधासारखा. डागही किती स्पष्ट दिसतायत. अरे कुठे गेला? झाडाआड?.... चौदा पुढे चालत राहतात. आता शेवटचा वाटावा असा खडा चढ. पाय पुन्हा रडतात. सातवाही रडतो. दोघांना वर असलेल्या थंड पाण्याच्या टाक्यांची गाजरं.
...पोचलो....संजीवनी माची। पाण्याच्या टाक्या....चांगलं असेल का पाणी? कसंही का असेना....ग्लूकोजचे पुडे आणि त्यावर हवं तेवढं पाणी. पाय शांत, पोट शांत, मन शांत. विडीकाडीवाले विड्या शिलगावतात. मावळा पण एक विडी घेतो. पांढर्‍या विडीचं त्याला नवल. तो सगळं पाकीट ठेवून घेतो. दुसर्‍याला खरं तर त्याचं पाकीट परत हवं असतं. पण गडावर पोहोचल्याच्या खुशीत तो दिलदार होतो.
मावळा परततो। आता पहिला परत पहिला होतो. त्याच्या पाठून बारा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघतात. बालेकिल्ला बाजूला ठेवून तेरा पद्मावतीच्या दिशेने चालतात. थोडा वेळ चालल्यावर पद्मावती माची येते.....देवळात राहायचं होतं पद्मावतीच्या. आहे का जागा? आत लोकं झोपलेयत. आता काय ह्या थंडीत उघड्यावर झोपावं लागणार की काय? दारूखाना बघूया. दारूखान्यात एक दोनच आहेत.....
सगळे तेरा दारूखान्यात शिरतात। मी माझी सॅक खाली ठेवतो. उघडून आतलं हंतरूण, पांघरूण काढतो. पांघरूण जमिनीवर पसरतो. हंतरूण पांघरायला घेतो......चला पोचलो एकदाचे. आहाहा. पाठ टेकल्यावर जमिनीला काय बरं वाटतंय........................................
पुढे?

सकाळ......

No comments: