Friday, May 11, 2007

कानावर पडलेल्या दोन गोष्टी!!!!

गोष्ट पहिली
एका तरुणाला लोकांसाठी, समाजासाठी काही तरी करावे असे वाटत असते। त्यासाठी तो राजकारणांत उतरण्याचा विचार करतो. त्याच्या वडिलांना त्याचे राजकारणांत जाणे पसंत नसते. मुलाला समाजसेवाच करायची असेल तर त्याने एखाद्या अशासकीय सेवाभावी संस्थेचा सभासद व्हावे असे त्यांना वाटत असते. पण मुलाला ते मान्य नसते.
शेवटी मुलगा ऐकत नाही हे पाहून वडील त्याला म्हणतात की तो राजकारणांत जायला लायक आहे की नाही हे पहाण्यासाठी त्यांना त्याची परीक्षा घ्यायची आहे। त्यांत तो उतरला तर ते त्याच्या आड येणार नाहीत. मुलगा हे मान्य करतो.
वडील त्याला आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन बाल्कनींत उभे रहायला सांगतात। स्वतः बाल्कनीच्या खाली उभे राहतात आणि त्याला बाल्कनींतून खाली उडी मारायला सांगतात.
मुलगा बिचकतो। इतक्या उंचावरून उडी मारली तर मोठी दुखापत होईल असे वडिलांना सांगतो. वडील त्याला तू कशाला घाबरतोस मी सावरतो ना तुला म्हणून सावरण्याच्या पवित्र्यांत राहतात. वडिलांनी आश्वासन दिल्यामुळे मुलगा बाल्कनींतून खाली उडी मारतो. त्या क्षणी वडील त्याला सावरण्याऐवजी मागे सरकतात व त्याला पडू देतात. मुलाला बरीच दुखापत होते.
मुलगा रागावतो. वडिलांकडे रागाने पाहात म्हणतो तुम्ही धरतो म्हणालात म्हणून मी उडी मारली तर तुम्ही मागे सरलात.
वडील हसतात नी म्हणतात, तू राजकारणांत जायला योग्य नाहीस। बापावरही विश्वास ठेवायचा नसतो हा राजकारणांतला पहिला नियम आहे.


गोष्ट दुसरी
एक आई, वडील व दोन मुलगे असे चौघांचे कुटुंब असते। मुले अभ्यासू असतात. मोठा मुलगा चांगला शिकतो व अमेरिकेला जातो. तेथे स्थिरस्थावर झाल्यावर आपल्या धाकट्या भावालाही बोलावून घेतो. घरांत फक्त आईवडील राहातात.
एकदा आई आजारी पडते। पैशाची कमतरता नसते. पण महागांतले महाग डॉक्टरी उपचार करूनही ती वाचत नाही. ती वारल्याची बातमी मुलांना अमेरिकेंत कळवली जाते. धाकटा मुलगा सुटी काढून तातडीने भारतांत येतो.
तो एकटाच आल्याचे पाहून वडील विचारतात, "काय रे दादा नाही आला?" त्यावर धाकटा मुलगा सांगतो, "नाही आला. तो म्हणाला, दोघं दोघं कशाला? यावेळी तू जा. बाबा गेले की मी जाईन.

No comments: