मे महिन्याचे काही दिवस सुट्टी घेऊन नितीन घरी आलेला. मस्त उशीरा उठायचे, आईच्या हातचे जेवण,दुपारची झोप, संध्याकाळचा चहा, जुन्या मित्रांशी कट्ट्यावरच्या गप्पा आणि रात्रीच्या जेवणानंतरचे पान........ :-) मला तर कल्पनेनेच स्वर्गात पोचल्यासारखे वाटतंय. पण नितीनला मात्र मोठी सुट्टी घेऊन घरी राहायचं नव्हतं. तसे त्याला सुट्टी मिळणे अवघड नव्हते पण कित्येक दिवसांपासून टाळलेला विषय त्याला यावेळी टाळता आला नव्हता. लग्नाचं वय उलटून १-२ वर्षे होऊनही गेली होती. नितीनला मात्र कुठली मुलगी पसंत पडत नव्हती. आता त्याच्या म्हणण्यानुसार आजकाल या इंजिनियर मुलांना त्यांच्याच क्षेत्रातली मुलगी हवी असते. त्यामुळे त्याला त्यांच्यासारख्या छोट्या गावातली मुलगी त्याला नकॊ होती तर शहरातली कुठली मुलगी त्याच्या गावी राहणाऱ्या आई-बाबांना पसंत नव्हती. तर असा हा तिढा कित्येक वर्षे सुटत नव्हता.
त्याचं म्हणणं मी एखादी कामाची गोष्ट बोललो तर बायकोला समजली पाहिजे ना? कामाची वेळही पक्की नसते, मग कधी परदेशी जावं लागतं, इ. त्याच्या म्हणण्यानुसार दोघंही एकाच क्षेत्रातले असले की समजून घ्यायला सोपं असतं. त्याला वाटे की इथे कोणाला काही समजत नाही आपलं म्हणणं. इथल्या लोकांत तो त्यालाच वेगळा वाटायचा. तर त्याच्या आई-बाबांचं म्हणणं असं की,"अरे आपली राहणी वेगळी, शहरातली वेगळी.सण-वार, नातेवाईक,घरंच सगळं करणारी मुलगी हवी ना?" त्यावर चुकून तो असंही म्हणाला की," तिला कुठे तुमच्या सोबत रोज राहायचं आहे. तुम्ही असंही घर सोडत नाही." हे मात्र आईला फारच लागलं आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून शेवटी एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष लावूच म्हणून ४ आठवड्यांची सुट्टई घेऊन तो घरी आला होता. रोज मग जवळच्या किंवा जरा दूरच्या गावांत जाऊन मुली पाहणे, कधी मुलींचे आई-बाबा मुलाचं घर पाहायला येणे असा काहीसा कार्यक्रम होणार होता.
कित्येक वर्षात तो निवांत असा घरी राहिलाच नव्हता.शिक्षण,नोकरीसाठीची धावपळ यात दिवाळीला, गणपतीला जमेल तसं २-४ दिवस राहायचं, त्यातही निम्मा वेळ झोपण्यात, टी.व्ही. पाहण्यात जायचा. उरलेल्या वेळात आपल्या मुंबईतल्या मित्रांना,मैत्रिणींना फोन करण्यात, मेसेज करण्य़ात जायचा. त्याच्या आईला कळायचं नाही की हा घरी असतानाही कामाबद्दल आणि ऑफिसातल्या लोकांशी का बोलतो? आता घरी येऊन त्याला आठवडा झाला होता आणि त्याला आळसाचाही कंटाळा आला. कधी नव्हे ते तो सकाळी लवकर उठायला लागला आणि त्याला वेगळाच अनुभव येत होता. खूप दिवसांनी त्याला जाणवलं होतं की आपल्या आई-बाबांचा दिवस आजही सकाळी ६-६.३० ला सुरू होतो. आजही आई दारात रांगोळी काढते, बागेतली फुले कुणी चोरून तर नाही ना नेली हे तपासून पाहते आणि आपल्या इतक्या वर्षांच्या दूधवाल्याशी आजही तसाच वाद घालते. प्रदूषित शहरापेक्षा इथली सकाळची सुद्ध हवा माणसाला किती प्रसन्न करते आणि रेडियोवरच्या पुणे-सांगली केंद्रावरची आपली आवड आजही तिच मराठी गाणी लावते......
सकाळी सायकलवरून जाणारी मुले, जुनेच शिक्षक (बरेचसे पिकलेले केस) जुन्या आठवणी ताज्या करून गेले. त्याच्या मनावरचा ताण आता बराच कमी झाला होता. त्याला जणू आपल्या अस्तित्वाचा उगम सापडला होता. हळूहळू त्याला हे ही जाणवलं की शिक्षकच कशाला आपल्या आईचेही केसही आता बरेचसे पिकलेत आणि बाबांनाही बाहेरून आल्यावर दम लागलेला असतो. माणूस स्वत:मध्ये किती गुरफटलेला असतो नाही? एरवी घरी आल्यावर फक्त आपले कपडे धुवायला टाकायचे आणि जाताना इस्त्री केलेले कपडे घेऊन जायचे हे माहीत होतं. यावेळी प्रथमच त्याला जाणवलं की कामवाल्या काकू आल्या नाही तर आई स्वतः:च कपडे धुऊन इस्त्रीवाल्याकडे देऊन येते.चक्क त्याने आईला रागावून सांगितलं की मला काही लगेच कपडे लागणार नाहीयेत आणि लागले तरी बाहेरच देऊ धुवायलाही हवं तर. प्रत्येकवेळी तो म्हणायचा की किती जुना झाला आहे सोफा, किती वर्षांची जुनी भांडी आई अजून वापरतेच आहे.घराला नवा रंग लावून घ्यायचा होता. आता मात्र त्याने घराचा मक्ता आपल्या हातात घेतला आणि कामाला सुरुवात केली. पण ते करणंही सोपं नव्हतं......
त्याने घराचा नवीन रंग कोणता हे ही दुकानात जाऊन ठरवून घेतलं. रंगारी कुठून आणणार? त्याला शंभर वेळा फोन लावला पण कोणी उचलेना. शेवटी स्वत:च धडपड करून चार लोक शेजारच्या गावातून बोलावले घेतले. एरवी ४० लोकांची टीम सांभाळणाऱ्या नितीनला या चार लोकांना कसं कामाला लावावं हे कळत नव्हतं. :-) दुपार झाली की हे आपले तंबाखू चोळत गप्पा मारत बसत. बरं यांना काही अप्रेलजचीही धमकी देता येत नव्हती ना. :-) कसेबसे एका खोलीतले काम पूर्ण करून घेताना त्याच्या नाकी नऊ आले होते. तेच नाही अजूनही बाकीची कामे करताना लक्षात आलं की वातानुकूलित कचेऱ्यांत बसून काम करण्यात आणि या रोजच्या व्यवहारात किती फरक आहे ते. किराणा माल, भाज्या निवडून विकत आणण्यापासून घरात एखादी वस्तू घेण्यापर्यंत. त्याने किती तरी वेळा घरी येताना काही ना काही गिफ्ट आणले होते. बाबांसाठीचा परफ्यूम, आईसाठी घेतलेले वॉशिंग मशीन हे सगळं त्यांच्या साध्या आयुष्यात कुठे बसतंच नव्हतं. सॊफ्टवेअर मध्ये एखादा प्रोग्रॅम चुकीच्या दिशेने जातोय असं कळल्यावर मागे जाऊन आपल्या गरजा किंवा गृहीत काय आहेत याला 'Requirement Review' म्हणतात. तर नितीनला रोजच्या जीवनातही त्याची आवश्यकता वाटू लागली.
घरी येणारे,येता-जाता बोलणारे, आवर्जून त्याची चौकशी करणारे लोक इथे होते.कसं ना,इथे कोणीही विनाकारणही भेटायला येऊ शकतं?तो घरी नसताना आई-बाबांना अशा मित्रांची आणि नातेवाईकांचीच तर सोबत होती. नातेवाईक,समाज या गोष्टींचा प्रभाव त्याला आताशी कुठे नव्याने कळत होता.एके दिवशी बाबांचे एक मित्र घरी आले होते.असेच बातम्या बघायला आणि गप्पा मारायला.म्हणजे संध्याकाळी सातच्या मराठी बातम्या जणू तो विसरूनच गेला होता. त्या संपल्यानंतर त्यावरच्या चर्चा....आणि त्यांचे बोलण्याचे विषय फार विचार करायला लावणारे वाटले त्याला. :-) रोज ८-८ च्या नोकरीमध्ये स्वत:साठीच वेळ नव्हता तर मग बाकीच्यांसाठी काय असणार?म्हणजे "या लोकांना काय कळतंय" असं मी म्हणतो पण मला तरी चार संगणकाच्या बटणांपलिकडे काय माहीत आहे? आयुष्य म्हणजे केवळ २४ बाय ७ सोफ्टवेअर सपोर्ट देणे नव्हतं हे त्याला जाणवू लागलं होतं. "काय मग कसं चालंलय नितीनराव? तुमचा कंप्युटर काय म्हणतो? आमची स्वाती पण करते बरं का कंप्युटरवर कामं." काकांनी किती तरी वेळा त्याला हे सांगितलं होतं. पण प्रत्येकवेळी ते मोठ्या अभिमानाने आपल्या स्वातीबद्दल सांगत. तिने बी.कॊम. नंतर गावातच एका ठिकाणी संगणकाचे शिक्षण घेतले होते. तशी ती स्मार्ट होती आणि काही टायपिंगचेही कोर्सेस करुन तिथेच एका ब्यांकेत नोकरीही मिळवली होती. तर तिच्या या कंप्युटरच्या कामाची तारीफ नितीनला नेहमी ऎकायला लागायची.
१५-१६ दिवस उडून गेले. मुली पाहतानाचा त्याचा दॄष्टीकोण बदलला होता. आता त्याच्याच क्षेत्रातली मुलगी हवी असा त्याचा हट्ट कमी झाला होता. त्याचबरोबर घराच्या सुधारणेची कामेही चालू होतीच. काही कामासाठी त्याने आपल्या खात्यातून बाबांच्या लोकल बँकेतील खात्यावर पैसे जमा केले होते. पण चेक टाकून ८ दिवस झाले तरी पैसे काही आले नव्हते. आता बँकेत जाऊन पाहायलाच हवं म्हणून तो स्वत:च एक दिवस तिथे गेला. ७-८ लोकच रांगेत होते,धोतर, नऊवारी साड्या अशा कपड्यातील मंडळीही तिथे दिसत होती. अर्ध्या तासात काम होईल असं वाटून तो जरा विसावला. पण तास भर झाला तरी काही रांग संपेना. शेवटी त्याने शेजाऱ्याला काय झालं म्हणून विचारलं. "काय तर कंप्युटर मध्ये घोळ हाय म्हणत्यात. अन साहेबबी बाहेरगावी गेल्यात. "आज काही पैसे काढता येणार नाहीत असं कॅशियरने सांगितले.
लोकांच्या खात्यांची माहीती असलेला प्रोग्रामच उघडत नव्हता. कॅशियर तसा माहीतीचाच होता,तो नितीनकडे पाहून हसला.त्याने विचारले," अरे नितीन तूच बघतोस का काय झालंय ते?आज गावाचा बाजार असतो. ही मंडळी शेजारच्या छोट्या गावातून येतात. त्यांना आज पैसे नाही मिळाले तर आठवडाभर खायची बोंब होते." सर्वांचे अपेक्षेने पाहणारे डॊळे पाहून नितीने पुढे झाला. हेच जर त्याला कंपनीत सांगितले असते तर त्याने उत्तर दिले असते," मला प्रोजेक्टची माहीती पाठवून द्या इ-मेलने.मी समजून घेऊन मग impact analysis करतो.त्यावरून मग दुरुस्तीला किती वेळ लागेल हे सांगू." त्यातही प्रोजेक्ट प्लान वगैरे बनवून, टीममेंबर नेमून देऊन काम पूर्ण व्हायला आरामात ८-१० दिवस घालवले असते. :-) पण इथे इज्जतका सवाल असल्याने सगळे प्रश्न गिळून तो संगणकाकडे बघू लागला. आता पहिल्या खिड्कीवरच त्याला कळले की प्रोग्रॅम खूप हळू चालतो आहे, म्हणजे 'Performance Tuning' आलंच. :-) त्याने जरा माऊस हलवून पाहीला पण सगळ्या खिडक्यांनी मान टाकलेली होती. मग त्याने उगाचच तो प्रोग्रॅम कुठल्या संगणकीय भाषेत आहे हे पाहीलं. अर्थात हे पाहूनही त्याला काही करता येणार नव्हतं म्हणा. गेल्या कित्येक वर्षात त्याने प्रत्यक्षात संगणकावर काम केलंच कुठे होतं? नुसत्या उंटावरून शेळ्या(की Human Resource) हाकल्या होत्या.
थोडा वेळ त्याने काही फाईल्स उघडूनही पाहील्या पण त्याला काही कळत नव्हतं. मग त्याने सर्वात शेवटचा पर्याय अवलंबला. कोणता? 'Alt+Ctrl+Det'. :-) Shut Down. संगणक चालू झाला आणि पहिल्या एक-दोन खिडक्या नीट उघडल्याही.सर्वांनी हुश्श केलं पण ते काही जास्त वेळ टिकलं नाही. तेव्ह्ढ्यात त्याला स्वाती दिसली. तिने लोकांना जरा थांबवून ठेवलं आणि संगणकाकडे आली. तिने शेजारचा एक पंखा ओढून आणला आणि प्रोसेसरच्या मागे जोरात लावून दिला. "प्रोग्रॅम ठीक आहे नितीनसाहेब पण तुमच्यासारख्या वातानुकुलित केबिन्स नाहीत ना. त्यामुळे जरा त्रास देतोच हा संगणक. त्यासाठी हा पंखा पुरेसा आहे. "दुपारच्या उन्हात तापलेला तो प्रोसेसर पुन्हा सुरळीत सुरु झाला आणि १० मिनीटांत एकेकांना पैसे मिळायला सुरुवात झाली होती. आपले पैसे घेऊन जाण्यासाठी नितीन कॅशियरजवळ आला तेव्हा स्वाती हळूच म्हणाली,"कधी कधी गोष्टी साध्याच असतात पण आपल्यालाच सोपी उत्तरं माहीत नसतात. आणि हो "अल्टर+कंट्रोल+डीलीट" नेही फक्त समस्या तात्पुरत्या सुटतात....कायमस्वरुपी नाही."
:-)
परतताना नितीन एकदम खूष होता। कदाचित गुंता सर्व मनातच होता. त्याने स्वत:ला एकाच साच्यात बसवून घेतले होते आणि त्यातून बाहेर पडणं त्याला अवघड झालं होतं.आणि कोणी त्याला काही वेगळं सांगायला लागलं की तो स्वत:ला 'शट डाऊन' करुन घ्यायचा. गेल्या काही दिवसांनी त्याला जगण्याचा नवा दॄष्टिकोन दिला होता. पुन्हा एकदा सगळं सोपं वाटत होतं, पूर्वीसारखं,आपलं वाटत होतं. आज परत आल्यावर त्याने वधुपरिक्षेसाठी लिहीलेली प्रश्नांची यादी फाडून टाकली होती. आईच्या गळ्यात पडून तो म्हणाला,"मग कधी सून घेऊन येणार तुझ्यासाठी?
तुझं वय झालं आता."
No comments:
Post a Comment