Sunday, August 19, 2007

आम्हांस आलेले (प्रेम)पत्रक...


माझ्या खवचट खेचरा,
गेले चार-पाच दिवस तू कोठे उलथला होतास? माझा फोनही घेत नव्हतास! स्वतःला उद्धव ठाकरे समजतोस की काय? लक्षात ठेव, आपली युती अशी नाही तोडू देणार मी! गेल्याच महिन्यात वडाच्या फांदीला फेऱ्या मारून तुला सात जन्म मागून घेतला आहे. या महिन्यातही बरीच व्रते-उद्यापने, उपासतापास येतात. ते "सकाळ'मध्ये साग्रसंगीत येईलच. त्यानुसार सर्व काही यथासांग करण्याचे मी ठरविलेच आहे. तेव्हा तुझी सुटका नाही!!
माझ्या उचलखोर उचापत्या, "सकाळ'मध्ये यंदा श्रावण अतिशय उत्साहाने साजरा करणार आहेत. तेव्हा "सकाळ'वाले "व्रत'स्थ महिलांचे, मंगळागौर जागविणाऱ्या भगिनींचे, उपवास करणाऱ्या पुरंध्रींचे फोटो छापणार आहेत काय, याचीही जरा चौकशी करून ठेव. छापणार असतील, तर नऊवारी साडीची सोय आताच करून ठेवलेली बरी. तुला आठवते? गेल्यावर्षी आपण दोघे मिळून अख्खे हिंदमाता फिरलो, तरी नऊवारी मिळाली नव्हती. तेव्हा मटामध्ये फोटो छापून येत होते! यंदा तरी तू माझा फोटो पेपरात छापून आणणार ना? हवे तर ब्लॉकचे पैसे देऊ आपण त्यांना!! असो.
पण तू खरेच कुठे गेला होतास? तुझ्या कचेरीतले लोक म्हणतात, की तुला पत्रकारांचा एड्‌स झालाय! - ऍक्वायर्ड इंटेलिजन्स डिफिशियन्सी सिंड्रोम!! माझ्या विसविशीत विसोबा, तुझ्याबाबतचे हे निदान तर मी मागेच केले होते! खरे तर मराठी पेपरांत हा रोग आता बराच पसरल्याचे दिसत आहे. या रोगाचे गावठी नाव "बनचुके' असे असल्याचे म्हणतात. सतत नव्या गोष्टींना नावे ठेवायची, नवे तंत्रज्ञान, नव्या पद्धती यांना नाके मुरडायची अशी काही या रोगाची लक्षणे आहेत. तुझ्या बोलण्यातून, लिहिण्यातून ती सहज दिसतात. नव्यातील चांगल्या गोष्टींचे स्वागत करायला जितक्‍या लवकर शिकाल, तितके बरे! नाही तर मग तुमचीच एक मोठी विसंगती होऊन जाते. आणि मग लोक तुम्हांला हसतात, तर तुम्हांला वाटते की तुमच्या विनोदांना हसतात! एड्‌समध्ये असेही भ्रम होतातच म्हणा!
माझ्या रागीट रेडक्‍या, तुला माझा राग तर नाही ना आला? रागावू नकोस रे! रागावलास, की तू सामनाच्या ले-आऊटसारखा दिसतोस! अरे, अलीकडे तू सामना पाहिलास का? राऊत साहेब रजेवर असून, भारतीताई त्याचे संपादन करीत आहेत, असे काहीसे झाले आहे काय? असो. मी रागावण्याबद्दल बोलत होते. तू माझ्यावर रागावणार नाहीस याची खात्री असल्यानेच खरे तर मी एवढे स्पष्ट लिहित आहे. अन्यथा मला काय अग्रलेख लिहिता येत नाहीत? अग्रलेख म्हणजे लोकसत्ताचे सोडून बरे का! नाही तर तुझा पारा एकदम चढायचा! तुम्ही केतकरी संप्रदायवाले ना!! पण माझ्या आगाऊ अडाण्या, तुम्ही केतकरांना आता सांगत का नाहीत, की त्यांचे अग्रलेख मुख्य अंकाबाहेर छापत जा म्हणून! कारण अलीकडे त्यांच्या अनेक अग्रलेखांचा आणि मुख्य अंकाचा जणू काही संबंधच नसतो! अग्रलेखातले संपादकीय धोरण वेगळे आणि बातम्यांतले वेगळे असे काही विचित्र चालले आहे. हवे तर याविषयी एकदा कक्काजींशीही बोलून घे! माझे, त्यांचे, श्रीकांतजींचे आणि शुभदाताई चौकरांचे मत अगदी सारखेच असेल!!
असो. खूपच लिहिले. एवढे वाचायचे म्हणजे तुला त्रासच! त्यातच काल गटारी होती. म्हणजे डोके अजून उतरले नसेल! "ती' उतरली तर "ते' उतरणार ना!! तेव्हा येथेच थांबते.
एकट्या तुझीच,
सही

No comments: