Sunday, August 5, 2007

जो शब्द.....


जो शब्द तू उच्चारला नाहीस कधीच माझ्यासाठी
त्याचे दार मी वाजवतेय.
कधीतरी मी लिहू शकेन त्यातूनच अशी एखादी कविता
जी पोचेल थेट तुझ्याआत...
तुझ्या हृदयातल्या छिदात राहील माझा एकुलता शब्द.
तोवर तशीच भटकत राहीन मी हताश ओळींमधून
तुझा ठाव शोधत.
कारण , कुठलीही नवी वाट बनवत नेली जंगलातून
तरी दरवेळी पुढे एक अवचित कडा लागतो
आणि खाली खोल दरी...
निमूट परतते मी पुन:पुन्हा स्वत:जवळ.
तुझ्यापर्यंत पोचण्याच्या गच्च इच्छेत माझे पाय
बुटांतल्या पायांसारखे आक्रसून लहानच राहिलेत
झिजताहेत इच्छांचे तळवे आणि टोचत राहतात खडेकाटे
तरीही फेकता येत नाहीत काढून.
हे सारे तुला सांगावे की नाही , कळत नाही.
खरेतर , मला कळत नाही व्याकरण तुझ्या भाषेचे
तरीही उच्चारते शब्द जोडत वेडीकुडी वाक्ये
अधिकच हास्यास्पद बनत जाते कदाचित
त्यामुळेही तुझ्या नजरेत.
मी पाहिलं नाहीये तुला कधीच कविता वाचताना
तू कधीच कवितेने असा संपूर्ण बनलेला
दिसलाच नाहीयेस मला.
आणि तरीही आता सारं लिहिणं थांबवून
मी तुझ्यासाठी एक कविता विणू इच्छिते...
ऐन हिवाळ्यात लाभलेल्या
उबदार उन्हाच्या तुकड्यासारखी ,
जिच्यात चमकत राहील
पानगळीनंतरची तांबूस कोवळी पालवी.
तुझ्या ठाम निश्चयी शब्दाच्या कणखर शरीरावर
निदान एक तलम कोवळ्या नक्षीची उबदार कविता
जी लपेटून मिळू शकेल तुला
रात्री दिशादर्शक नक्षत्रांच्या सावलीत
गहिऱ्या स्वप्नांनी दाटून आलेली सुखद झोप
आणि पुन्हा पहाटेला
नवा हिरवाकंच ओलेता उत्साह अथक वाटचालीसाठी
कवितेसह वा कवितेशिवाय.

No comments: