त्या वषीर् , पळसाच्या नग्न विखुरलेल्या फांद्यांवर पहिलं फूल उमललं तेव्हा आई धडधाकट होती , हां हां म्हणता म्हणता अख्ख्या झाडाचं जेव्हा धगधगतं जंगल झालं तेव्हा आई आजारी पडली होती आणि ज्या रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सगळी फुलं तुटून , झाडाच्या पायथ्याशी चिरडलेल्या लाल फुलांचा चिखल बनला होता , आई मरून गेली होती. आम्ही एका खोलीत रहात होतो. ती खोली कोंदटलेली , जुनी , ढलप्या उडालेली होती. खोलीला तीनच कोपरे होते. एका कोपऱ्यात मी , दुसऱ्या कोपऱ्यात आई आणि तिसऱ्या कोपऱ्यात एक मोठा पलंग होता , ज्यावर मी आईच्या सोबत झोपायचो. खोलीच्या आपापल्या कोपऱ्यांवर आमचा पूर्ण अधिकार होता. एका कोपऱ्यात आईनं आपलं साम्राज्य पसरवलेलं असायचं. एक लहानसा चौरंग... चौरंगावर तिचे देव... जुने पुराणे पत्र्याचे दोन डबे... दोन गाठोडी.... काही बरण्या.... काही जुने कपडे.... जपाच्या दोन माळा.... बॅटरी.... हातानं वारा घ्यायचा पंखा... काही जुनी नाणी आणि बरंच काही. माझ्या भागात काही विशेष नव्हतं. थोडी पुस्तकं... जुनं लाकडी कपाट... त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या... थोडे कपडे आणि माझ्या वाढलेल्या वयावर नेहमी पसरलेलं अदृश्य मौन... जवळजवळ उदासपणा आणि भकासपणाच्या मधली काहीशी स्थिती. छोट्याशा खिडकीजवळ तिसरा कोपरा होता. त्या कोपऱ्यातच तो मोठा पलंग होता जो सगळ्या खोलीवर आपल्या भव्यतेनं दडपण आणायचा. आईला हा पलंग रूखवतात मिळाला होता. आईला या पलंगाचा मोठा अभिमान असायचा. जुन्या जमान्यातला हा पलंग. एकेकाळी या पलंगावर आई वडिलांच्यासोबत झोपायची. आईचे निघून गेलेले कितीतरी दिवस त्या पलंगात गुंतलेले होते , जे रात्री तिच्या जवळपास जिवंत व्हायचे. अनेकदा
रात्री मी आईला हळूच त्या दिवसांशी गप्पा मारताना बघितलेलं होतं , ऐकलेलं होतं. अचानक उगीचच हसताना... रडताना आणि कधी कधी लाजतानासुद्धा बघितलेलं होतं. मला नेहमी वाटायचं की आई माझ्यापेक्षा त्या पलंगाच्या जास्त जवळ आहे. बऱ्याचदा ती जे मला सांगायची नाही , ते त्या पलंगासोबत चुपचाप वाटून घ्यायची.
सुट्ट्यांमधल्या दिवसात किंवा सकाळच्या फावल्या वेळात मी आईला नेहमी गुपचूपपणे पाहत रहायचो. ती सकाळी फार लवकर उठायची आणि तिची सगळी कामं उरकून घ्यायची , तिच्या वावरण्यानं माझी झोपमोड होऊ नये म्हणून फार प्रयत्न करायची. तिच्या हालचाली इतक्या नियंत्रित आणि निश्चिंत असायच्या की डोळे मिटलेले असले तरी मला कळायचं की आता ती काय करत असेल. आता स्वच्छता... आता कपडे धुणं.... जप करणं.... किंवा असंच काहीतरी. सकाळी उठून ती सगळ्यात आधी तिचा कोपरा स्वच्छ करायची... मग माझा.... मग आंघोळ करायची. आंघोळीसाठी तिला बराच वेळ लागायचा. स्वच्छतेच्या बाबतीत ती जवळजवळ विक्षिप्त आग्रही असायची.
प्रत्येक गोष्ट ती दोन-तीनदा स्वच्छ करायची. खोलीतली फरशी... भिंती... बादली... कपडे आणि स्वत:चं शरीरसुद्धा. स्वच्छता करता करता बऱ्याचदा ती बाहेर खोलीत यायची... काही विसरलेलं घेण्यासाठी नाही तर आतली स्वच्छता करता करता बाहेरचं काहीतरी स्वच्छ करायचं राहून गेलेलं आठवल्यामुळं. मी गप्प पडून तिला पाहायचो. तिची वाकलेली कंबर.... लोंबणाऱ्या सुरकुत्या.. आक्रसलेला चेहरा... आणि त्यावर सतत चिकटलेला एक शाश्वत संशय. बऱ्याचदा ती फक्त एका वस्त्रावर बाहेर येऊन हे सर्व करायची. स्वत:च्या विवस्त्र अवस्थेची तिला जवळजवळ खबरसुद्धा नसायची. त्यावेळी मी डोळे मिटून , तोंड फिरवून घ्यायचो.
आईची ही अवस्था माझ्या आत नेहमी एक विचित्र अशी किळस निर्माण करायची. मला वाटायचं की मी तिच्या अशा अव्यवस्थितपणाला आळा घालावा... आपला तिरस्कार व्यक्त करावा. पण मी तिला काही स्पष्ट सांगू शकत नव्हतो. कित्येक वर्षांपासून हा आईचा दिनक्रम होता. मला वाटायचं की मी काही सांगितलं तर ती अचानक इतकी ओशाळेल आणि अस्वस्थ होईल की तिच्या आयुष्याचा सगळा तोल नष्ट होऊन जाईल. जितक्या निवांत आणि निश्चिंतपणे ती जे करतेय ते सगळं विस्कटून जाईल. मी काही बोलायचो नाही तरीही माझी घृणा मी लपवू शकत नव्हतो. पलंगावरून उठल्यावर मी तिच्याशी काही बोलायचो नाही आणि तोंड वाईट करून बसायचो. ती भीतीनं आणि दु:खानं माझ्याकडं उशीरापर्यंत बघत बसायची. कधी धाडस करून विचारायची , ' काय झालं ?'
मी काही बोलायचो नाही. खाली मान घालून सिगरेट ओढत बसायचो. मला काही बोलावंसं वाटायचं नाही. एखादेवेळी मी काहीही बोललो तर ती उत्साहित व्हायची आणि मग भरपूर बोलत राहायची. हे बोलणं तिच्या आणि माझ्यातल्या मौन परंतु स्वीकृत परिस्थितीला अस्ताव्यस्त करून टाकायचं. माझ्या तणावानं भरलेल्या मौनामुळं तिच्या चेहऱ्यावरची वेदना आणि तिच्या आतली अस्वस्थता वाढायची.
' बरं वाटत नाही का ?' ती पुन्हा एकदा साहस करायची. मी कडवट बोलण्यासाठी मान वर करायचो पण तिच्या चेहऱ्यावरची कातरता आणि वयाची शिथिलता पाहून गप्प बसायचो. मी ' हो ' म्हणेन की काय या धागधुगीनं ती त्यावेळी खरंच थरथरत असायची... माझ्या कुठल्याही वेदनेच्या कल्पनेनं ती अशीच थरथर कापायची.
माझ्या अशा गप्प बसण्याचा ती काही तरी अंदाज काढायची. आई माझ्या आतलं सगळं कसं काय ओळखते हे मला कधीच कळलं नाही. मग ती सावध राहायची. त्या अवस्थेतून ती बऱ्याचदा बाहेर यायची नाही आणि आलीच तर असं समजून की मी अजून झोपेत आहे. पण हे निश्चित करण्यासाठी ती बहुधा उशीरापर्यंत दाराच्या आड उभं राहून मला गुपचूप पाहत राहायची.
एके दिवशी मी जरा जास्तच दारू प्यालो होती. कारण मला ज्या बाईबरोबर लग्न करावं वाटत होतं आणि जिला माझ्याबरोबर लग्न करावं वाटतं होतं , तिच्याशी माझं भांडण झालं होतं. तसं आम्ही फार दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होतो... इतक्या दिवसांपासून की माझ्यासारखीच ती सुद्धा हळूहळू थोराड होऊ लागली होती. एखादा केस पांढरा झाला होता आणि तिची छाती अगदीच सैल पडली होती. आता ती थकल्यामुळं प्रेमामध्ये संवेदनाशून्यतेच्या टोकापर्यंत निष्क्रिय राहू लागली होती. खोलीला चौथा कोपरा असता तर मी तिच्याशी लग्न केलं असतं. याच गोष्टीवरून ती माझ्याशी नेहमी भांडायची. तिचं म्हणणं होतं की , पलंग बाजूला काढून आपण त्या कोपऱ्यात राहू शकतो. पण मला हे माहिती होतं की आईसाठी हे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा मी पलंगाशिवाय आईचा विचार करायचो तेव्हा डोक्यात ढासळणाऱ्या घराचा विचार यायचा. आई जेव्हा माझ्यासोबत रात्री त्या पलंगावर झोपायची तेव्हाच ती तिच्या दिवसभराच्या स्तब्धतेतून... माझ्या एकांतातून... तिच्या डोळ्याच्या पांढऱ्या डोहातून... सुरकुत्यांमधून बाहेर येऊ शकायची. माझ्या तळहाताला स्पर्श करायची किंवा डोक्यावरून हात फिरवायची. मी अनभिज्ञ किंवा विमनस्क दिसण्याचा बहाणा करायचो. ती हळूहळू काहीतरी बोलत रहायची. त्या बोलण्यामध्येसुद्धा माझ्या काळज्या जास्त असायच्या. माझं वाढतं वय... माझा उतरायला लागलेला चेहरा... माझं एकटेपण. कधी कधी मी हसायचो , मग ती मला माझ्या ऐश्वर्यसंपन्न भूतकाळाबद्दल सांगू लागायची की , कशी ती याच पलंगावर झोपत असायची आणि जन्मल्यानंतरच मीसुद्धा याच पलंगावर याच ठिकाणी कसा झोपायचो. एका प्रकारे पलंग तिच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती होता.... असण्याची सार्थकता... अर्थवत्ता होता. पलंगावरच तिला माझी जवळीक मिळायची जी तिच्या उर्वरीत आयुष्यातलं उरलेलं , एकुलतं एक सुख होतं.
तसं आई त्या बाईला ओळखत होती. मी तिला बऱ्याचदा माझ्यासोबत खोलीवर घेऊन यायचो. ती आईला भेटायची. तिला बघून आईला खरोखरच आनंद व्हायचा. ' आई तिला तिच्या कोपऱ्यात बसवायची आणि मनसोक्त गप्पा मारायची... त्या सगळ्या गोष्टी तिला सांगायची ज्या तिनं एक तर रात्री पलंगाला सांगितलेल्या असायच्या नाहीतर मला न सांगितल्यामुळं स्वत:च्या आत साठवलेल्या असायच्या. आम्हा दोघांच्या संबंधांमुळं बहुतेक आईला स्वत:ला अपराध्यासारखं वाटत असायचं , त्या बाईशी जास्त गप्पा मारून , तिचं अधिक स्वागत करून ती हा अपराधीपणा दाबून टाकायची. मी माझ्या कोपऱ्यात बसून दोघींच्या गप्पा ऐकायचो आणि गुपचूप सिगरेट पीत मध्ये मध्ये हसायचो. माझ्या हसण्यानं आई खुलून जायची आणि माझ्याशी अधिकच बोलायची. मी उत्तर दिलं की , तिला फारच समाधान वाटायचं कारण ती गृहीत धरायची की मला काही झालेलं नाही , मी सुखी-समाधानी आहे आणि मी तिच्या अस्तित्वाला माझ्या आयुष्यात महत्त्वाचं मानतो. अचानकच तिला स्वत:ला आपण महत्त्वपूर्ण आहोत असं वाटू लागायचं आणि या भावनेनं ती माझ्यावर थोडा अधिकारसुद्धा गाजवू लागायची , जो मी अनिच्छेनंच गुपचूप सहन करत रहायचो. हळूहळू ही अवस्था मला असह्य होऊ लागायची. आई हे ओळखायची आणि शेजारच्या घरी निघून जायची. मी त्या बाईला घरी का आणतो ते तिला माहिती असायचं. तिला या गोष्टीची जाणीव होती की , आम्हाला एक दीर्घ एकांत पाहिजे असायचा. बऱ्या उशीरानं त्या बाईला घेऊन मी घराबाहेर पडायचो आणि आई तेव्हाच परत यायची.
तर त्या रात्री माझं त्या बाईशी भांडण झालं होतं. त्या रात्री थंडी थोडी जास्तच होती , इतकी की मी दारूच्या दुकानातच काही घोट आत ढकलले होते. उरलेली दारू घेऊन मी तिच्या घरी गेलो. माझ्या आत तिच्या शरीराची तीव्र इच्छा होत होती. ती तिच्या खोलीत झोपली होती. बहुतेक नुकतीच रडून झोपली असावी. तिच्या डोळ्यात चिपाड आलं होतं आणि तिच्या गालावर एक अश्ाू चिकटलेला होता. मी तिला माझ्यासोबत घरी चल म्हणालो. पण तिनं मला असं म्हणत धुडकावून लावलं की जोपर्यंत मी पलंग बाजूला हटवून तिला तिथं ठेवत नाही तोपर्यंत कधीच घरी येणार नाही. दारूची गमीर् आणि तिच्या शरीराच्या इच्छेनं पेटल्यानं मी हे सहन करू शकलो नाही. मी तिच्या ओठाला करकचून चावलो , तिचं अंग ओरबडलं आणि तिला तिरस्कारानं ढकलून परत आलो.
घरी येऊन पलंगावर पडलो , आई जागीच होती , ती हळूच जवळ आली. दारूच्या वासानं तिचं तोंड वाईट झालं. ' तू जास्त प्यायला लागलायस ', ती हळूच पुटपुटली , ' सकाळपर्यंत वास येत असतो. ' मी डोळे उघडून तिच्याकडं पहिलं. तिच्या सुरकुत्या आणि पांढरे डोळे माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होते. मला ती आवडली. तिचा चेहरा ममत्वानं आणि दयेनं चमकत होता. तिच्या आतली वेदना तिच्या चेहऱ्यावर उतरली होती. तिनं हळूच माझ्या डोक्यावरून हात फिरवला. माझ्या पिकलेल्या शरीराला नीट पाहिलं.
' ती नीच आहे ', मी बडबडलो , ' तू झोप. '
आई कण्हत उठली आणि पलंगाच्या दुसऱ्या भागावर जाऊन झोपली.
जास्त प्याल्यामुळं मी त्या रात्री झोपलो नाही. दोनदा उलटी झाली. छाती चोळत बसलो. त्या रात्री मी आईला लक्षपूर्वक पाहिलं. फार म्हातारी झाली होती ती. केस एकदम पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जंगल होतं. गाल आत बसले होते. झोपताना तिचं बोळकं झालेलं तोंड थोडं उघडं होतं , तोंडातून फार बारीक , विचित्र असा आवाज येत होता. मी उशीरापर्यंत तिला पाहत राहिलो. खरोखर ती जगातली एकमेव बाई होती जी माझ्यावर प्रेम करत होती. ती मला फार पवित्र वाटली.
त्या रात्री झोपलोच नाही. आई रोजच्याप्रमाणं अंधार असतानाच लवकर उठली होती. आईनं रोजच्यासारखी स्वच्छता केली , आत गेली आणि आंघोळ करू लागली. मग अचानक काही तरी घेण्यासाठी ती बाहेर आली. मी त्याच क्षणी आईला पाहिलं. मी आश्चर्यचकित झालो , मग एकदम ओरडलो , ती संपूर्ण विवस्त्र होती. तिला अजिबात जाणीव नव्हती की मी जागा आहे. मी सगळ्या ताकदीनिशी पलंगावरून उतरलो आणि तिला बाहेर ढकलू लागलो. ' चालती हो बाहेर.... चल अशीच जा ', मी वेड्यासारखे मानेला झटके देत होतो. आईनं मला एकवार पाहिलं आणि माझ्या चेहऱ्यावरची घृणा पाहून त्याच क्षणी मेल्याहून मेल्यासारखी झाली. ती माझ्यासमोर अगदी नग्न उभी होती , सुकलेल्या त्वचेमधल्या हाडाच्या सापळ्यासारखी , रिकाम्या पांढऱ्याफटक डोळ्यांनी काही वेळ बघत राहिली , मग एकदम माझ्या पायावर कोसळली. तिनं माझे दोन्ही पाय गच्च धरले. ती गयावया करत होती , ' एकदा... फक्त एकदा माफ कर. '
तिनं मान वर केली. तरी रडत होती. तिचा चेहरा केविलवाणा झाला होता... संपूर्णपणे पराभूत अगतिकता तिच्या चेहऱ्यावर पसरलेली होती. मनुष्याच्या आत्म्यातलं सगळं सत्व वाळून खट्ट झाल्यानंतर उत्पन्न व्हावी तशी क्षमायाचना. सगळं नितांत पारदर्शक होतं. तिची ग्लानी... भीती... ओशाळलेपण आणि दयनीयता. मी तिला तिरस्कारानं ढकललं आणि बाहेर चालता झालो. थेट त्या बाईच्या घरी गेलो आणि तिला सांगितलं की आपण लवकरच लग्नं करणार आहोत.
त्या दिवशी पळसाच्या नग्न , विखुरलेल्या फांद्यांवर पहिलं फूल उमललं होतं.
त्या दिवसानंतर आई राख झाल्यासारखी झाली. एकदम गप्प. तिच्या कोपऱ्यात ती अधिकच आक्रसून गेली होती. आता पहिल्यासारखं व्याकूळ नजरेनं पाहणं नाही. नजर भिडवणं नाही. तिचा चेहरा काळवंडला होता. मी खोलीत असलो तर ती अधिकच घाबरलेली असायची. मान खाली घालून , काही न बोलता , हळूहळू काहीतरी करत बसायची. दहशत बसल्यासारखी... एखाद्या अनिष्ट शंकेनं भयभीत होऊन... आपल्या अस्तित्वाला कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न करत. तिचा स्वत:वरचा विश्वास पूर्णत: उडून गेला होता. माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवायची आणि काहीही विचारायची नाही. भूतकाळातल्या कशाचीही आठवण करून द्यायची नाही. पलंगाच्या एका भागात अंग चोरून पडलेली असायची. तिनं आता बहुतेक पलंगाशी गप्पा मारणंसुद्धा सोडून दिलं होतं. आता मला तिचं रात्री पुटपुटणं किंवा हसणंसुद्धा ऐकू यायचं नाही. तिच्या आत सगळं मेल्यासारखं झालं होतं. बहुधा पलंगसुद्धा.
त्याच दिवसांमध्ये पळसावर लाल जंगल खदखदायला सुरुवात झाली होती आणि आईसुद्धा आजारी पडली होती.
त्या रात्री फार मुसळधार पाऊस पडू लागला होता. मी संध्याकाळपासूनच प्यायला सुरुवात केली होती. आई पलंगावर चादर पांघरून घेऊन गप्प पडली होती. आपल्या जागेवर अंग अगदी मुडपून घेऊन. मी तिच्याजवळ जाऊन अंग टाकलं. काहीतरी फार त्रास होत असल्यासारखा ती दीर्घ श्वास घेत होती. मी उठून बसलो. तिला पाहिलं. फार दिवसांनंतर मी तिला लक्षपूर्वक बघत होतो. तिच्या सुरकुत्या फारच दाट झाल्या होत्या. मी तिला हळूच हात लावला. त्या दिवसानंतर पहिल्यांदाच. तिचं अंग थोडंसं थरथरलं. मग माझ्याकडं तोंड वळवलं. थोडा वेळ मला पहात राहिली मग पुटपुटली , ' तू फारच अशक्त झाला आहेस. म्हातारा झाल्यासारखा दिसतोयस. '
मी तिला पाहत राहिलो मग हळूच म्हणालो , ' मी लग्न करतोय. ' ती काही म्हणाली नाही. ' तिच्याबरोबरच... ती सुद्धा म्हातारी होऊ लागलीय. '
ती मला तशीच पाहात राहिली. तिनं काही विचारलं नाही पण तिच्या डोळ्यात प्रश्न होता , संशयसुद्धा. ' ती इथंच राहिल... आम्ही पलंग इथून बाजूला हटवू. ' मी थरथरत म्हणालो.
आई काही म्हणाली नाही. तिनं हळूच डोळे मिटले. त्याच रात्री आई मरून गेली.
आईच्या माघारी तो कोपरा रिकामा झाला. आम्ही तिचं सगळं सामान तिथून काढून टाकलं. तिचे पत्र्याचे डबे... गाठोडी , हातपंखा , बॅटरी , देव , जपाच्या माळा... सगळं बांधून वर ठेवून टाकलं. आईच्या कोपऱ्यात तिनं स्वत:चं सामान ठेवलं. आईची कुठलीच निशाणी आता उरली नव्हती. आई आता कुठंच नव्हती.
रात्री ती माझ्यासोबत पलंगावर झोपली. आई झोपायची त्याच जागी. ती प्रचंड खुष होती. खळखळून हसत तिनं माझं नाक चावलं आणि कपडे उतरवून विवस्त्र झाली. मी मान वळवून पलंगावर पसरलेल्या तिच्या नग्न शरीराकडे पाहिलं आणि एकदम किंचाळलो. आई तिथंच होती.
प्रियंवद
अनुवाद : बलवंत जेऊरकर
मटा सांस्कृतिक
Maharashtra Times
4 comments:
mi aajparynt ashi katha kadhich vachali nahi!!!!!!! kharach hi katha khupach chan aahe
Sahichna yaar............
I read the whole story but still the suspence is remaining in my mind that "whats the next?".
aai mhanje ek gav aasat, tyat barach kahi samawlel asat.
hi story wachtana mala mazi aai sarkhi dolyasmor disat hoti.
aai sarkh prem kunich karu shakat nahi, na tuzi ti na mazhi ti ayushyasuta
aai mhanje ek gav aasat, tyat barach kahi samawlel asat.
hi story wachtana mala mazi aai sarkhi dolyasmor disat hoti.
aai sarkh prem kunich karu shakat nahi, na tuzi ti na mazhi ti ayushyasuta
Post a Comment