बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र ! अमृताहुनी गोड असलेल्या माझ्या मराठी भाषेची सेवा करण्यासाठी ब्लॉगचे माध्यम लाभले आहे. मराठी भाषेला समृध्द करण्यासाठी आमचाही खारीचा वाटा......
Wednesday, August 1, 2007
चेहऱ्यामागचे सौंदर्य...........
वाचायला येउ लागले तेव्हापासून मी सतत वाचतेच आहे. लहानपणी बालगोष्टी, किशोर, चांदोबा......जे हाती लागेल ते संपवूनच खाली ठेवायचे. वाचनाचे वेड खूप लोकांना असतेच.अगदी पुडीच्या कागदावर लिहिलेलेही वाचले जाते. कधीकधी त्यावर कुणाचे मन थांबलेले सापडते. वाचनवेडे मान्य करतील की हे वाढत जाणारे वेड आहे. वेगवेगळ्या वयात वाचनाचे प्रकार बदलतात, अर्थही बदलतात. माझाही वाचनप्रवास वेग घेत होता. बालगोष्टी मागे पडल्या होत्या. किशोरवयात पदार्पण केले होते. अनेक नवीन भाव आकार घेत होते. योगिनी जोगळेकर, भालचंद्र नेमाडे, सुहास शिरवळकर, वपु.....हे आवडू लागले. काहिसे हुरहूर लावणारे, स्वप्नात नेणारे लिखाण भावत होते. अशातच उदयचे ( लेखकाचे लोकांना माहित असलेले नांव लिहिलेले नाही, उदय हे त्याचे काही खास लोकांनाच माहित असलेले नाव आहे. ) लिखाण वाचायला मिळाले. बारा-तेरा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. ओघवत्या, भारावून टाकणाऱ्या कादंबऱ्या. मी एकामागोमाग एक वाचितच सुटले होते. पाहता पाहता उदयच्या लिखाणाने माझ्या मनाचा कब्जा घेतला. त्याच्या धुमसत्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या, प्रेमासाठी आसुसलेल्या पात्रांच्या व्यक्तित्वाने, भन्नाट लेखनशैलीमुळे माझ्या मनाने त्याचे रुप रेखाटले होते. अमिताभचा जंजिर येउन गेलेला होता. दिवार,जमीर सारखे सिनेमे गाजत होते. त्याच्या सगळ्या लिखाणातून तोही असाच डॅशिंग, रफटफ पण मनात मात्र हळवा असणार ह्यात काही शंकाच नव्हती. तशातच त्याच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत मला त्याचा पत्ता मिळाला. त्यात त्याच्या जन्मतारखेचा उल्लेख होता. त्यावेळी त्याची तिशी उलटून गेली होती. घर,संसार व लेखनप्रपंच ह्यात दंग असलेला एक प्रभावी लेखक. लेखक कसा दिसतो हे पाहण्याचा मला मोह झाला... वाढदिवस नजरेच्या टप्प्यात आला होता. जराही वेळ न दवडता मी त्याला पत्र लिहिले. वाचून झालेल्या कादंबऱ्या आवडल्या आणि तुम्हाला भेटायची इच्छा आहे असेही लिहिले. त्याआधी घरातील आपली माणसे वगळता मी कोणालाही पत्र लिहिले नव्हते. त्यामुळे असे अनोळखी माणसाला पत्र लिहिताना मोठे साहसच केले होते. माझ्या ह्या खुळेपणाला घरातले सगळे हसत होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला उत्तर येईल असे एकदाही वाटले नव्हते. पोस्टमन येइ त्यावेळी मी शाळेत असे. घरी आल्या आल्या मी आईला विचारी, पत्र आलेय का? आई गालातल्या गालात हसून नाही म्हणे. असा महिना उलटला. मुळातच आशा नव्हती त्यात इतके दिवस उलटल्यावर ......एके दिवशी घरी आले तर आई हातात निळ्या रंगाचे आतंर्देशीय पत्र घेऊन उभी. माझा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. पत्रात त्याने सामान्यपणे सगळे लेखक जे लिहितील तेच लिहिले होते. प्रकाशकाना भेटण्यासाठी मुंबईत येणे होतेच तेव्हा नक्की भेटू. आमचा पत्रव्यवहार वाढू लागला. दहावीचा अभ्यास जोर धरु लागला होता. अवांतर वाचनासाठी वेळ कमी पडत होता. दरम्यान त्याची आणिक एक कादंबरी प्रकाशित झाली. पत्रात त्याने मुंबईस येत असल्याचे कळविले. मी वेळ झाल्यास आमच्या घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले.त्याने ते स्विकारले.
अखेरीस तो दिवस उजाडला. त्याची सगळी कामे आटोपून रात्री आठ वाजता तो आमच्या घरी आला. दार मीच उघडले. आणि ई.....ऽऽऽ अशी अस्फुट किंकाळी उमटली. ति कशीबशी दाबून मी त्याचे स्वागत केले. थोडावेळ तो बसला, नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी त्याने मला भेट दिली. चहा घेऊन तो गेला. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. माझ्या मनात रेखाटलेल्या त्याच्या मूर्तीचा चक्काचूर झाला होता. एक अतिशय सर्वसामान्य व्यक्तित्व.काहीसे कुरुपातच जमा होणारे. पाच फूट जेमतेम उंची, फाटकी शरीरयष्टी, निस्तेज उदास चेहरा, अर्धवट वाढलेली खुरटी दाढी आणि ह्या सगळ्याला न शोभणारा मोठ्ठा गॉगल. धक्का ओसरल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या तोंडून अगदी लहान आवाजात उमटलेली किंकाळी त्याच्या कानाना अचुक एकू गेली होती. दूर्दैव माझे.
ह्या घटनेवर त्याने चुकूनही भाष्य केले नाही. आमचा पत्रव्यवहार अखंड चालू होता. त्यातून हळुहळु मला तो अगदी एकटा असल्याचे जाणवले होते. जीवनाकडून फारश्या अपेक्शा नसणारा साधासुधा पण खूप हळवा, टोकाचा मनस्वी होता. त्याच्या घरच्या लोकांनि त्याच्याशी संबध ठेवला नव्हता. आताशा तो पेणला राहात होता.माझे कॉलेज-कॅरमच्या मॅचेस, इतर छोटेमोठे कोर्सेस ह्यात मी गुंतून गेले असले तरी त्याच्या जीवनातला एकमेव कोवळा तंतू मी असल्याची जाणीव मला झालेली होती. त्याने कधीही हे मला दर्शविले नाही आणि मीही नाही. मी त्याला उदयदा म्हणत असे. ते नाते त्याने मान्य केले होतेच. काळ पुढे सरकत होता. माझे लग्न झाले. त्याला येणे जमले नाही. पण त्याचे पत्र आले. माझ्या नवऱ्याची त्याची भेट आधीच झालेली होती. पत्रात खूप शुभेच्छा देऊन आग्रहाचे निमंत्रण दिले होते. मला जाणे जमले नाही. ह्या दरम्यान पत्रे चालूच होती. त्यावरून तो ठीक असल्याचे मला कळत होते, म्हणजे तशी माझी समजूत होती. माझ्या बाळाला पहायला तो आला. अतिशय खंगला होता. त्याला पाहून मला भडभडून आले. माझे अश्रू पाहून तो कासावीस झाला. सारे काही छान चालले आहे ह्याची ग्वाही देत राहिला.
लेखनातला पूर्वीचा जोम कमी झाला होता. स्वत:चे माणूस नाही,असह्य एकटेपणा, पैशाची चणचण हे सारे त्याचा जीवनरस शोषित होते. एके दिवशी न राहवून मी आणि नवरा अचानक त्याचेघरी गेलो. तो घरात नव्हता. कोणितरी ओळखीच्या मुलाने त्याला आम्ही आल्याचे कळविले. तसा पळतच तो आला. आज इतक्या वर्षांनी माझे घर उजळून निघाले असे पुन्हा पुन्हा म्हणत राहिला. आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेले. भरभरुन गप्पा मारल्या. त्याच्या सिगरेटस फार वाढल्याचे मला चांगलेच जाणवले, तसे मी बोलूनही दाखवले. त्यावर हसत हसत म्हणाला, "आजकल ये बेजुबानही जान है हमारी, बस इसे हमसे मत छिनों यारों/ कुछही सासें है बाकी,बस उन्हें जी भरके जीने दो प्यारों/" आम्ही त्याचा निरोप घेतला. बस सुटताना त्याचे भरुन आलेले डोळे, त्याची व्याकुळता मला काहितरी सांगू पहात होती. नेमके काय ते मला समजत नव्हते.मी त्याला विचारलेही. त्यावर अग् तुझे सुख पाहून मीही सुखावलोय. तेच डोळ्यांतून झरतेय.असे म्हणाला. त्यातील फसवेपणा मला विषण्ण करुन गेला.
काळ जातच होता. पत्रे चालूच होती. मी माझ्या परीने त्याला उत्साह देत होते, लिहिण्यासाठी प्रवृत्त करीत होते. दोन वर्षानंतर त्याची नविन कादंबरी आली. मनापासून लिहिली होती, प्रतिसादही चांगला होता. वाटले आता हा उभारी धरेल. पण तोवर उशीर झाला होता. माझ्या पत्रांना लागलीच उत्तर देणाऱ्या उदयचे महिनाभरात पत्र आले नाही. अचानक त्याचे प्रकाशक माझ्याघरी आले आणि उदयदा गेल्याचे सांगितले. केवळ मला त्रास होऊ नये म्हणून त्याने माझ्यापासून अनेक गोष्टी लपविल्या होत्या. त्याच्या शरीराने दगा द्यायला कधीचीच सुरवात केली होती. पैशाच्या अडचणिनेही कोंडित पकडले होते. खूप उधारी साचली. खानावळ वाल्याने त्यासाठी चारचोघात वाभाडे काढलेन्. ते न सोसून त्याच रात्री हृदयविकाराच्या पहिल्याच झटक्याने उदयला ह्या सगळ्यातून कायमचे सोडवले. माझ्यावर मनापासून निरपेक्ष प्रेम करणारा माझा उदयदा एका क्षणात मला पोरके करुन निघून गेला होता. त्याच्या काळजीच्या काट्याने माझ्यावर चरा उमटू नये हा त्याचा प्रयत्न मला आयुष्याचे वैफल्य देउन गेला. त्याच्या कुरूप चेहऱ्यामागचे नि:खळ सौंदर्य माझ्यात सामावून गेलेय. कुठल्याही नात्याचे आखीवरेखीव बंध नसलेला उदयदा माझ्या अंतरात अव्याहत आपुलकीचा आनंद गंध उधळतो आहे।
हा लेख इथून घेतला आहे : http://manogat.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
http://www.manogat.com/node/9509
Post a Comment