Tuesday, July 31, 2007

तो............


जून-जुलै कोरडा ठणठणीत गेल्यावर खरं तर पाऊस येतोय की नाही, याची सार्‍यांना काळजीच लागून होती. जो तो पावसाळ्याबद्दल बोलू लागला. पण पाऊस मात्र कानावर हात ठेवून दडी मारून बसला होता. तो कुणाचंच ऐकेना. वसुंधरा आपला घाम पुसून पुसून वैतागली. डौलदार वृक्षही कडक उन्हाचा मारा सहन करून संतापलेत. त्या संतापाच्या भरात ते तर हलेना डुलेना. मग गरीब बिचार्‍या माणसाची काय बात?

सगळ्यांनी आशा सोडली आणि एक दिवस मात्र अचानक पावसाला भलताच हुरूप आला. त्यानं जे कोसळणं सुरू केलं की आता थांबायचं नावच नाही. वसुंधरेचे गात्र नि गात्र ओले चिंब झाले. मोठमोठ्या वृक्षांची पावसाचा मारा सहन करता करता भंबेरी उडाली आणि छोट्या छोट्या वेली तर जमीनदोस्तच झाल्या. माणसं म्हणायला लागली, 'बस झालं गड्या आता. थांब न. जरा तर काम करू देत.'

पण मला मात्र अजून खूप पाऊस हवा होता. प्रचंड कोसळणारा पाऊस, कडाडणार्‍या विजा, गडगडणारे ढग, गेलेली वीज, अंधार गुडुप्प. पुढ्यात पडणारा पाऊस सुद्धा डोळ्यांनी दिसणारा नाही: पण जाणवत राहील. रंध्रांरध्राला तो जाणवतो. माझ्या साडीतून पूर्ण शरीराला स्पर्श करून, माझ्या भावनांना ओल देऊनच तो केसांपासून पायापर्यंत हळूहळू ओघळतो आणि तेव्हाच 'तो' येतो. गेल्या कित्येक वर्षाचा हा नियम! पावसांच भयानक रौद्र रूप दिसायला लागलं की अख्खं शहर स्वत:च्या घरात चिडीचूप होऊन जातं.

दारे खिडक्या बंद करून आपआपल्या संरक्षित घरात बसतं. रस्ता निर्मनुष्य होऊन जातो आणि मग तो अवतरतो. किती वर्षाचा हा परिपाठ. मला आठवतं, अकरावीत असताना भर पावसातून शाळेतून मी येत होते. सायकल दामटवत. टपोर्‍या थेंबाचा आक्राळ-विक्राळ कोसळणारा पाऊस, तोही वार्‍यासकट समोरून येणारा वार्‍याला आणि पावसाला चुकवत (जे शक्यच नव्हतं) दप्तर ओलं होणार नाही याची काळची घेत मी सायकलला पायडल मारत होते जाम वैतागून, नशिबाला शिव्या देत, आईची, भावाची, (अरे कुणीतरी माझ्या मदतीला या रे, म्हणून) आठवण करत सायकल ओढत जात होते. आपलं घर आता इथेच असतं तर! असाही विचार दर पावलागणिक येत होता. आणि... आणि... तो आला.

चक्क तो आला. मी डोळे विस्फारून त्याच्याकडे बघतच राहिले. माझ्या हातातली सायकल त्यानं चक्क स्वत:च्या हातात घेतली. माझं दप्तर माझ्या खांद्यावरून घेऊन सायकलला लटकवलं आणि म्हणाला, 'चल आता बिनधास्त.' सायकल ओढणं तुला जरा जास्तच जड झालं होतं. चल मी तुला घरापर्यंत पोहोचवतो. त्याच्या खांद्यावर माझ्या दप्तराचा आणि त्याच्या हातात माझ्या सायकलचा भार देऊन मी खरंच बिनधास्त चालायला लागले. त्याच्या पावलांशी पावळं जुळवत. चालताना त्याला शाळेतल्या खूप गप्पा सांगितल्या. सायलीची गंमत. शशांकचा अगोचरपणा. सारं सारं, पावसात भिजायला मला कसं आवडतं हे ही सांगितलं. तो म्हणाला, ' दर पावसात असं माझ्या सोबत भिजायला आवडेल?'

''नक्कीच आवडेल. पण, तू असतोस कुठे?''
''इथेच तुझ्या जवळपास''
''मला कसा कधीच दिसला नाहीस''
''कसा दिसेन? आजपर्यंत तू कधी माझी आठवणच केली नाहीस?''
''मग आज तरी कुठे केली होती? मला तर दादाची, आईची आठवण येत होती''
''वेडाबाई, पाऊस पडला की शाळेतून घ्यायला आई किंवा दादा यायचं वय राहिलं का आता तुझं? चांगली अकरावीत आहेस. आता मीच येणार तुला पावसात सोबतीला.''
''खरं?''
''खरं.''
तिथुन सोबत करतोतय. केव्हाही प्रचंड पावसात माझ्यासोबत चालायला लागतो. गाडीत असले तरी शेजारच्या सीटवर कधी येऊन बसतो कळतच नाही. खूप गप्पा मारतो. गाणी ऐकवतो. 'सारंग तेरे प्यार में...' हे गाणं ऐकल्याशिवाय तर मी त्याला कधी जाऊच देत नाही. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावरच्या पावसात त्यानं मला अबोल साथ दिली. बिनधोक सहवास दिला. कुठलीही अपेक्षा न ठेवता.

मग याचवर्षी कुठे दडला? आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळतोय. सार्‍यांची सगळीच कामं ठप्प झाली. परवा-परवा बँकेत महत्त्वाचं काम असल्यामुळे जावचं लागलं. येताना गाडी पंक्चर, म्हटलं, आज तरी हा नक्कीच येईल, 'गाडीची स्टेपनी बदलवून द्यायला' पाच मिनीट कोसळणार्‍या पावसात वाट पाहिली. नाहीच आला. त्यातच वायपर गेला. म्हटलं, आता तरी येईल आणि म्हणेल, 'वेडी का काय, एवढ्या धुप्प पावसात वायपर शिवाय गाडी चालवतेस? थांब. एक मिनिटात स्क्रू फिट करून देतो'. पण नाहीच आला. मीही जिद्दीनं तशीच गाडक्ष चालवली.

आज आता चक्क पेट्रोल संपलय. गाडी रहाटे चौकात ड्राय होऊन उभी आहे. गाडीत बसून तू येण्याची वाट पाहते आहे. अर्धातास झाला. आता तू येणारच नाहीस, असं वाटतय. पण का रे? असा अचानक याच वर्षीच्या पावसात कुठ गडप झाला? काविसरलास? पण कसं शक्य आहे? सोळाव्या वर्षीच्या पावसात भेटल्यापासून थेट पन्नाशीपर्यंत सोबत केलीस. मग अचानक कसा विसरशील?

वाट बघून बघून थकले आणि गाडी तिथेच सोडून अॅटो केला. सिग्नलजवळ अॅटो थांबला. उगीचच इकडे तिकडे नजर फिरविली. पंक्चरच्या दुकानाजवळ आमची छकुली उभी आणि तिच्या शेजारीच तिची कायनेटिक हातात घेऊन 'हा' उभा. छकुली मात्र आपल्या पंक्चर गाडीचा भार त्याच्या हातात देऊन मस्त डाळिंबी दात दाखवत, भुरभुरणारे केस सावरत, त्याच्या डोक्यावर टली मारत त्याला गप्पा सांगण्यात दंग. म्हणजे... छकुलीलाही आज दादाची किंवा ममाची आठवण नाही?...

एवढी वर्ष जोडीने भोगला पाऊस
जोडीनं उतरलो भरतीत...
इथून पुढे पाऊस आणि तो छकुलीसाठीच...
पण..
एवढे वर्षे तू मला अबोल सोबत केलीस
अस्तित्वासह माझ्यात राहिलास...
कोण होतास तू?
माझा सखा?
माझी सावली
माझ्या पावसाळी आयुष्याचं निमित्तकारण
माझ्या तारुण्याला जाग आणणारी सोबत
माझ्या ओल्या श्वासांची लय
माज्या यातनांच्या वणव्यावर फुंकर घालणारी झुळूक?
कोण ...कोण होतास तू?

No comments: