Tuesday, July 31, 2007

हिंदोळा.........

घड्याळात रात्रीच्या बाराचे ठोके घण घण पडत होते. नि:शब्द शांततेत घणघण आणखीच तीव्रतेने जाणवत होती. संध्याकाळच्या सात वाजल्यापासून ती त्याची वाट बघत होती. शहरापासून दूर एकटे-दुकटे घर असलेल्या वस्तीत नुकतंच त्यांनी भाड्यांच घर घेतलं होतं. या चार खोल्यांच्या घरात ते तिघंच. दोघं पती-पत्नी आणि छोटसं सहा महिन्याचं बाळ. तिला दिवसभर सोबत बाळाचीच. त्याचं दिवसभर ऑफिस आणि सामाजिक चळवळीशी थोडाफार संबंध असल्याने सायंकाळ कुठेतरी सभेला, मिटींगला भाषणाला जायचे. एकूण ती घरात जास्तीत जास्त एकटीच.

या एकटेपणाचाच तिला भयंकर उबग आला होता. 'लग्न' या एका शब्दाने, विधीने, कृतीने आपलं पार आयुष्यच किती बदलून गेलंय याचाच ती अलीकडे सारखा विचार करीत असायची. खरं तर ती स्वत: अत्यंत हुशार, कर्तबगार, एक्टीव्ह विद्यार्थिनी, कॉलेजात कोणताही कार्यक्रम असो, राही व्यासपीठावर नाही आणि व्यासपीठावर येऊन तिला बक्षीस नाही, असं कधी झालचं नाही.

वयाच्या सतराव्या वर्षी विनोबाजींच्या गो-हत्या प्रतिबंधक चळवळीत तिने भाग घेणार्‍या विदर्भातल्या 21 तरुणांमध्ये ती एकुलती एक तरुणी होती. अशा अनेक चळवळीत तिचा सक्रीय सहभाग असायचा. अशा चळवळीतूनच त्या दोघांचा परिचय प्रेम आणि प्रेमाची परिणती, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्नात झाली होती. नेह‍मीच्या ठाम स्वभावानुसार आपल्या घरच्यांचा विरोध लक्षात घेऊन तिने आधीच ठणकावून सांगितले

'तुम्ही माझं लग्न करून दिलं तर उत्तम अन्यथा मी तर याच तरुणाशी लग्न करणार'. आपल्या लेकीचा जिद्दी स्वभाव लक्षात घेता आपल्याच हाताने आपल्या पायावर कशाला धोंडा पाडून घ्यावा, हे जाणून त्यांनी योग्य वेळ बघून तिचे लग्न लावून दिले. ते आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. पण ती स्वत: एका मोठ्या जबाबदारीत गुंतली गेली, हे त्यावेळी तिच्या लक्षातही आले नाही.

लग्न या एका कृतीने तिचे आयुष्यच पार बदलून गेले. सर्वात पहिला आणि मोठा फटका बसला तो तिच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला. ऐन परीक्षेत त्याच्या बहिणीचे लग्न आले. घरचेच लग्न म्हटल्यावर सुनबाई परीक्षा देऊन तिला कलेक्टर थोडीच व्हायचे होते! ना परदेशात जायचे होते!! लग्नामुळे तिची परीक्षा बोंबलली. हिवाळी परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली आणि कडक डोहाळ्यांनी तिचा जीवन मेटाकुटीस आला. इतका त्रास की अंगावरच्या वस्त्रांचंही अनेक वेळा तिला भान राहत नसे.

परीक्षेची तिसरी संधी घ्याची म्हटलं ती सासर्‍यांची बायपास सर्जरी तिच्याच घरातून. ‍अं‍तिम वर्षाच्या परीक्षेचा पार बट्ट्याबोळ आणि आता तर दिवसभर बाळाचंच करण्यात वेळ कसा जातो कळतच नाही. कुठे कार्यक्रमाला जाणे नको की नाटक सिनेमा बघणे नको. तो मात्र मोकळा. सगळीकडेच जायला यायला. जणू लग्न तिला एकटीलाच करायचे होते. तिचीच लग्नाची गरज होती. तिचंच एकटीचं बाळ आहे. त्याला काही कर्तव्यच नाही. ती पोळी लाटत असेल आणि बाळ रडत असले तरी तो तिथून ओरडणार,
''अग घे ना किती वेळचा रडतोय.''
''तुम्ही घ्या मी स्वयंपाकात आहे.''
''मी वाचतो आहे. तू हात धुऊन लवकर घे त्याला.''

तिला ‍चीड येते त्याची. हे काय सुशिक्षित माणसाचं वागणं झालं?
स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणारा हा माणूस साधं बाळाच्या संगोपनात शेअर नाही करू शकत. हा काय आयुष्यात आपलं सुख दु:ख वाटून घेईल? कोणत्या सोबतीची शपथ घेतली यानं आपल्या सोबत? या घरात एकत्र राहण्याची? तेही त्याच्या सवडीने. रात्रीचा एक वाजला. अद्याप यायचाच आहे. प्रतीक्षा करून करून मी थकलेय. पण याचा पत्ताच नाही. मी तरी का म्हणून रोजच सायंकाळपासून याची वाट बघते? आज तो तिला जाताना सांगून केला होता की मी लवकर येतोय. तू तयार रहा. आपण 'ती फुलराणी' बघायला जाऊ या. ती आनंदली. कित्येक दिवसात नाटक बघितंलच नव्हतं. नाटक तिचा वीक पॉईंट. पण बाळ लहान असल्यामुळे की त्याला घेऊन कशी जाणार? तो रडला तर...!

पण तो मात्र एवढ्यात वसंतराव देशपांडे नाट्यगृहात लागलेली सारी नाटंक बघून मोकळा... तर ती तयार होऊन त्याची सहा वाजल्यापासून वाट बघत राहिली. आता रात्रीचा एक वाजून गेला. हे नेहमीचंच. तो सांगूनही येणार नाही, हे अंधुकसं आतून तिला कुठेतरी वाटत होतं. 'विश्वास' ही भावनाच मेली. फालतू आहे, असं तिला अलीकडे वाटायला लागलंय. विश्वास असतों म्हणून अपेक्षा असतात, आणि अपेक्षा आहेत, म्हणून अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या वाट्याला येतं, दु:ख या दु:खाचे क्षण माणसाला किती व्यापून टाकतात. थकवतात आणि मग एखाद्या सुखाच्या क्षणालाही एका दीर्घ वेदनेची कळाच भोगण्याचा शाप आपल्या वाट्याला येतो... ती उसासते. परत घड्याळात बघते. एक वाजून बावीस मिनिटे.

कुठे बसला असेल एवढ्या रात्रीपर्यंत? नाटकाला एकटाच मित्रासोबत निघून गेला असेल तरी एव्हाना यायलाच हवं ना! या पुरुषांना घरच्या लोकांची काही काळजीच नसते काय? आधीच घर हे असं विरळ वस्तीतलं. काही झालं तर कितीही ओरडा कुणाला म्हणून आवाज जायला नको. शिवाय एवढ्या रात्री याचेही असे एकट्याने येणे बरोबर आहे काय? रोज केवढं वाचतोय आपण पेपरमधून, अपघात, लुटमार, मारठोक, स्वभाव बघितला तर असा चिडखोर. एवढ्या रात्री जायचं तरी कुठे... कुणाला विचारायचं... ना आपल्याकडे फोन ना काही. ती वाट बघून आणि या भलत्या सलत्या मनात येणार्‍या विचारांनी शिणून जाते.

वैतागते. उगाचंच घरात इकडल्या तिकडे भटकत राहते. पुस्तकाची रॅक उगाचंच उचकटते. गजानन मुक्तिबोध हातात घेते. त्यांचा सिगारेट ओढणं आपण किती निषिद्ध मानतो. वाईटपणाचं लक्षण. पण माणूस मोठा झाला की, त्यांनी काहीही केलं तरी त्याचं कौतुक. त्याचं ग्लोरिफिकेशन होतं. एक प्रसिद्ध प्राध्यापक. कवी म्हणे, वर्गात मुलांना शिकविताना सिगारेट ओढतात. धुम्रपानाशिवाय ते चांगले शिकवूच शकत नाही. एक बहाद्दर प्राध्यापक दारू प्यायल्याशिवाय शिकवू शकत नाही. दारूशिवाय जर ते बोलायला लागले तर त्यांचं शरीर थरथरत राहतं. मोठेपणाची किमया! बेलचा आवाज. ती चक्क धावतच जाऊन दार उघडते. दार उघडताच दारूचा दर्प त्याच्यासह आत येतो. झालं तिचं टाळकं खराब.

ती त्याच्यावर ओरडतच. 'सायंकाळी येणार होतास, तो आता आलास. शिवाय पिऊन. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत घरात मला एकटीला ठेवून बाहेर दारू ढोसत बसतो. घराची काही काळची?''

''घरात असल्यावर काळजी कशाला? आणि मी दारू प्यायल्याने तुला काय त्रास होतोय?''

''तुझ्या दारू पिण्याचा त्रास मला होणार नाही तर काय लोकांना होणार?''

''तुला कशाचा त्रास? मी तर जेवून पण आलो. आता गुपचूप झोपणार. तुला काही ''बोलल्यानंच त्रास होतो असं काही आहे काय? बोललो.''? रात्रीच्या दोन वाजेपर्यंत तू आला नाहीस, त्याचा मला त्रास होणार नाहीऊ? दारूसारख्या जगातल्या सर्वात वाईट गोष्टींवर तू पैसे खर्च करतो, याचा मला त्रास होणार नाही?''

''ए ... ज्यादा बकबक करू नकोस. दारूवर माझा पैसा खर्च केलाय. तुझ्या बापाच्या भरवशावर नाही पीत. माझा मी कमवतोय. मला माझा पैसा कसाही उडविण्याचा अधिकार आहे. जादा बकबक नकोय.''

बडबडतच तो बेडरूममध्ये निघूनही गेला. ती स्तंभित. त्याच्याकडे पाहातच राहिली. तिला कळलचं नाही. एकदम माझ्या बापापर्यंत जाण्याचं कारणंच काय? माझा नवरा दारूवर त्याच्या कमाईचे जरी असले तरी 'आपलेच' पैसे खर्च करत असेल, तिला दारू पिणं आवडत नसेल, तर ती आपल्या सहचर्‍याला एवढंही म्हणू शकत नाही? कां म्हणू नये? तिला सर्वात जास्त जर चीड कशाची येत असेल तर... तर या दारूची आणि दारू पिणार्‍यांची. माझा नवरा हा माझा आहे तर त्याचा पैसाही माझा आहे, त्याची प्रतिष्ठाही माझी आहे. त्याच्या वेळेवर माझा आग्रहीपणा असू शकतो हे हा नाही समजू शकत?

मी... माझं... मला... या अहंकारातच हा जगणार आहे काय? मग मी कोण? माझं इथे काय स्थान? काय काम? मी याच्यासोबत लग्न करून माझं सर्वस्व सोडून याला जीवनभराची सोबत करायला आले आणि हा म्हणतो... माझा पैसा... माझं पिणं. व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला तर याला चालेल काय? स्त्री पुरुष दोघेही सारखेच जीव ना? मग माझ्यासाठी वेगळे नियम आणि याच्यासाठी वेगळे नियम असे कसे? केवळ हे अर्थार्जित आहे म्हणून याला हा अधिकार मिळाला आहे? मी अर्थार्जित होऊ शकत नाही? अर्थार्जित होणे म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे होतं काय?... नाही. तसे तर अजिबात नाही. मी उद्या नोकरीला लागले आणि वाट्टेल तेवढा वेळ बाहेर राहायला लागेल, तर याला चालू शकेल?... छे शक्यच नाही. मग हा पुरुष म्हणून याला हा अधिकार मिळू शकतो? का शेवटपर्यंत माझ्यासारखीनं हिदोळा होऊनच जगायचं काय? मनात नकळत प्रश्न उठला.

No comments: