Sunday, July 29, 2007

पतंग......

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे निखील लक्ष्मी रोड आणि जंगली महाराज रोड यांना सांधणाऱ्या “प्रेमी-युगूल” ब्रिजवर गाडी निमूटपणे पार्क करत होता. अगदी पतंग हॉटेलसमोरच! “प्रेमी-युगूल” हे निखीलनेच त्या ब्रिजला दिलेले नाव! इथेच एकेकाळी तो आणि ती भेटायचे.
तसा तो रोजच इथे येतो, पण एकटाच. समोरचा रंग उडालेला पतंग पाहून हसतो. आणि एक सिगरेट घेऊन पाच मिनीटांमध्ये निघूनही जातो. खिशातून सिगरेट काढायची आणि कर्तव्य म्हणून धूर आत बाहेर करायचा की झालं. मग मात्र सरळ घरचा रस्ता. वाढत्या वयाबरोबर कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यावा हे त्याला अचूक कळू लागलय! पण आज का कोणास ठाऊक त्याला उगाच तिथे थांबावसं वाटत होतं. आज जवळ जवळ पंधरा दिवसांनी थोडा निवांत वेळ मिळाला होता त्याला.

“पंधरा दिवस… काय केलं होतं बरं मी या पंधरा दिवसात?”
निखील स्वतःच्याच तंद्रीत हरवला.

“कितीतरी प्रॉमिसेस सरळ सरळ तोडले होते. बाकी कोणाचं काही नाही पण माझ्या लाडक्याला पतंग आणि मांजा आणून द्यायचा होता...”
रिकाम्या वेळी आयुष्यातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीची आठवण न होणे जरा कठीणच! आणि त्यामुळेच याक्षणी निखीलला सगळ्यात जास्त हळहळ मुलाला दिलेला शब्द न पाळल्याची वाटत होती.

“त्याला पतंग उडवायची भारी हौस! अगदी बापावर गेला आहे तो त्या बाबतीत!!”
स्वतःशीच पुटपुटत निखीलने सिगरेट पेटवली आणि धुराबरोबरच त्याचं मन पतंगासारखं उंच उंच उडत गेलं.
हवेत स्वैर उडणाऱ्या पतंगाला सावरायला बऱ्याचवेळा किमान मांजा तरी असतो!!

“एकेकाळी काय पतंग उडवायचो आपण. अगदी वेड लागायचं पतंगांच्या दिवसांमध्ये…”
तसा निखील मुळचा एकही कान्हा मात्रा वेलांटी नसलेल्या, आतून बाहेरून सरळ अशा अहमदनगरचा!
नौकरीनिमित्ताने नगर जे सुटलं ते कायमचच. आता फक्त दिवाळी ते दिवाळी…!

“…दिवाळी संपल्यापासून पतंग उडवायला जी सुरुवात होई, ती तशीच व्यसनाप्रमाणे कलेकलेने वाढत संक्रांतीपर्यंत चाले.”
आठवणी उजळत होत्या आणि खोल पाण्यातला बुडबुडा पृष्ठभागावर येऊन फुटावा त्याप्रमाणे फुटत होत्या.

“अरे काचेचं काय करायचय?” कोणीतरी म्हणायचं.
“करायचय काय, घरात गेलेले बल्ब असतील ते गोळा करू आणि पोत्यात घालून कुटू. आहे काय त्यात?”
ही स्वस्तात काचेची पुड मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत होती.

“चला टायर मिळालं मला, इथेच होतं कचराकुंडीत पडलेलं.”
आणखी एक दोन मित्र मग त्या उत्साहात भर घालित असत. त्या टायरवर शिरस उकळवणे होऊन जाई. टायर विझवणे हा देखील एक खेळ होऊ शकतो हे त्यावेळी त्यांना कळालं होतं! शेवटी कोणीतरी घरून पाणी आणून आग विझवत असे. आणि तेही करायचे नसेल तर सार्वजनिक हपसा नाहीतर उघडी गटारे!

“फाटके कपडे तरी आणा रे तुम्ही.”
सगळ्यात मागे मागे राहणाऱ्या एक दोघांच्या अंगावर ही जोखीम येऊन पडत असे. हे कपडे गोळा करणे म्हणजे एक मजेशीर काम असे. ज्याकुणावर ही पाळी येई त्याला कुठून तरी असे फाटके कपडे चोरून आणावे लागत.

“अरे रंगाचं काय?”
रंग कुठला आणायचा यावरून वादविवाद स्पर्धा चालत आणि त्यात हमखास जिंकणारे रंग असत लाल, केशरी किंवा पिवळा!
या मित्रमंडळींपैकी जो स्वभावाने (आणि शरीरानेही!) सगळ्यात गरीब त्याला गरम गरम शिरस पकडावी लागे! एक जण काच पकडायला, एक धाग्याचा रीळ पकडायला, आणि आणखी एक मांजा चकरीवर गुंडाळायला. कित्येकवेळा दोऱ्याचा रीळ मित्रांअभावी तारेत अडकवून ठेवावा लागे. अशा साग्रसंगीत पद्धतीने त्यांचा मांजा सुतवून होत असे. मग एकमेकांत चूरस, कोणाचा पतंग जास्त वेळ आकाशात टिकतो ते. एक ना अनेक युक्त्या दुसऱ्याला गौण दाखवण्याच्या, कमी लेखण्याच्या. या सगळ्या अहमहमिकेसाठी अर्ध्यातून पोटदुखीच्या नावाखाली शाळा बुडवणे; कुठलेतरी सर किंवा बाई त्यांचे आजी किंवा आजोबा वारल्यामुळे घरी गेले आहेत म्हणून सुट्टी आहे अशी घरच्यांना; आणि आपला काका किंवा मामा आजारी आहे अशी शाळेत थाप मारणे अशा अनेक करामती निखीलला आठवू लागल्या.

“आपली सगळी बोटे या थंडीच्या दिवसांमध्ये कशी पायाच्या भेगांसारखी कायम कापलेली असत.
मग पातळ भाज्या जेवणात वर्ज. आणि तसेही जेवणात लक्ष लागत नसेच. सगळे लक्ष गच्चीतल्या गोंगाटाकडे. पण तरीही आईने भात केलाय की नाही याकडे विशेष लक्ष. आणि जर भात केलाच नसेल तर मग गोन्नी! फाटलेला पतंग चिटकवण्यासाठी गोन्नीचे लालचुटूक फळ तोडताना नाही नाही ते धाडस करायचो आपण त्यावेळी. ते बोरासारखे बारीक चिकट गोड फळ खायचे आणि त्यानेच पतंग चिटकवायचे. आज त्या फळाविषयी चारचौघात बोलायला देखील लाज वाटते आणि एकेकाळी आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे फळ होते ते! नंतर कधी तसले झाडच पाहायला मिळाले नाही. काय मजा आहे, आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांची आपल्याला गरज असते पण ते व्यक्त करण्याची हिंमतच होत नाही. कारण तसं करण्याची एकतर लाज तरी वाटते किंवा त्यामुळे अहंकार तरी दुखावला जाणार असतो...”
हा विचार मनात येताच निखील उगाच मोठ्याने हः करून हसला. आणि परत धुराला सोबत घेऊन विचारांच्या गुहेत पुढे सरकला.

“…पण या सगळ्यापेक्षा खरी मजा येई ती म्हणजे आपल्याला आवडणारा पतंग पाहात राहाणे आणि तो कटला की सैरावैरा त्याच्यामागे धावत सुटणे. मग मारामाऱ्या; भांडणे; पतंग फाडणे; तो फाटलेला पतंग पाहून हळहळणे; रुसणे; हिरमुसणे; आणि कधी कधी रडणे.”
आकाशातल्या रंगीबेरंगी पतंगाच्या जाळ्यासारखेच विचारांचे रंगीबेरंगी जाळे निखीलच्या मन:पटलावर पडले होते. आणि क्षणाक्षणाला त्याचा चेहरा नुकतीच वात पेटवलेल्या पिवळ्याधमक समईसारखा लख्ख उजळत होता.

“संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी अगदी लहान असताना घरून डबे घेऊनच निघायचो. कोणाचा डबा पहिले भरतो यासाठी आणखी एक शर्यत. मग हळूहळू डब्याची जागा प्लॅस्टीकच्या पिशवीने घेतली आणि नंतर तीही नाहीशी झाली. जसे जसे वय वाढत गेले तशी त्या गोष्टीचीही लाज वाटू लागली आपल्याला, आणि क्षणात अनेक आवडती, परिचीत माणसे अनोळखी वाटायला लागली. खूप दूर निघून गेली सरून गेलेल्या वयाबरोबरच! मग उरली फक्त काही खास मित्रमंडळी. ही सगळी मित्रमंडळी रेवड्यांची पाकिटे घेऊन एकमेकांच्या गळाभेटीसाठी हमखास गल्लीत जमायची. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत एकमेकांशी ‘पतंगयुद्ध’ करणारे आम्ही कसे एकमेकांविषयी कुठलाही किंतू न बाळगता निखळ बोलायचो. खरंच तेवढे एकच किती छान होते लहान असताना! पण हळूहळू पतंगाच्या धाग्याप्रमाणे मनावरही पिळ बसू लागले आणि मग काही धागे हा पेच सोडवताना कायमचे तुटले. इतके की पुन्हा गाठ मारून देखील एकत्र आणण्याची सोय राहिली नाही!
काळाच्या ओघात जबाबदाऱ्या वाढत गेल्या. ओढून घेतलेली लफडी त्रासदायक होत गेली. या सगळ्यामुळे स्वभाव बदलत गेला. माणसे बदलली. करीअरसाठी गाव सोडावे लागले. या सगळ्यात आपली संक्रांत कुठेतरी हरवूनच गेली. तसं आवर्जून संक्रांतीला जाणं होतंच. पण संक्रांतीला अगदी शास्त्रापुरताच पतंग हातात येतो हे ही जाणवतय आता.
अगदी संक्रांतीच्या आदल्या दिवशी पुण्यावरून निघायचंच संध्याकाळी उशीरा. नगरला घरी जाऊन झोपायचं. सकाळी उठताच पहिला विचार प्रश्नार्थक, “संध्याकाळी कधी निघायच?” आणि आजकाल वाराही थोडा मनाविरुद्ध वागतो; पुर्वीसारखा हवा तेंव्हा येतच नाही! या सगळ्या कल्लोळातून कसाबसा पतंग वर उडालाच तर अनेक पतंग श्वापदासारखी झडप घालतात. त्यात बिचारा आपला जुन्या विचारांचा पतंग कुठे टिकणार या नव्या लोकांपुढे? परत दुसरा पतंग लावायचा उत्साहच राहात नाही. हे सगळं करता करता संध्याकाळी परत निघण्याची वेळ येते. तिळगुळ घ्यायचा तर राहिलाच पण घरी येणा्ऱ्या छोट्यांना द्यायला देखील वेळ मिळत नाही.”
या सगळ्या विचारांच्या घोळक्याने निखीलचे मन पुन्हा काजळू लागले. आणखी काही चांगल्या आठवणी हाताशी येतायत का हे पाहाण्यासाठी त्याने पुन्हा गच्च डोळे मिटले. पोळ्यावर दगड मारताच जसे मधमाशांचे मोहोळ उठावे तसे पुन्हा एकदा विचारांचे मोहोळ निखीलच्या मनात उठत होते. आणि दिशाहीन भरकटत होते. कधी अंगणात; कधी अंगणातल्या झाडापाशी; कधी गच्चीवरल्या गवतावर; कधी त्या गवतावरच्या पांढऱ्या फुलांवर; कधी त्या फुलांवर बसलेल्या पोपटी, पिवळ्याधमक, हिरव्या, सप्तरंगी फुलपाखरांवर; तर कधी बाभळीच्या काट्यांत; कधी उंच उंच ऍन्टीनामध्ये; कधी इलेक्ट्रीकच्या तारांवर; कधी औदुंबराच्या झाडात; आणि कधी कधी परत निळ्या निळ्या आकाशात; रंगीबेरंगी पतंगांत!
पुन्हा एकदा त्या सुखद आठवणींमुळे निखील तरतरीत वाटू लागला.

“रस्त्यावर कित्येकदा पतंग पकडायच्या नादात जय्यत तयारीने निघायचो आणि कायम रहदारीला अडथळा करायचो. कित्येकदा अनेक मित्र या धांदलीत गाडीखाली सापडता सापडता वाचलेले... “
हे आठवताच निखीलच्या अंगावर सर्रकन काटा आला. पायाला बसलेल्या डांबराच्या चटक्याची आठवणही ताजी झाली.
“काय भयानक प्रसंग होता तो. पतंगाच्या मागे पळत पळत कुठे चाललोय याचे भानच राहिले नव्हते. आणि अचानक आपण किंचाळलो “आई ग!”
रस्ता दुरुस्ती चालू असताना आपण अनवाणी तिथे गेलो आणि काळाकुट्ट डांबराचा खडा पायात रुतला होता. नक्की वेदना कशामुळे होतायत हेच कळत नव्हतं. खडा पायात रुतला म्हणून की डांबर पोळले म्हणून!”

“आऽह!”
नकळत हलक्या आवाजात वेदना निखीलच्या ओठांवर आली. आठवणींतून भानावर येत निखीलने हात प्रतिक्षिप्तपणे झटकला. सिगरेट संपल्याने बोटापाशी जळणाऱ्या फिल्टरचा त्याला जोरदार चटका बसला. त्याने चटकन ते थोटूक खाली फेकले

…विषय असाच कुठून कुठे भरकटत गेला असता; जर निखीलला सिगरेटच्या थोटकाचा चटका बसला नसता.
तेवढ्या पाचच मिनिटांत निखीलच्या डोळ्यासमोरून अनेक संक्रांती निघून गेल्या होत्या. सगळ्या संक्रांती क्षणिकच का होईना पण वेगवेगळा आनंद देणाऱ्या, आज मात्र अगदी सगळ्या तशाच सरळसोट आणि आळणी वाटत होत्या. मागे राहात होती ती फक्त एक अनामीक हुरहुर…

“आज तसल्याही सुखाला आपण पारखे आहोत….”
हा विचार मनात येताच त्याला परत त्याच्या लाडक्याची आठवण झाली.

“आज छोकऱ्याला नक्कीच पतंग घेऊन जाऊ!”
किमान तेवढे तरी केलेच पाहिजे हा विचार निखीलच्या मनात आला.

गाडी काढण्यासाठी निखील वळला आणि क्षणभर सुन्न मनाने तिथेच थांबला. यापुर्वी कित्येक पतंग हातून फाटूनही, पावसाच्या हलक्या हलक्या सरींनी आकाशातच भिजूनही, भांडणात ते स्वतः फाडूनही त्याला जेवढे खिन्न वाटले नसेल तेवढे वाटू लागले. रोज तो त्या पतंग हॉटेलच्या रंग उडालेल्या पतंगाकडे पाहून हसायचा. आज त्याने स्वतः त्या पतंगात रंग भरले होते; पण डोळ्यातल्या पाण्यामुळे तेही धुसर झाले होते. त्याचे उजळलेले मन परत काजळू लागले.

त्याने फेकलेले जळके थोटूक नेमके एका फाटक्या पतंगावर जाऊन पडले होते; आणि तो पतंग रेषारेषांतून भुरुभुरु जळत होता. निखीलच्या आभाळात अनेक विनाधाघ्याचे अगतीक पतंग वाऱ्यावर फरपटत होते! फाटत होते!!

No comments: