Sunday, July 29, 2007

भारत @ २०२५




स्वतंत्र भारत आज साठीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या साठ वर्षांत जग एकदाच नव्हे तर अनेकदा बदलले. चहूअंगांनी बदलले. भारतही आमूलाग्र बदलला. बहरला. यातले काही बदल तर थक्क करणाऱ्या वेगाने घडले. राजीव गांधी यांनी एकविसाव्या शतकाची भाषा १९८५मध्ये पहिल्यांदा केली तेव्हा 'आपला देश तर अजून मध्ययुगात आहे. मग हे एकविसावे शतक ते कोणते?' असे कुत्सित प्रश्ान् त्यांना विचारण्यात आले. त्यांना कम्प्युटरयुगाची चाहूल लागली, तेव्हा त्यांची हेटाळणी करण्यात आली. पण भारताची मुदा असणाऱ्या या एकविसाव्या शतकात, आज ना उद्या भारत हा महासत्ता होणे आणि परदेशांत राहणारे भारतीय म्हणजे 'ब्रेन ड्रेन' नसून 'ब्रेन बँक' आहे, या गोष्टींची चर्चा समाजाच्या थेट तळापर्यंत पाझरली आहे. एक वैज्ञानिक भारताचा राष्ट्रपती झाला आणि त्याने इसवी सन २०२०मधल्या संपन्न भारताचे चित्र जगापुढे ठेवले.

या साऱ्या पार्श्वभूमीवर 'भारतञ्च२०२५' रेखाटण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'नेे खुले आवाहन केले, तेव्हा राष्ट्रपतींनी घातलेली कालमर्यादा आणखी पाच वर्षांनी पुढे नेण्यात आली. आजपासून साधारण दोन दशकांनी भारत कसा असेल, हे आम्हाला आमच्या वाचकांकडून जाणून घ्यायचे होते. त्यांच्या प्रतिक्रियांची दखल 'महाराष्ट्र टाइम्स'च्या दिवाळी अंकात घेणार आहोत आणि त्यातल्या निवडक प्रतिक्रियांना दिवाळी अंकातल्या खास विभागात स्थानही देणार आहोत, असे तेव्हा मुद्दामच जाहीर केले नव्हते. दोन दशकांनंतरचा भारत कसा असेल, असा विचार करतानाही प्रामुख्याने अपेक्षित होतेे ते देशातले तेव्हाचे राजकारण आणि त्या अनुषंगाने होऊ शकणारे बदल. राजकारण देशाच्या वाटचालीच्या मधोमध तर असतेच; पण ते आकार घेते तेव्हा त्यात सर्वाधिक प्रमाण असते लोकेच्छेचे! ही लोकेच्छा, लोकरूची आणि लोकसंवेदना 'मटा'मार्फत पुन्हा लोकगंगेपर्यंत पोहोचावी, हा प्रतिक्रिया मागवण्याचा हेतू होता. तो वाचकांच्या प्रचंड प्रतिसादाने अपेक्षेबाहेर सफल झाला. दोन दशकांनंतरच्या देशस्थितीचे मानसचित्र देशभर विखुरलेल्या वाचकांनी कळवले. त्यात चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, बडोदा इथल्या वाचकांप्रमाणेच महाराष्ट्रभरचे वाचक होते.. प्रतिक्रियांचा कित्येक दिवस नुसता पाऊस पडत होता. यामध्ये सर्व वयोगटांचे वाचक होते. कित्येक पावसाळे पाहिल्यावर थोडासा जूनपणा आलेले जसे होते, तसे मिसरूड फुटल्याक्षणी स्वत:च्या स्वतंत्र विचारांची पालवी फुटलले टीन-एजरही होते. या प्रतिक्रिया वाचताना आपण जणू महाराष्ट्राच्या समूहमनाची घुसळण होऊन निघालेले नवनीत पाहात आहोत, असे वाटत होते!

निवडक पत्रांमधला वेचक भाग, तसेच उल्लेखनीय पत्रे पाठवणाऱ्या वाचकांची नावे सोबत दिली असली, तरी सगळ्या पत्रांचा मिळून एक सारांश सांगता येईलच. राजकारणाचा विचार करणाऱ्या बहुतेक वाचकांच्या मनात आता 'घराणेशाही आणि या घराणेशाहीला विरोध करायला हवा', असा विचारच राहिलेला नाही. कदाचित सर्वच पक्षनेत्यांच्या घरात तेच घडत असल्याने वाचकांना तसे वाटत असेल. पण आणखी दोन दशकांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या किंवा राहुल गांधी, वरुण गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांनी देशाच्या पातळीवर नेतृत्व करण्यात वाचकांना आता काहीच गैर वाटत नाही. उलट सर्वच वाचकांना या आणि इतरही सर्व तरुण, सुशिक्षित नेत्यांकडून खूप अपेक्षा आहेत. या तरुण नेत्यांच्या आई-वडिलांनी काही चुका केल्या असल्या, तरी हे तरुण त्यातून योग्य तो धडा घेऊन नीट वागतील, अशी खात्रीही बहुतेकांना आहे.

राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विकासाचा, समृद्ध भारताचा जो नवा अजेंडा सेट केला आहे; तो बहुसंख्य वाचकांनी मनोमन स्वीकारला आहे. त्यांनी भारताचे भविष्यातले सारे राजकारण या विकासाच्या अजेंड्यात सामावून टाकले आहे. त्यामुळेच दोन दशकांनंतरचे राजकारण कसे असेल, याचे उत्तर वाचक निस्संदिग्धपणे ते विकासाचे असेल, असे देतात. विकासाच्या या कल्पनेत भारताने सुपरपॉवर होणे हे जसे आहे, तसेच भारतात एकही माणूस निरक्षर, उपाशी आणि बेकार राहता कामा नये, ही आचही आहे. देशाचे सारे राजकारण गेल्या दशकात विकासकेंदी झाले आहे. त्याचे स्पष्ट प्रतिबिंब प्रतिक्रियांमध्ये पडले आहे.

काही वर्षांपूवीर् लोकशाहीला शिव्या देण्याची फॅशन होती. आपल्या लोकांना डिक्टेटरच हवा, वगैरे बोलले जायचे. पण एखाद्-दुसरा अपवाद वगळता कोणीही लष्कराने राज्य चालवावे, लष्करी क्रांती झाली तरच देश वाचेल, असे म्हटलेले नाही. उलट बहुतेकांनी साठ वषेर् लोकशाही टिकल्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. अनेकांनी परदेशी विचारवंतांचे (विशेषत: इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल) उतारे काढून ते भारतीयांनी कसे खोटे पाडले, हे दाखवून दिले आहे. या साऱ्या विचारवंतांना स्वातंत्र्यानंतर भारताची लवकरच वाट लागेल, शकले उडतील, अशी भीती (की आशा?) वाटत होती.

भारताचे कधी ना कधी तुकडे पडणारच आहेत. 'बाल्कनायझेशन' हेच आपले भविष्य आहे, असली दळभदी स्वप्ने भारतीय विचारवंतांनाही पडत असतात. या विचारवंतांपेक्षा मराठी समूहमनाचे 'गट फिलिंग' महत्त्वाचे मानले, तर भारताचे तुकडे पडण्याइतके मोठे संकट कोसळेल, असे कुणाला वाटत नाही. उलट अनेकांनी दक्षिण आशियाची जबाबदारी शेवटी भारतावरच असल्याने 'सार्क'मधल्या सर्व देशांना भारताने मदत देऊन उभे करावे, असे सुचवले आहे. उद्या देश चालवणाऱ्या तरुण नेत्यांना या परिस्थितीची दखल घ्यावीच लागेल, असेही अनेकांनी बजावले आहे. राजकारणाविषयी लिहिताना वाचकांनी दाखवलेले 'जिओ-पोलिटिकल' (भूराजकीय) भान थक्क करणारे आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशाच्या आयुष्यात दोन दशकांचा काळ म्हणजे फार मोठा नाही. पण सध्याचा बदलांचा वेग पाहता एवढ्या काळातही काय काय घडू शकते, याचे चित्र रेखाटता येते. तसे चित्र राजकारणाला मध्यवतीर् ठेवून वाचकांनी रेखाटले आणि त्यातून दोन दशकांनंतरच्या भारताचे एक रूप साकार झाले. ते आहे समर्थ, संपन्न पण सुसंस्कृत लोकशाही देशाचे. महासत्ता झालेल्या आणि शहाण्या नेत्यांच्या हातात भवितव्य सुखरूप असणाऱ्या देशाचे. गरिबी, बेकारी या प्रश्ानंची जाण असणाऱ्या नेत्यांचे.

शेकडो वाचकांच्या मनातून उमटणारे 'मेरा भारत महान!' म्हणायला लावणारे असे हे चित्र!

- सारंग दर्शने
...........................
बहुरत्ना वसुंधरा!

दोन दशकांनी भारत जगात सर्वोच्च स्थानी असेल, असा माझा विश्वासच आहे. तसे स्वप्न आपले राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिले आहेच. ते खरेच होईल. पण भारत किंवा महाराष्ट्र नवतरुणांच्या द्वारेच महान होईल, असे नाही. त्याला अनुभवाची जोड ही हवीच. महाराष्ट्राची अस्मिता बाळगणारे आणि राष्ट्राभिमानाने परिपक्व असणारे नेतृत्वच देशाला पुढे घेऊन जाईल. भारतीय संस्कृती सर्वाधिक प्राचीन आहे. भारतमातेच्या पुण्याईवरच हा देश टिकेल. बहुरत्ना वसुंधरा हाच आमचा विश्वास आहे.

- जयवंतीबेन मेहता,
माजी केंदीय राज्यमंत्री, मुंबई
....................

पुन्हा सुवर्णयुग!

भारताची प्रगती वाखाणण्यासारखी आहे. साखरेचा महापूर, शिलकी धान्यसाठा, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या राजवटींमुळे झालेली यांत्रिक प्रगती, राजीव गांधी यांनी आणलेला कम्प्युटर, त्यामुळे आयटीत चाललेली घोडदौड, पी. व्ही. नरसिंहरावांनी खुली केलेली जागतिक बाजारपेठ... याशिवाय भारत आज विज्ञानातही आघाडीवर आहे. आजचा शिक्षित तरुण या साऱ्यांची फळे इसवी सन २०२५मध्ये चाळिशीत असेल तेव्हा पुरेपूर भोगेल. हाच तरुण आशिया, यूरप आणि अमेरिकेची उरलीसुरली क्षितिजे काबीज करेल. लोकशाही तेव्हा अधिक सुदृढ असेल. सोनियांचा मुलगा, पवारांची मुलगी अशी व्यक्तिनिष्ठा राहणारच नाही. व्यक्तिनिष्ठ, प्रांतिक, भाषिक अशा पक्षांवर बंदीच आलेली असेल. धर्म, देव व देवळे राहतील; पण त्यांचे अवडंबर नसेल. विज्ञानामुळे स्थैर्य येईल, तसेच सामान्य जनतेला सारी ऐहिक सुखे मिळतील. पाकिस्तानचा बंदोबस्त अमेरिकाच करेल. इतर छोटे, तसेच उपखंडातील देश भारताची मदत घेतील. भारतात पुन्हा सुवर्णयुग अवतरेल.

- नरेंद दळवी, कांदिवली, मुंबई
.......................

लोकसंख्या हेच आव्हान!

पुढील वर्षी स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव. स्वातंत्र्यानंतर सर्व क्षेत्रांमध्ये अपेक्षेपेक्षाही अधिक बदल घडले. दुसरीकडे सामाजिक जाणीव आणि मूल्ये यांचा मात्र विसर पडतो आहे. राष्ट्रपतींचे महासत्तेचे स्वप्न प्रत्येक भारतीयाने पाहिले, तर ते वास्तवात येण्यास वेळ लागणार नाही. देशात लोकशाहीची पाळे-मुळे घट्ट रोवली गेलीत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेत बदल होण्याचा प्रश्नच नाही. मात्र, शहरांप्रमाणेच खेड्यांकडेही जास्त लक्ष द्यावे लागेल. तसेच, आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार हवा. अन्यथा सामाजिक ऐक्य धोक्यात येईल! 'गरीब होतायत आणखी गरीब आणि श्रीमंत होतायत आणखी श्रीमंत' या स्थितीतही बदल घडवून आणावाच लागेल. भविष्यात एकाच पक्षाला बहुमत मिळणे कठीण दिसते.

तरुणांना भ्रष्टाचाराबद्दल आजतरी तीव्र घृणा आहे. त्यामुळे ही मंडळी राजकारणात परिपक्व होतील, त्यावेळी भ्रष्टाचाराचा वेग कदाचित मंदावेल! लोकसंख्या रोखण्याचे कठोर उपाय आणि जातीय सलोखा वाढवणे ही खरी आव्हाने त्यावेळी असतील!

- अजित लोणे, विद्याविहार, मुंबई
.........................

महाराष्ट्र आधार या भारताचा...

' बदल' हाच कोणत्याही प्रगतीचा पाया असतो. इस २०२५मध्ये आपला देश एक विकसित देश असेल. आपल्याकडे लोकशाही असल्याने महत्त्वाचे निर्णय संसदेत होतात. त्यावेळची संसद आजच्यापेक्षा वेगळी आणि अधिक चांगली असेल. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर; तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पातळीवर मोठ्या जबाबदाऱ्या असतील. चांगल्या विचारांच्या, सत्प्रवृत्त नेत्यांकडे देशाचे नेतृत्व गेल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र हा कायमच देशाचा महत्त्वाचा प्रांत राहिला आहे. २० वर्षांनीही महाराष्ट्र हाच देशाचा आधारस्तंभ असेल.

- रशिदा हवालदार, पनवेल.
........................

भ्रष्टाचार आणि काश्मीरप्रश्न!

आजची प्रगती आणि जागतिक महत्त्व पाहता इ.स. २०२५मध्ये भारताचे वर्णन 'शक्तिशाली राष्ट्र आणि संपन्न देश' याच शब्दांत करावे लागेल. अन्नधान्यात आपण स्वयंपूर्ण असू. जातीयवादाचे विष संपलेले असेल. खून, दंगली, हुंडाबळी अशा गुन्ह्यांसाठी आजच्यापेक्षा अधिक कठोर कायदे असतील. संरक्षणक्षेत्रातली घोडदौड पाहता चीन आणि पाकिस्तान आपल्यासमोर झुकलेले असतील. आयटीच नव्हे, तर अणुशक्ती, अवकाशातील युद्धशास्त्र यातही भारत आघाडीवर असेल. शेतीत आपण चीन आणि इस्त्रायलला मागे टाकू. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व भारताकडे चालून येईल. एक अब्ज लोकसंख्येची शक्ती प्रबळ असेल; तसेच त्यांची विचारधाराही प्रगल्भ होईल. भारत पर्यटकांचे आवडते ठिकाण होईल. मात्र, या वाटचालीत आहेत दोनच अडथळे : भ्रष्टाचार आणि काश्मीरप्रश्न!

- नीलेश उदावंत, कोपरगाव
...........................

दहशतवादापेक्षा आशावाद जुना!

विश्व दहशतवादाच्या सावटाखाली जगत असताना भवितव्यावर भाष्य करणे धारिष्ट्याचे ठरेल. पण दहशतवादापेक्षा जुना असणारा आशावाद जगण्याची ऊमीर् देत असतो. सध्या काँग्रेसकडे राहुल, सचिन, मिलिंद, ज्योतिरादित्य, प्रिया अशा तरुण नेत्यांची फौज असल्याने तेव्हा काँग्रेसचा झेंडा दिमाखात फडकत असेल. आयटीशी परिचित असे हे सधन नेते सरकारी कामकाजात अधिक पारदर्शकता आणतील. पण गरिबी, बेकारी, लोकसंख्या यासारख्या ज्वलंत प्रश्ानंची दाहकता ते कशी कमी करतात, यावर त्यांचे खरे यश अवलंबून आहे.

महाराष्ट्रात उद्धव आणि राज यांच्या सेना परस्परांशी लढत राहिल्या, तर सुप्रिया सुळे आणि त्यांचे राष्ट्रवादी साथी राज्यात मॅरॅथॉन इनिंग्ज खेळल्याशिवाय राहणार नाहीत. भाजप आणि उजव्या विचारांच्या पक्षांकडे तरुण नेत्यांची वानवा दिसते. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. स्वार्थी आणि चंगळवादी मध्यमवर्गाचा टक्का वाढत चालल्याने सामाजिक चळवळी यशस्वी होण्याची शक्यता कमी. मात्र, एखाद्या दूरदृष्टीच्या नेत्यामुळे नद्याजोडणीसारखे प्रकल्प मार्गी लागले, तर देशाचे अर्थकारण, समाजकारण आणि भूगोलच बदलेल.

- अभिजित गोगटे, बोरिवली, मुंबई
...........................

प्रगती व गोंधळ यांचा संगम

भारतीय क्रिकेट, हिंदी सिनेमांचे बॉक्स ऑफिस, सेन्सेक्स यांचे अनिश्चिततेशी जितके जवळचे नाते आहे, त्याहीपेक्षा जास्त भारताचे अनिश्चिततेशी नाते आहे. आज एवढी प्रगती झालेली असेल, असे १९८०मध्ये कुणी सांगू शकले असते का? सध्याची वाटचाल अशीच चालू राहिली, तर प्रगती आणि गोंधळ यांचा अभूतपूर्व संगम पाहावयास मिळेल. युवापिढीचा आकार प्रचंड वाढतोय. ही पिढी मतदारच न राहता थेट राजकारणात घुसेल. 'प्रोफेशनल अॅप्रोच', जोडीला प्रसिद्धी आणि वरची कमाई यांचे आकर्षण हा त्यांचा 'यूएसपी' राहील. महिलांच्या राजकीय आकांक्षांना धुमारे फुटतील; महिला नेतृत्व आक्रमक होत जाईल. वाढते शहरीकरण, लहरी हवामान, पायाभूत सुविधांची प्रचंड गरज, आथिर्क स्थिती आणि बेकारी हे पैलू राजकारणावर हुकूमत गाजवतील. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व 'मॉन्सून'प्रमाणे बदलत राहील.

- रामचंद हरी प्रभू, काणकोण, गोवा
...............................

महालोकशाहीची महासत्ता!

' इथे सगळे सुखी होवोत, निरोगी राहोत, कुणाच्याही वाट्याला दु:ख न येवो' या वैश्विक जाणिवेची कळत-नकळत उपासना आणि जोपासना करत आलेला भारत दोन दशकांनी पूर्ण साक्षर, समर्थ असेल. गेली ६० वर्षे महालोकशाहीच्या पायावर उभी राहात असलेली ही एक महासत्ता आहे. भ्रष्टाचार, दारिद्य, निरक्षरता असूनही भारतीय लोकशाही टिकून राहिली, हा पाश्चात्त्य विचारवंतांना चमत्कार वाटला होता. तो चमत्कार आहेच; पण दैवी नव्हे, मानवी! 'स्वत: जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या' ही जीवनपद्धती हा भारतीयांचा जीवनमंत्र. २०२५मध्ये स्वतंत्र भारतात जन्मलेले सारे भारताची धुरा वाहात असतील. त्यांची कार्यक्षेत्रे वेगळी असली, तरी ते विश्वाच्या संदर्भात भारताचा आणि भारताच्या संदर्भात विश्वाचा विचार करतील.

भारतीय शिक्षणपद्धतीने त्यांच्यावर केलेले संस्कार वाया जाणार नाहीत.

- श्रीधर तावडे, कुर्ला, मुंबई
..........................

बिग केऑस...

एखादी आगगाडी ताशी ६० किमी वेगाने जात असेल तर ती ठराविक काळाने किती अंतर कापेल, कुठे असेल हे सांगता येते. याच प्रकारे वीस वर्षांनंतरच्या भारताविषयी बोलता येईल. १९४७नंतर आजवर उद्योगधंदे, अर्थव्यवस्था, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आयात-निर्यात, पर्यटन, दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, शेती, व्यापार, रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक इत्यादी क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती विलक्षण वेगाने होत आहे. यातील अडथळे? वाढती लोकसंख्या, जातीय आणि धामिर्क भेदाभेद, अकार्यक्षम शासनसंस्था, स्वार्थलोलुप समाज व राजकीय व्यवस्था, नियम व कायदे यांची पायमल्ली, भ्रष्टाचार, जीवघेणी स्पर्धा, दहशतवाद, अमेरिका आणि यूरपची दादागिरी, सीआयएसारख्या संस्थांच्या कारवाया आणि भारतीयांच्या ठिकाणी असणारा राष्ट्रविन्मुख दृष्टिकोन या साऱ्या पार्श्वभूमीवर २०२५मधील भारत प्रचंड अराजकाच्या अवस्थेत असेल. राज्यव्यवस्था अधिकृतपणेच गुंड आणि परकीयांच्या हातात असेल. थोडक्यात तेव्हा असेल बिग केऑस!

- ज. दा. टिळक, ठाणे
..........................

सोन्याचा धूर निघेल!

बेसुमार लोकसंख्येच्या प्रदूषणाने विळखा घातलेला भारत कधीच महासत्ता होऊ शकणार नाही, अशी विचारवंतांची वचने आपण सतत ऐकत आलो आहोत. पण आणखी दोन दशकांनी आपली लोकसंख्या हाच आपला 'प्लस पॉईंट' असेल. त्यावेळी आपली ६० टक्के लोकसंख्या युवकांची असेल. भारत हा तेव्हा 'तरुण' देश असेल. महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि सळसळते रक्त यामुळे सर्वच क्षेत्रांत परिवर्तनाची सुप्त लाट तयार होईल. आथिर्क व आध्यात्मिक क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल. जगभर अमेरिकन डॉलरमध्ये होणारे व्यवहार तेव्हा भारतीय रुपयांत झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशातले धार्मिक, भाषिक आणि जातीजमातींचे भेदभाव संपवून देशाच्याच अस्मितेला प्राधान्य देणारी तरुण नेत्यांची पिढी उदयास आली असेल. संसदही तरुण असेल. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत असे म्हणतात. सर्वच क्षेत्रांत नेतृत्व करणारे तरुण हा लौकिक भारताला पुन्हा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री वाटते.

- वाहीद उमरोद्दीन शेख, नाशिक

............................

हवेत निष्ठावान तरुण

राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत साकार होण्यासाठी ताज्या दमाचे, पुरोगामी, निष्ठावान तरुण हवेत. अर्थात, वयाचा निकष हा अनेक निकषांपैकी एक. भारतासारख्या खंडप्राय आणि जाती, पंथ, धर्मांसह अद्भुत वैविध्याने नटलेल्या या देशाचे नेतृत्व करणारा तरुणवर्गही तितकाच उदारमनस्क, देशकार्याला धर्म मानणारा, राजकारणापेक्षा समाजकारणावर अव्यभिचारी निष्ठा असलेला, स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. आज तरुणांची मानसिकता अशी आहे का?

परंतु सर्व पक्षांकडे अपेक्षेने पाहावे असे काही तरुण नेते आहेत. काँग्रेस याबाबत खूपच समृद्ध आहे. त्याचे श्रेय त्या पक्षाच्या इतिहासाबरोबर त्याच्या सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष विचारसरणीला आहे. राहुल, सचिन, ज्योतिरादित्य समर्थ नेतृत्व देऊ शकतील. सुप्रिया सुळे स्वतंत्र प्रज्ञेच्या वाटतात. स्वत:चा ठसा उमटविण्याचा त्यांचा प्रयत्न आश्वासक आहे. प्रिया दत्त वडिलांचा सामाजिक सेवेचा वारसा चालवतील.

- दत्ता राशिनकर, चिंचवड, जि. पुणे
................................

कण्णा, त्रेधा आणि जगत

इसवी सन २०२५... राहुल गांधी प्रचंड मताधिक्क्याने निवडून आल्यावर पंतप्रधान होणे त्यांना काहीच कठीण नव्हते. त्यांच्या इटालियन पत्नीला आता इंग्रजीबरोबरच हिंदीही चांगले येते. पण मातोश्री सोनिया त्याला म्हणाल्या की 'बाबा रे, हे लोक उगाच आपल्यामागे लागतात. त्यापेक्षा तूही मनमोहनसारखा एखादा हाताशी धरून आरामात उपभोग घे. राज्य जरा अंगी तरी लागेल. गुलाम नबी आझाद हे पिकलं पान असलं तरी आपल्या खास माजघरातले. त्यांना पंतप्रधान करू. शिवाय ते मुशर्रफनाही मंजूर आहेत ना!

' कण्णा हजाऱ्यांशी स्वित्झर्लंडमध्ये बोलणी झालीत. त्याला चारपाच प्रकरणे काढू दिली, तर तो मॅनेजेबल आहे. त्याला मी त्याचे काका अण्णा हजाऱ्यांच्या वेळेपासून ओळखते. त्रेधाशीही मी बोललेय. गुजरात सरकारने 'मृगजळावर' मोठे धरण बांधण्याचा जो प्रस्ताव आणलाय, त्याला आपणही वरवर विरोध करायचा. कळलं? मग मेधाची शिष्या त्रेधा त्रास देणार नाही. राहता राहिला लालूंचा लुल्ला. अरे, आपणच नाही का त्याला हार्वर्डला पाठवला? फारतर त्याला विमानमंत्री करून टाक. आणि हो, त्या जगतला परराष्ट्रखाते दे. तसे मी नटवरना फार वर्षांपूवीर् कबूल केले होते. शिवाय सद्दामचा मुलगा उदय आता इराकचा सत्ताधीश झालाय. त्याच्याशी जगतची दोस्ती आहे. सुप्रियाला काहीच नको देऊ. तिच्या वडिलांना इटली आवडत नव्हती ना? बकअप राहुल!'

- अरुण भालेराव, घाटकोपर, मुंबई

................................

कृतार्थ मेधा पाटकर!

आणखी दोन दशकांनी महाराष्ट्राची तरुण पिढी उच्चशिक्षित असेल, त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि अविरत प्रयत्नांमुळे हिंदुस्थानात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असेल. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांतील तरुण राजकारणी एक होऊन दिल्लीत आपला ठसा उमटवतील, यात शंका नाही. काही नावे पुढीलप्रमाणे : प्रतीक प्रकाशबापू पाटील, प्रशांत हिरे, धैर्यशील माने, अमित देशमुख, मालोजीराजे, विनय कोरे, संभाजी निलंगेकर, उन्मेश जोशी, राहुल मोरे, बिपिन शंकरराव कोल्हे, पंकज भुजबळ, राजेश टोपे, समीर भुजबळ, नरेंद घुले, रणजितसिंह मोहिते-पाटील, अमरसिंह पंडित, राणा जगजितसिंह पाटील, राजेंद मुळीक, देवेंद फडणवीस, राजीव राजळे, रणजित कांबळे, शंभूराज देसाई, सागर मेघे, धनंजय मुंडे, राजेश पाटील, विश्वजित कदम, विनोद तावडे, अतुल भातखळकर, जितेंद आव्हाड.

सुप्रिया सुळे भारताचे नेतृत्व करतील.

राहुल गांधी, वरुण गांधी, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, प्रिया दत्त यांनी आपापल्या क्षेत्रात विधायक काम केल्यास त्यांना सत्तेत सहभाग मिळेल.

मेधा पाटकर यांनी मांडलेले सारे प्रश्ान् तरुण नेतृत्वाने सोडवलेले असतील; त्यामुळे मेधा पाटकर यांना कृतार्थ झाल्याचे समाधान मिळेल. हे सर्व तरुण नेते बकाल मुंबईचे रूपांतर आदर्श मुंबईत केल्याशिवाय राहणार नाहीत.

No comments: