Saturday, June 9, 2007

पैशाचे सोंग............................

........पैशाचे सोंग आणता येत नाही असे आपण म्हणतो। म्हणजे काय? तर जेंव्हा पैश्यांची गरज पडेल तेंव्हा अचानक पैसे उभे करता येणार नाही. असे फक्त आपणच म्हणतो, की महाराष्ट्राबाहेरही हा समज आहे? पैश्याकडे पैसा जातो म्हणतात. किंवा बँकाही मुळात पैसे असलेल्यालाच आणखे पैसे उसने देतात. असे का होते? मराठी माणूस पैश्याच्या बाबतीत इतका मागे का? असा विचार मनात आला असताना, हा म टा मधला लेख वाचला.
त्यात डॉ नीतू मांडक्यांना हॉस्पिटल उभारणे शक्य झाले नाही, ह्या घटनेचा धागा पकडून लेखक सुहास फडके ह्यांनी हा प्रश्न चर्चेला म्हणून आणला आहे। ते म्हणतात:
"...मांडके यांच्या मागे आर्थिक शक्ती उभी करण्याइतकी ताकदच या समाजात नाही, हे सत्य लक्षात घ्यायला हवे। ...
मराठी माणसाने, 'ठेविले अनंते तैसेची रहावे' हा तुकाराम महाराजांचा उपदेश फारच मनावर घेतल्याचे दिसते...."
तुलनेने महाराष्ट्रात शांतता असल्यामुळे येथे देशोधडीला लागण्यांची आपत्ती फार जणांवर आली नाही। मराठी माणसेही बाहेर पडली, पण दुसरीकडे जाऊनही त्यांनी चाकरी करण्यात धन्यता मानली. ...फाळणीनंतर मोठ्या संख्येने पंजाबी देशोधडीला लागले. ॥सिंधी समाजही याच परिस्थितीत भरडला गेला. तशी पाळी मराठी माणसावर कधी आली नाही.
मराठी माणसाने लक्ष्मीची आराधना न केल्याचा परिणाम येथील साहित्य, संस्कृतीवर झाला आहे। मराठी मालिका, चित्रपट, नाटक कमी खर्चात काढावे लागतात. त्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. मग आपण त्या कथेत सशक्त असतात असे सांगत फिरतो. त्यात काम करणार्‍यांना कमी पैशात काम करावे लागते.
कलेच्या सर्वच क्षेत्रात ... कर्तृत्वाला दाद देण्याइतके मराठी धनिक नाहीत। ... महिला विद्यापीठ ... ओळखले जाते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या नावाने. ...सावित्रीबाई फुले यांचे नाव एखाद्या प्रकल्पाला देऊन त्यांना अमर करण्याइतकी आथिर्क ताकद आपल्यात नाही. मुंबईत साधे रस्ते आणि गल्ल्या यांनादेखील आपण त्या त्या भागातील आपल्या कर्तृत्ववान व्यक्तींची नावे देऊ शकत नाही ...
... मराठी शास्त्रज्ञ, कीडापटू आणि इतर क्षेत्रे गाजवणारे यांचा सन्मानही आपण त्या थाटात करू शकत नाही। एखाद्या गटाने अथवा व्यक्तीने काही वेगळे कार्य करण्याचा संकल्प सोडला तर त्याच्या मागे उभे करण्याइतके आथिर्क बळ आपल्याकडे नाही.
... मुळात लक्ष्मीची उपासना करायची ती फक्त आपल्यासाठी आणि आपल्या कुटंउबियांसाठी हा विचार छोटा आहे। व्यवसाय वाढवणे, नवीन संधी शोधणे यामध्ये सामाजिक उन्नती दडलेली असते. व्यक्तींकडे, समाजाकडे समृद्धी असेल तर निधीअभावी अडणार्‍या अनेक चांगल्या उपकमांना गती देता येते. अनेक संस्थांमध्ये, सरकारात प्राप्त होणार्‍या वजनामुळे निर्णयप्रकियेत सहभागी होता येते. ... पैसे नसले की काय अवस्था ओढवते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईत मराठी विद्यार्थ्यांची होणारी कुतरओढ. ... मराठी मुले आपल्याच राज्यात प्रवेशासाठी वणवण फिरत असतात. मंत्रालयात पैशाच्या जोरावर अनेक कामे करुन घेतली जातात असे आपण म्हणतो, अनुभवतो. मग पैसे मिळवायला कोणी मराठी माणसाला नको सांगितले आहे का?
लक्ष्मीमुळे किती कामे होतात, समाजाची प्रगती कशी होऊ शकते याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असतानाही आपण लक्ष्मीकडे का पाठ फिरवतो हे एक कोडे आहे।
हे सगळे ठीक आहे। वर्णन परिणामकारक आहे आणि कारणमीमांसाही चांगली आहे, पण पुढे काय? हे सगळे एक कोडे आहे म्हणून का थांबायचे? अनेक सामाजिक सुधारणा महाराष्ट्रातल्या विचारवंतांच्या बुद्धीतून झाल्या आहेत, हे लक्षात घेतले, तर उपाय सापडतो. 'लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यात मराठी समाज मागे आहे' हा जर काही कमीपणा किंवा मागासलेपणा म्हणून जर मराठी माणसांनी गृहित धरला तर त्यातून नवे नवे विचार नक्की सुचतील आणि एक सामाजिक सुधारणा ह्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर पैश्याचे सोंग आणण्याबाबतीतही मराठी माणूस क्रांतिकारक ठरेल असा माझा विश्वास आहे.

No comments: