अस्मादिक साधारण ४ थी किंवा ५ वीत असतील। 'इति करी हास, भूगोल करी पास आणि इंग्रजी गणित करी सर्व विषयांचा सत्यानाश' अशी म्हण त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात, खूप प्रसिद्ध होती. ह्या काळात जवळ जवळ सगळ्या पुण्यातली होतकरू शाळकरी पोरे ’रेषा मारायला’ आ.दे., रे.स्व, हु.पा., से.स. विभागात लक्षी रोडच्या आजुबजूबाजुला घुटमळायची, असा तो काळ. समवयस्क, पुणेरी, चाणाक्षं आणि अनुभवी वाचकांना लक्षात आले असेलच. असो, मुख्य विषया कडे वळूयात: इतिहासाच्या तासाला मास्तरांनी शिकवले ’कोलंबस ने अमेरिका शोधून काढली’, माझ्या मनात आशेचा किरण चमकला... मला अशा हरवलेले (मला उगाचच वाटले, अमेरिका हरवली होती ती ह्या पठ्ठ्याने शोधून काढली) शोधून काढणाऱ्याची नीतांत गरज होती. लालेलाल झालेली आणि हुळहुळणारी माझी पाठ दोरीवर वाळत घातलेली आणि हवेने उडालेली शाळेची खाकी चड्डी शोधण्यात आलेल्या अपयशा मुळे आईने दिलेल्या बक्षिसाची आठवण करून देत होती. मी ठरवून टाकले, कोलंबसाला खाकी चड्डी शोधण्या साठी रवाना करावयाचे. आनंदही झाला, मी विचार केला बरे झाले ह्याला नाही सापडली तर आई ह्याची पाठ लाल करेल, आपण तर सुटलो. आपण फक्त ह्या कोलंबसाला शोधून काढले म्हणजे झाले. ह्या कामगिरी वर इतिहासाच्या आदलिंगे मास्तरांची मदत घ्यायची असे पक्के ठरवले. आदलिंगे मास्तर हे पूर्णं विनोदी आणी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मास्तर होते. विद्यार्थ्याचे असे बरेच गहन प्रश्न ते चुटकी सरशी सोडवत असत. मी मास्तरांना मधल्या सुट्टीत गाठले. त्यांना माझी गहन समस्या समजवून सांगितली आणि कोलंबसाला माझी मदत करण्याची गळ घातली, त्या बदल्यात कोलंबसाला मी ५ गोट्या आणि २ लिमलेटच्या गोळ्या देण्याचे कबूल केले. मास्तर खुपाच गंभीर पणे मला धीर देत म्हणाले ’समस्या गंभीर आहे, पण तू काळजी करू नकोस, मी कोलंबसाला टाकोटाक निरोप पाठवतो आणि शाळा सुटायच्या आत तो तुझी खाकी चड्डी आणून देईल याची व्यवस्था करतो. तू वर्गात जाऊन बस’॥दगडु शिपाई घंटा वाजवून शेवटचा तास संपल्याची घोषणा करतो. मी चिंतित अवस्थेत ’आपण कोलंबसच्या कुवती वर जरा जास्तच विश्वास दाखवला तर नाही ना’ असा विचार करत होतो आणी समोरून आदलिंगे मास्तर येताना दिसतात, मास्तरांच्या चेहेर्या वरचे हसू आणी हातातले पुडके मला येणाऱ्या आनंदी बातमीची नांदी देतात.
मास्तर ’हे घे तुझी खाकी चड्डी, त्याने इस्त्री पण करून दीली’।
मी आनंदात ’संध्याकाळी घरी येतो ५ गोट्या आणी २ लिमलेटच्या गोळ्या घेऊन।’
मास्तरांच्या प्रतिक्रियेची वाट न बघता मी घरा कडे धूम ठोकतो.. कधी एकदा आईला भेटेन असे झालेले असते. आईला एका दमात सगळा किस्सा सांगून हातात चड्डीचे पुड्के ठेवतो. आईची हसून हसून मुरकुंडी वळते. मी गोट्या आणी गोळ्या घेऊन मास्तरांच्या घरी जायला निघतो, आई माझ्या हातात काही नोटा कोंबते ’मास्तरांना दे, त्यांना सांग कोलंबसाला द्यायला, माझ्या कडून बक्षीस... अजून खूप काही शोधण्याची कामे येतील त्याचे कडे....
No comments:
Post a Comment