पोचुनी दारी तुझ्या मी
परत जायचे
मी असे आता कितीदा
करत जायचे?
रेखतो चित्रे अनोखी तो
सभोवती
त्यांत केवळ रंग आपण
भरत जायचे...
किर्र काळोखात बुडल्या
दशदिशा, तरी
स्वप्न किरणांची उराशी
धरत जायचे!
शुष्क पर्णासारखा गेलो
गळून; पण
सांग कुठवर जीवनी मी
तरत जायचे?
रोज मृत्यूच्या दिशेने
वाटचाल; पण
हसत-खेळत रोज थोडे
मरत जायचे
जीवनाने, अनुभवाने
शिकवले, तरी
गुरुजनांचे शिकवणेही
स्मरत जायचे!
No comments:
Post a Comment