Thursday, June 21, 2007

हवी आहेत : भूते

जाहीरात:

एका भूतकथाप्रेमी वाचकाला हवी आहेत घाबरवणारी भूतकथांतील अथवा लोककथातील अथवा अनुभवातील भूते।

पात्रता: उलटे पाय, ३६० अंश फिरणारी मान, लाल/पांढरे/अतीफिकट हिरवे डोळे आणि गडगडाटी हास्य।(इतर पात्रता चांगल्या असल्यास यापैकी काही/सर्व बाबींत सवलत देण्यात येईल.)

चमकलात का जाहीरात वाचून? काय करावे हो, पूर्वी सारखी खानदानी भूते राहीली नाहीत आता॥म्हणून जाहीरात द्यावी लागते..प्रेमकथा सर्वत्र आहेत, रहस्यकथा सर्वत्र आहेत, पण भूतकथा मात्र हल्ली वाचायलाच मिळत नाहीत..

लहानपणापासून भूतकथा आणि भूतचित्रपटांचे मला जबरदस्त आकर्षण। रात्री उशिरापर्यंत बैठकीच्या खोलीत भूतकथा(मा.नारायण धारप लिखीत) वाचून मग आता झोपण्याच्या खोलीत न घाबरता कसे जायचे?मग पॅसेजचा दिवा लावून बैठकीच्या खोलीतील दिवा घालवून पळत पळत पॅसेजमधे जायचे॥आता स्वयंपाकघरातल्या अंधारात न पाहता पळत पळत झोपण्याच्या खोलीत जाऊन एक मंद दिवा लावून पॅसेज मधे परत यायचे..पॅसेज मधला दिवा घालवून पळत पळत झोपण्याच्या खोलीतला मंद दिवा घालवून डोक्यावरुन पांघरुण घेऊन गुडुप्प झोपून जायचे.

आमच्या लहानपणी 'झी' 'स्टार' इ।इ. बाळांचा जन्म झाला नव्हता. दूरदर्शन हा एकमेव वाली. आणि मग मंगळवारी रात्री ९ ला लागणारी 'किले का रहस्य' मालिका श्वास रोखून पहायची. पण 'किले का रहस्य' ने शेवटी हे एक कटकारस्थान आहे असे दाखवून भूत संकल्पनेचा बट्ट्याबोळ केला. नंतर 'झी' वाहीनीवर बराच गाजावाजा करुन 'द झी हॉरर शो' आला. त्याचा पहिला भाग 'दस्तक' डोळे बंद ठेवून मधून मधून उघडून('आई, भूत अचानक दारामागून आलं कि मला सांग.नंतर मी डोळे उघडते.') पाहीला. 'भूते' हि केवळ स्मशान आणि कब्रस्तान यापुरती मर्यादीत न राहता कपाटातही (कपाट उघडल्यावर हात पुढे करुन नायिकेचा गळा दाबण्यासाठी)असतात आणि खाण्याच्या बशीवर नुसते मुंडके(स्वत:चे) पण ठेवू शकतात हा शोध लागला. मग काही महिने कपाट उघडताना आधी हळूच एक इंच उघडायचे॥मग एकदम वेगाने पूर्ण उघडून वेगाने मागे सरायचे..आणि कपाटात कोणी नाही याची खात्री करुन मग पुढे सरकायचे.. (भूताला चकवण्यासाठी हा उपद्व्याप बरे का!) रामसे बंधूंचा 'विराना' चित्रपट आणि इव्हील डेथ:भाग १ व २(३ अगदीच पुळचट होता..) यानी भूताना मानाचे स्थान मिळवून दिले. इव्हील डेथ पाहून झाल्यावर पलंग खिडकीपाशी होता तो सरकवला. त्या काळात एकदा थोड्या झाडीयुक्त प्रदेशातून घरी परत येत असताना झाडामागून लघुशंका करुन परत येणार्‍या पांढर्‍या सदर्‍यातल्या माणसाला मी असली सॉलीड घाबरले होते ना!! अशावेळी मी हळूच पाय पाहून घेते उलटे आहेत का. ती माझ्यादृष्टीने विश्वसनीय चाचणी असते. रामसे पटांत'अमावस्या' आणि कुत्रे रडताना आणि नायिका रात्री गाणे गुणगुणत आंघोळहौदात शिरली कि भूताचा सन्माननीय प्रवेश कथानकात होणार हे माहीती असायचे.. पण 'जुनून' चित्रपटाने 'पौर्णिमा' आणि 'वाघभूत' यांचा परस्परसंबंध जोडून 'अमावस्येला भूत येते' या रामसेबंधू गुरुसूत्राला दणदणीत हादरा दिला. (हा हंत हंत! वो भूत भूत हि क्या, जो अमावस कि रात ना आये??) 'झी हॉरर शो' हळूहळू 'हास्यमालिका' बनू लागला. यंत्रमानवासारखी चालणारी आणि भितीदायक न दिसता मतिमंद दिसणारी भूते येऊ लागली.आता सोनी वाहीनी वर 'आहट' मालिका आली. 'आहट' नेही अपेक्षा खूप वाढवल्या पहिल्या भागात मुंडकेविरहीत तरुण मुलीचे भूत दाखवून. पण नंतर 'आहट' पण विज्ञानमालिका आणि रहस्यमालिका प्रकाराकडे झुकायला लागले आपले 'भूतमालिका' पद सोडून.

मला आतापर्यंत आवडलेले एव्हरग्रीन भूत म्हणजे ड्रॅक्युला। अहाहा॥ काय ते सुळे..काय ते त्याचे पांढरे डोळे.काय त्याचे 'एकमेका सहाय्य करु,अवघे धरु सुपंथ' या उदात्त धोरणाने जास्तीत जास्त माणसांचे रक्त शोषून त्याना ड्रॅक्युला पंथाची दिक्षा देण्याचे सत्कार्य!! ड्रॅक्युला कल्पनेवर आधारीत कथा नारायण धारपानी लिहीली ती 'लुचाई'. तीही घाबरवण्याच्या चाचणीत १०० पैकी १०० मिळवून गेली. ड्रॅक्युला ने ड्रॅक्युला बनवलेले पूर्ण गाव, आणि शेवटी त्या गावात उरलेला एकटा नायक आणी एक लहान मुलगा, जे दिवसा गावाला आग लावून रात्र होण्याच्या आत तिथून बाहेर पडतात. तुम्हीपण अवश्य वाचा मिळाल्यास. नारायण धारपानी काही अप्रतिम भूतकथा दिल्या, पण हल्ली त्यांच्या कथा 'सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा संघर्ष' आणि 'समर्थानी ध्यान करुन दिव्य आत्म्याना आवाहन केले आणि त्या आत्म्यांनी दुष्ट शक्तींचा नायनाट केला' अशा सौम्य बनल्या आहेत. (नारायण धारपांच्या चाहत्यानी या वाक्यासाठी मला क्षमा करावी.) इथे आंग्ल ग्रंथालयात स्टिफन किंग चे 'पेट सिमेट्री' वाचले आणि मला शोध लागला कि आहट चा एक भाग 'कॉपी टू कॉपी माशी टू माशी' आहे त्या कथेचा. योगायोगाने एका रविवारी रात्री ११ वाजता झोप येत नाही म्हणून वेडे खोके लावले तर त्याच कथेचा चित्रपट लागला होता. मग काय...'रविवार रात्र' 'उद्या लवकर उठायचे आहे' 'रात्री भिती वाटल्यास इथे कोणी नाही' वगैरे सर्व विसरुन तो पूर्ण पाहीला. कथा 'माणसे जिवंत करण्याची शक्ती असलेल्या दफनभूमीवर' आधारीत. मग रात्री परत घाबरणे आणि गायत्रीमंत्र..

इथे आल्यावर एकदा अशीच फिरत फिरत(दिवसा) किरिस्ताव स्मशानभूमीत जाऊन आले 'कब्रस्तान' प्रत्यक्ष बघण्यासाठी। 'किरिस्ताव' भूत भेटले तरी मी हिंदू असल्याने ते माझ्यापेक्षा त्याच्या धर्माच्या आणि त्याची मातृभाषा कळणार्‍या माणसाला जास्त पसंत करेल हि माझी कल्पना. पण ते कब्रस्तान कमी आणि बाग जास्त वाटत होती. पेन्शनर जोडपी आणि तुरळक प्रेमीयुगुले तिथे फिरत होती. झाडे फुले नीट निगा राखून सुंदर ठेवली होती. पण सौंदर्य असले तरी तिथे खिन्नता होती एकप्रकारची.

ड्रॅक्युला हे किरीस्ताव भूत जबरदस्त असले तरी आपल्याकडची भूतेही कमी नाहीत। 'गिरा' हे समुद्रकिनार्‍यावरील भूत(गिर्‍याची शेंडी कापून कपाटात ठेवली कि तो ती परत मिळवण्यासाठी आपल्याला हवे ते देतो.),मुंजा,वेताळ,हडळ,ब्रम्हराक्षस इ.इ. आपल्याकडची भूतेही प्रसिद्ध आहेत.

No comments: