Tuesday, June 26, 2007

गोष्ट एका प्रेमाची............

रात्रीचे ९ वाजले तरी स्वाती अजून ऑफिसमध्येच होती. एक काम केव्हापासून संपवायचे होते पण कितीही प्रयत्न केले तरी तिला प्रोग्रॅममधल्या चुका मिळत नव्हत्या. बरं ती सीनियर म्हणून ही असली किचकट कामे तिच्याकडेच यायची. नेहमीप्रमाणे त्यांच्या मॅनेजरने तिला गोड बोलून ते काम करायला पटवलंच होतं. रिलीज कर म्हटलं प्रोजेक्टमधून की कसा टाळतो....च्यामारी... ! तिने त्याला शिव्या देत अजून एकदा घड्याळाकडे बघितलं आणि परत डोकं स्क्रीनमध्ये खुपसलं. पण सकाळी ९ वाजल्यापासून चाललेलं तिचं डोकं आता काही साथ देईना.शेवटचा उपाय म्हणून ती चहा घेऊन आली. आज तिला सगळ्य़ांच गोष्टींची चीड येत होती, त्यात असला पाणचट मशीनचा चहा. चहा घेऊन जागेवर परत येताना तिला त्यांच्या टीममधला नवीन मेंबर अजूनही जागेवर बसलेला दिसला. काहीतरी वाचत बसला होता. त्याने तिला स्माईल दिलं आणि परत वाचायला लागला, तिच्या ओठांवर मात्र हसू येणं अवघडच होतं.तिने मनातल्या मनात म्हटलंही, 'यालाच द्याना काम, अशीही त्याला उशीरापर्यंत बसायची हौस दिसतेय'.
ती खडाखडा काहीतरी टाईप करत असताना तिला मागून आवाज आला,"लाइन २२० मधला सिंटॅक्स चुकलाय"।


तिने दचकून मान वर करून पाहिलं, तोच तो नवीन पोरगा होता। त्याने अगदी आत्मविश्वासाने सांगितलं आणि काहीशा कुत्सितपणेही की 'असली फालतू चूक कळत नाही का' अशा आविर्भावाने. तिने पाहिलं तर खरंच २२० लाइनवर चूक होती. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही तिला आवडले नाहीत. 'तू बैस बारा तास काम करत म्हणजे कळेल डोक्याचा कसा भुगा होतो', असं मनातल्या मनात म्हणत तिने दुरुस्ती केली. मग त्याने तिची परवानगी घेऊन थोडेफार बदल करत प्रोग्रॅम चालू करून दिला. :-) चला कसं का होईना आपलं काम तर झालं ना म्हणून ती खूश झाली. तिने थॅंक्स म्हणण्यासाठी हात पुढे केला पण तिला त्याचं नावंच आठवेना......'हृषि'..... त्यानेच हसत सांगितलं. त्यानेच तिला विचारलं 'तुमचं जेवण नाही झालंय ना अजून?' मग ते दोघेही सोबतच खाली उतरले.जेवण झाल्यावर स्वातीला रिक्षा मिळेपर्यंत तो तिच्यासोबत चालतही राहिला. स्वातीला घरी परतताना जरासं बरं वाटलं.

महिन्याभरात बरेचदा असं झालं।स्वातीला उशीर झाला की हृषि यायचाच तिच्यासोबत बसायला, बोलायला, जेवण करून मग घरी सोडायला.ते दोघं वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहायचे, तासनतास. कधी गाण्य़ांबद्दल, कामाबद्दल, घरच्यांबद्दल.....कधी स्वाती त्याला कामाबद्दल सल्ले देत असे तर कधी तो तिला नवीन टेक्नॉलॉजीवर सांगायचा. तिला त्याच्या बोलण्यात एक उत्साह जाणवायचा आणि तितकाच त्याचा निरागसपणाही. त्याचं मनमोकळं हसणं तिला आठवतं राहायचं तो नसतानाही. त्याचबरोबर तिला तो जरा आकडूही वाटायचा तर कधी तो त्याच्या बालिशपणाच तर नाही ना असं वाटून ती सोडूनही द्यायची. एकूण काय, तर तिला तो एक मित्र म्हणून फारच जवळचा वाटू लागला होता.

एरवी मात्र त्यांचं फारसं बोलणं व्हायचं नाही. तो त्याच्या मित्रांसोबत तर ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत असायचे. कारणही तसंच होतं म्हणा. ती त्याच्याहून तीनेक वर्षांनी मोठी, त्यामुळे ती तिच्या आतापर्यंतच्या ग्रुपबरोबर तर तो त्याच्या.दुपारी आपापल्या ग्रुपमध्ये बसून जेवताना त्यांची नजरानजर मात्र व्हायची, तीच काय ती दिवसभराची त्यांची ओळख. तसा स्वातीच्या वाढदिवशी त्यांनी प्रयत्न केला होता तिच्या मित्र-मैत्रिणीत सामावण्याचा पण ते फारच विचित्र वाटत होतं. तो सर्वांसोवत बसल्यावर त्यांना जाणवलं की तो बाकी लोकांपेक्षा किती वेगळा आहे ते. पण माणूस एकदा प्रेमात पडायला लागला की नजर अजूनच भिरभिरी होते, एकमेकांचा शोध घ्यायला आतूर होते. मग नेहमीच्या वेळा सोडूनही ते भेटू लागले, कारणं काढून रात्री उशीरापर्यंत थांबू लागले.
स्वातीने नम्रताला, तिच्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं होतं त्याच्याबद्दल।स्वाती त्याच्याबद्दल बोलताना एकदम उत्साहात असायची. पण नम्रताने तिला बरेचदा त्यांच्या वयाबद्दल आठवण करून दिली होती. स्वातीला आधी जरा दु:ख व्हायचं, पुढे काय करावं याचा विचार करत बसायची. त्याच्यासोबत असताना मात्र ती हे सर्व विसरून जायची. नंतर नंतर तिने त्याबद्दल विचार करणंच सोडून दिलं होतं. कविता करणं, फुले देणं यासारख्या कॉलेजमधल्या प्रेमाच्या कौतुकाच्या गोष्टी तो तिच्यासाठी करताना पाहून तिला हसू यायचं, तसंच त्याच्याबद्दल प्रेमही वाटायचं. तिला सगळ्यात जास्त हसू यायचं ते त्याच्या एका गोष्टीवर. स्वाती तशी खूप वर्षे बाहेर राहिलेली त्यामुळे बरीच धीट झालेली होती. त्याला मात्र तिला प्रत्येक ठिकाणी जपायचं असायचं. एकदा दोनदा तिने प्रयत्न केला समजावण्य़ाचा, तेव्हा त्याचा हिरमुसला चेहरा पाहून पुढे तिने ते बोलणं टाळलेलंच.


त्यांचं प्रेम असं फुलताना २-३ महीने उलटले असतील। लोकांनीही आता त्यांच्याबद्दल बोलणं सोडून दिलं होतं. त्यांना काय बातमी जुनी झाली की नवीन बातमीच्या शोधात. असो. एकदा स्वाती सकाळी आली तशी गप्प गप्पच होती. तिच्या मैत्रिणीने विचारलेही की काय झाले म्हणून, पण स्वातीला माहीत होतं की तिने काही सांगितलं तर नेहमीप्रमाणे भाषण ऎकून घ्यावे लागेल. आज सकाळपासून हृषिही कुठे दिसला नव्हता. दुपारपर्यंत तिने प्रयत्न केला न बोलण्याचा, अगदीच राहवेना तेव्हा स्वातीने नम्रताकडे विषय काढला. "काल असंच माझं आणि हृषिचं बोलणं चाललं होतं पैशांच्या गुंतवणुकीबद्दल. बरेच दिवस झाले मी काही पैसे गुंतवायचा विचार करतेय. म्हटलं नक्की करायच्या त्याच्याशी बोलून घ्यावं. मी काही बोलायला लागले तर तो 'तुला काय कळतंय' असं काहीसं म्हणाला. मग मी ही चिडले आणि म्हटलं की याआधी माझं मीच करत होते सर्व ना? मुलगी असले म्हणून काय झालं मलाही वाचता येतं, विचार करता येतो आणि निर्णय घेता येतो. मग काय साहेबांना आला राग. हा मोठ्ठा फुगा फुगलाय. रात्रीपासून फोनच नाही उचलला. म्हटलं सकाळी भेटून निवांत बोलता येईल, तर आलाच नाहीये आज. मला उगाचच त्याच्यावर चिडले असं वाटतंय म्हणून सकाळपासून अस्वस्थ होते".

एव्हढं सगळं बोलल्यावर काय नम्रताने नेहमीचा पावित्रा घेतला. "हे बघ स्वाती आता मी बोलले की तुला राग येतो नाहीतर मग तू लक्षंच देत नाहीस. अगं तुमच्या दोघांत हे वयाचं अंतर आहे म्हणून तर होतं हे सर्व. आता बघ, पूर्वीपासून मुलींचं लग्न त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलाशी करतात याचं काहीतरी कारण असेल ना.आता तो तुझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे तुझा अनुभव त्याच्यापेक्षा जास्त आहे तसेच तुझ्यात जास्त प्रगल्भताही आहे. याच जागी कुणी तुझ्याहून मोठा मुलगा असता तर कदाचित तू त्याचं ऎकलंही असतंस कारण त्याचा अनुभव तुझ्यापेक्षा जास्त असता आणि मग तुमचे वादही कमी झाले असते. मुख्य म्हणजे नवरा हा मोठा असल्यावर जसा त्याचा मान असतो तसा लहान असल्यावर राहील का? तसं पाहिलं तर मला हृषि अजूनही बालिश वाटतो. त्याचं वागणं,बोलणं,सर्वच. म्हणतात ना मुलगी ही वेलीसारखी असते, तिला एका भरभक्कम झाडाचा, खांद्याचाच आधार हवा आयुष्य काढायला. बघ अजूनही विचार कर. ही तर सुरुवात आहे, नंतर तुम्हालाच त्रास होईल".
कधी ना कधी बोलणं गरजेचं होतं त्यामुळे स्वातीने आज नम्रताला समजावलं," मला मान्य आहे गं की तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण किती थोडासाच ना? आज २४ चा आहे कधी ना कधी तरी तो ३० चा होईलच ना? कधी ना कधी त्यालाही असेच अनुभव येतंच राहतील ना, तो ही हळूहळू शिकेल ना सर्व आपल्यासारखंच? आयुष्यभर तरी तो लहान राहणार नाहीये ना? अगं मी माझ्या बाबांनाही विक्षिप्त वागलेलं पाहिलंय, एकेकाचा स्वभावधर्मच तो, कोण बदलणार तो? आता बाकी लोकांची जी लग्न होतात त्यांत काय भांडणं होत नाहीत? महत्चाचं काय असतं शेवटी, एकमेकांवरचं प्रेम आणि त्यातून एकमेकांना समजून घेण्याची इच्छा।जर तुम्हाला एकमेकांबद्दल, आपल्या मतांबद्दल, भावनांबद्दल आदर असेल तर मानापमानाचा मुद्दा येतोच कुठे. नवऱ्याच्या पाया पडलं म्हणून त्याला मान दिला एव्हढीच का व्याख्या त्याची? मला नाही वाटत असं. आणि समज तरीही तो माझ्याहून लहान राहिला आयुष्यभर तरी मी त्याचं झाड व्हायला तयार आहे. आहे तशी खंबीर मी. आता एव्हढं तर तू तुझ्या मैत्रिणीला ओळखतेस ना? मग?" नम्रता नुसतीच हसली.


"बाकी राहता राहिली त्या गुंतवणुकीची गोष्ट. अगं हे पुरुष सगळे असेच आखडू तसेच काहीसे निरागसही. त्यांना वाटतं पैशाच्या व्यवहारात सगळं त्यांनाच कळतं. हे कळत नाही की वर्षानुवर्षे मिळेल त्या पैशात घर चालवण्याचं काम स्त्रीच करते. त्यांना जरासं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की आपलं काम झालं. किती मोठा असो की लहान, जरा भाव दिला की लहान मुलासारखे खूश होतात.मला तरी त्यात काही मोठा प्रॉब्लेम वाटत नाहीये. आज बघ तो आल्यावर. ":-)
दुपारी उशीरा आल्यावर रागारागाने काम करणाऱ्या हृषिला स्वातीने कसं पटवलं हे सांगायला नकॊ. स्वातीने गुंतवणूक, शेअर मार्केट यातलं आपलं अज्ञान पाजळलं होतं आणि माफीही मागितली होती. तो आज तिच्यासोबत बॅंकेत जाणार होता, तिची मदत करायला.

No comments: