Wednesday, June 20, 2007

अरसिक किती हा...

अरसिकाशी गाठ नको रे बाप्पा!
हे लोक रंगाचा बेरंग करतात। कदाचित नकळत असेल, पण करतात खरे. ’छावा’ या नाटकाचा ठाण्यातला पहिला आणि एकुणं दुसरा प्रयोग; पहिला आदल्याच दिवशी रवींद्र ला झाला होता. रांगेत उभे राहून, ओळख काढून मोक्याच्या जागेची तिकिटे मिळवली होती. नाटक सुरू झाले. मराठ्यांचा युवराज मुघल आणि स्वकीय या दोहोंचा पाठलाग चुकवीत परागंदा झालाय आणि तो आपल्या महाराणीला जंगलातील एका मंदिरात भेटतोय असा प्रसंग होता. महाराणींनी प्रवेश केला मात्र, आमच्या पुढील रांगेतून कुजबुज सुरू झाली - "अय्या! अग स्मिता तळवलकरची नारायण पेठ बघ काय सुंदर आहे ना?". "हो ना!अग नाटक नवीनच आहे ना, सगळे कपडे कोरे करकरीत असतील." "बरी मिळाली हो, मी मागे किती शोधली पण हा रंग मिळालाच नाही कुठे". " हात्तिच्या! इतका काही दुर्मिळ नाहीये काही हा रंग, आता दोन महिन्यापूर्वी माझ्या जावेने अगदी अश्शीच घेतलीन मुलाच्या मुंजीत" "तुझी जाऊ काय बाई रोज सुद्धा घेईल; दीर जकात विभागात आहेत ना!" आता इथे पुलंची आठवण होणे अपरिहार्यच होते! पु. ल. असते तर त्यांनी लिहिले असते की ’हे ऐकल्यावर मराठ्यांचा राजा आपल्या हाताने साखळदंडात स्वतः:ला जखडून औरंगजेबासमोर हजर झाला असता’. तसं म्हटलं तर यांना अरसिक तरी कसे म्हणावे? साडी पाहताच इतका तपशील आठवला ही रसिकताच नाही का? मग अस्थायी असली तर काय झाले?
माझा एक बालमित्र आहे। काहींबद्दल असे म्हणतात की लेकाचे हवेत उडत असतात, यांचे पाय जमिनीला लागतच नाहीत. हा प्राणी त्याच्या नेमक्या विरुद्ध प्रकारात मोडणारा. याचे पाय काय वाटेल ते होवो, जमीन सोडणार नाहीतच पण चुकून कुणी हवेत तरंगायला लागलाच तर त्याचे विमान हा हमखास जमिनीवर आदळणार. एकदा आम्ही शनिवारी रात्री छानपैकी तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो, सात आठ जण होतो. शिक्षण संपवून नुकतेच सगळे नोकरीला लागलेले, लग्न वगैरे अजून कुणाचेच झालेले नव्हते. असाच विषय निघाला आणि प्रत्येकजण आपापले स्वप्न वा सुखाच्या कल्पना सांगू लागला. आमचा एक स्वप्नाळू मित्र म्हणाला, ’एक छोटंसं स्वप्न आहे. तळ्यावर एक छोटासाच पण स्वतःचा बंगला असावा. अशी मस्त पैकी गच्चीत मित्रांची मैफल जमावी, आजूबाजूला बगीचा असावा, गच्चीत रातराणी दरवळत असावी... ’नको रे, गच्चीत झाडं नकोत! फार डास येतात झाडं असली की’ - आमचे ’जमीनदोस्त’ बोललेच!. सांगणारा असा काही उखडलाय; म्हणाला, स्वप्नांत कसले आलेत रे डास? ग, म, भ च्या बाराखडीतले लडिवाळ शब्द ऐकून बावरलेला तो सद्गृहस्थ निरागसपणे म्हणाला, ’तस नाही रे पण आपलं सांगितलं. खरोखर सांगतो, डास चावायला लागले तर मग काही मजा नाही रे, उठायला लागेल ना गप्पा सोडून’.
हा मनुष्य एरवी अतिशय सज्जन, स्वभावाने गरीब, पण नको तेव्हा नको ते बोलणे हे याचे ब्रीदवाक्य! चार लोक कौतुकाने पाहत असलेल्या, ऐकत असलेल्या वा बोलत असलेल्या संभाषणात हा अचानक असे काहीतरी भुईसपाट करणारे वाक्य बोलायचा की रंगाचा बेरंग झालाच पाहिजे। आणि पुन्हा याला आपण असे काही अक्षम्य वर्तने केले आहे मान्यच नसायचे, ’मी आपलं सांगीतलं’ हे त्याच पालुपद असायचंच. एकदा तर याने कहर केला. घरी कुणी नव्हते, गप्पा मारत जेवू म्हणत चार मित्र जमवले. हे महाशय आमचे परममित्र, हे पाहिजेतच. काही पदार्थ मंडळी घेऊन येणार होती, काही मी केले होते, भात लावला होता. नुसती वाट पाहायची तर एकीकडे मधुबालाची तबकडी चढवली. गाणी पाहत असतानाच मंडळी आली. ’अरे वा! मधुबाला! वावावा...’ मंडळींची खुशी चेहऱ्यावरून ओसंडली. काय घाई आहे जेवायची? जरा मधुबाला बघू चार घटका म्हणत सगळे आसनस्थ झाले. इकडे ’गुजरा हुआ जमाना’ लागले, ’ह्म्म्म’ असा सुस्कारा सोडत आम्ही व्याकुळ चेहऱ्याची मधुबाला पाहत असतानाच आमच्या मित्राने त्याचे मौलिक विचार प्रकट केले: ’देवानं उंट हा प्राणी किती कुरूप निर्माण केला आहे ना?’. इथे आमचे शब्दच संपले! ज्याला पडद्यावर मधुबाला असतानाही तिच्या आजूबाजूचे उंट दिसू शकतात त्या महापुरुषाविषयी काय बोलणार?
हे झाले लौकिकार्थाने अरसिक समजले गेलेले। पण ’दुसऱ्या’ प्रकारच्या अरसिकांचे म्हणजेच ’अतिरसिकांचे’ काय? हे पहिल्या प्रकारातले परवडले पण हे दुसरे शहाणे नकोत! आता कल्पना करा, गाडीने निघाला आहात. आजूबाजूला नेहमीचे वाहतुकीचे कडबोळे आहे, रस्त्यात खड्डे आहेत, बेदरकारपणे मालमोटारी उजवी बाजू हट्टाने लढवत आहेत. या सर्वाकडे शक्यतो दुर्लक्ष करून आपले डोके शांत राखण्यासाठी आपण गाणी ऐकत आहोत, मदन मोहन ची ध्वनिफीत वाजते आहे, आपण ’किसी की याद मे दुनिया को है भुलाये हुए’ च्या तालावर डोलत आजूबाजूचे जग विसरू पाहतोय आणि...... आणि शेजारी बसलेला रफीच्या सुरांना बेसूर करत आपले तोंड उघडतो " हा अमुक राग बरं! काय चीज आहे. अरे काय सांगू दोस्ता या रागाची गोडी........" इकडे माझ्या जीवाचा संताप होतोय. हे सद्गृहस्था, मी अडाणी तर अडाणी, पण काहीतरी कानावर पडतंय, बरं वाटतंय म्हणून ऐकतोय, जरा आजूबाजूचा कोलाहल विसरतोय तर हे डोस कशाला रे? कुठलाका असेना राग! आता हा राग कोणता, त्याची लक्षणे काय, त्यात काय वर्ज्य वगैरे वगैरेशी मला काय देणे घेणे आहे? अहो, एखादी रमणी तुमच्या कडे पाहून एखादे स्मित देते आहे, तुम्ही ’कलिजा खलास झाला’ वगैरे अवस्थेत जाऊ घातलाय आणि अशा वेळी जर तुमच्या बरोबरचा सांगायला लागला, ’अरे हसणं म्हणजे काय वाटलं लेका? जबड्याच्या एकंदरीत एकशे बहात्तर स्नायूंचे आकुंचन प्रसरण व्हावे लागते त्यासाठी" तुम्हीच सांगा तुमची काय स्थिती होईल? हे लोक आपले ज्ञान नको तिथे नको तेव्हा का दाखवतात?
मी एक पथ्य पाळून असतो। मी गाण्याच्या कार्यक्रमाला कुठल्याही जाणकारा बरोबर जात नाही. चित्रपट पाहायला इसाक मुजावर, शिरीष कणेकर वा राजु भारतनचा गृहपाठ करून आलेल्यांबरोबर कदापि जात नाही. काव्यवाचनाला कधी कवी वा समीक्षकाबरोबर जात नाही, कपडे घ्यायला पत्नीबरोबर जात नाही, जेवायला शिस्तीच्या माणसाबरोबर जात नाही. अगदी मौसम मधल्या कजलीच्या शब्दांत सांगायचं तर ’इज्जत वाल्यांमध्ये उगाच आपली मात्र बेइज्जती होते’. सिनेमाचार्यांबरोबर चित्रपट पाहायचा म्हणजे कठीण. इकडे ’दो घडी वोह जो’ चालू झालं की तिकडे हे ज्ञानी पुरूष आपला कान कुरतडायला सुरुवात करतात - तुला ह्या गाण्याचा किस्सा माहीत आहे काय? राजेंद्र कृष्ण एकदा बसमधून चालला होता. बस वरळी च्या समुद्राच्या काठाने जात होती आणि अचानक या पट्ठ्याला शब्द सुचले. बरं लिहायचं म्हटलं तर जवळ वही वगैरे काही नाही. मग याने बस च्या तिकिटावर गाणं लिहून काढलं, अस काही गाजलंय यार...’जणू काही ते गाणं तिकिटावर लिहिल्यामुळेच गाजलेलं असतं आणि हा इतिहास माहीत असल्याखेरीज त्या गाण्याचा अर्थ समजणार नसतो! पण या रसिकांचे रसग्रहण इतके आकंठ झालेले असते की कधी कोण सापडतोय आणि कधी मी माझ्या रसाची पिंक टाकतोय. चित्रपट पंडितांबरोबर चित्रपट पाहण्यातला आणखी एक धोका म्हणजे हे लोक बहुधा तो चित्रपट अगोदरच पाहून, त्याचे परीक्षण वगैरे वाचून कोळून प्यायलेले असतात. यांच्या तावडीत सापडलात तर अख्खा चित्रपट काळाच्या पुढे जाऊन पाहावा लागतो. म्हणजे आता काय संवाद आहे किंवा कोणते गाणे आहे हे सगळे ते आपल्याला आगाऊ सुनावतात. वर हाच प्रसंग दुसऱ्या चित्रपटात त्या अमक्या दिग्दर्शकाने कसा सोनं करून दाखवला हेही अधिकारवाणीने ऐकवतात; तेही भर चित्रपट गृहात, आपण पैसे मोजून चित्रपट प्रथमच पाहत असताना. यांच्या पेक्षा मुले बरी, हातात लाह्यांचा पुडा वा वेफर दिले की आवाज बंद.
एखाद्याला एखादा छंद असणे, एखाद्या गोष्टीतले ज्ञान असणे, एखाद्या कलेची आवड असणे हे उत्तमच, पण ते काळवेळ न बघता दुसऱ्यावर थापणे मात्र वाईट। आमरस सर्वांनाच आवडतो, पण तो वाडग्यात घालून गरमा गरम पुऱ्यांबरोबर दिला तर. एखाद्याच्या डोक्यावर वाडगाभर रस ओतला तर तो तुमचे कौतुक कितपत करू शकेल? गुलाबाचे फूल सुंदर असते, पण ते बगिच्यात वा काटे काढून प्रेमाने हातात दिले तर, जर भस्सकन अंगावर फेकले तर ते कुणाला आवडेल? आपली कला, आपले ज्ञान सादर करायचे आहे ना? मग एक छानसा कार्यक्रम आयोजित करा, आम्हीही सहभागी होऊ, तुमचे कौतुक करू, तुमच्या कलेचा आस्वाद घेऊ, पण असे खिंडीत गाठून पकवू नका! यांत तुमचा अपेक्षाभंग आणि आमचा रसभंग. पण नाही, असे करतील तर ते अतिरसिक कसले? म्हणजे अरसिक हा कोरडा दुष्काळ तर हे अतिरसिक म्हणजे ओला दुष्काळ, मधल्या मध्ये आमचे मात्र हाल.
म्हणूनच म्हणावेसे वाटते, अरसिकांशी गाठ नको रे बाप्पा.

No comments: