सुट्टी!!
लहानपणीपासून आतापर्यंत केवढया सुट्ट्या आल्या आणि संपल्या पण मला आठवते ते म्हणजे सुट्ट्यांचे 'प्लॅनिंग'। अचाट, अफाट, सुसाट अशा शेकडो टकारांती योजना आम्ही बनवत राहिलो आणि मी तरी अजूनही बनवत आहे. आजच्या पिढीला आधी हे सांगायला हवे की सुट्टीचे प्लान म्हणजे चित्रकलेचा वर्ग, कराटेचा वर्ग, व्यायामाचा वर्ग आणि वर्गमुळात काही नाही असा नसायचा. आणि हापूसच्या आंब्याला लाजवेल एवढ्या चवीने हा चाखला जायचा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अभ्यासाची बोंब लागली आहे, सर्वविषय-वासनांचा वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याग झालेला आहे, कोणते धडे यावेळी मानगुटीवर बसले आहेत हे शोधण्याची धडपड चालू आहे अशी परिस्थिती. नापासांची चिंता करणार्या चाटेंचे दर्शन घ्यावे लागण्याइतपत वाईट अवस्था नसली तरी वर्गातली थोडी अब्रू जपणे तर भाग होतेच. आता टवाळक्या पुरे, आता फक्त अभ्यास. अर्जुनाच्या एकाग्रतेने मी पोपटरूपी अभ्यासावर नेम धरायचो. अभ्यास एके अभ्यास. माझ्या त्या एकाग्रतेने आणि निष्ठेने इंद्रालाही आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटायचे बहुदा. आणि लगेच 'सुट्टी' नामक अप्सरेची माझ्या बालमनाला भुरळ घालण्याच्या कामी नियुक्ती व्हायची. घरात, रस्त्यात, शाळेत, मैदानात कुठेही ही अप्सरा प्रकटायची आणि आईचा राग, रस्त्यातला खड्डा, सरांचा खडू किंवा एखादे जोरदार "आऊट" तिला बाद करेपर्यंत ती पिच्छा पुरवायची.
मनाला भुलवणारे सुट्टी रंग तरी किती वेगवेगळे। कधी आई, बाबा, तहान, भूक इ.इ. सगळे थोपवून अख्खा दिवस खेळायला मोकळा. त्यात पूर्णवेळ माझी बॅटिंग चालू आहे. मी तडातड फटके मारतोय आणि सीमापार गेलेला चेंडू इतर मुले विनातक्रार आणताहेत. इमारतींच्या काचा चेंडूप्रूफ झाल्यात आणि खालच्या मजल्यावरचे वसकणारे पिल्ले अंकल आंटी आमचे जप्त केलेले सगळे चेंडू परत करून कौतुकाने खेळ बघताहेत. वा वा वा! किती मजा. कधी समोरच्याला संधी न देता कॅरमच्या सगळ्या सोंगट्या मी घालवतोय तर कधी पतंगाने वटवाघुळांना पळवतोय. हे जरा विचित्र वाटतेय ना पण लहानपणी माझ्या सुट्टीच्या प्लान मधे ही एक अजब गोष्ट नेहमी असायची. त्याचे असे होते की आमच्या इमारतीवरून रोज मावळतीनंतर संधिप्रकाशात वटवाघुळांचा मोठा थवा (?) पश्चिमेकडून पूर्वेकडे उडत जायचा. पतंगाने वटवाघुळांना भिववायचा मी बराच प्रयत्न करायचो पण हे बेटे कधी घाबरतील तर शप्पथ. दिवस मावळल्यावर वारे पण पडायचे आणि पतंगही त्यामुळेही बेत फसायचा. याशिवाय विज्ञानाचा अभ्यास करताना आमच्या बालवैज्ञानिकामधला बाल झोपायचा आणि वैज्ञानिक एडिसनने लावले नसतील एवढे दिवे लावायचा.
सुट्टीचे प्लानिंग असे झोपेत जागेपणी उठता बसता चालायचे। शहाण्या मुलासारखा रोज लवकर उठून व्यायाम करायचा असे संकल्पही व्हायचे. रात्र थोडी सोंगे फार अशी प्लानिंगची गत होते ना होते तोच परीक्षांचा दिवस उजाडायचा. घोडा मैदान दिसताच सुट्टी आमची रजा घ्यायची. अभ्यासाची अन् परीक्षांची रणधुमाळी चालू झाली की तहान भूक हरपून मी युद्ध करायचो. भरपूर वेळ असला तर खुलेआम मैदानात नाहीतर हा प्रश्न ऑप्शनला टाक, तो धडा गाइड मधून वाच असा गनिमी कावा वापरायचा. भवानीमातेच्या आशीर्वादाने कधी तोंडघशी पडू दिले नाही. पुन्हा एखाद्या आठवड्यात एवढा अभ्यास केल्यावर एकदम ज्ञानी झाल्याचा साक्षात्कार व्हायचा आणि पेपर चांगला गेल्यावर विषय आवडू बिवडू लागायचा. घरी पण जरा जास्तच लाड चालू असायचे परीक्षेच्या काळात. कधी नव्हे ते बाळ अभ्यास करतोय तर जेवण खाण एकदम बसल्या जागी, अभ्यासाच्या खोलीच्या आजूबाजूला खास शांतता. वा वा...! अशा प्रकारे परीक्षा संपत आली की अभ्यासाबद्दलचे प्रेम भलतेच जागृत व्हायचे. आणि एके दिवशी परीक्षा संपायची.
आजवर मला कधीही कळले नाहीये का पण आजवर परीक्षेच्या नादात सुट्टीचे प्लानिंग पार धुऊन निघालेय। हम ये करेंगे वो करेंगे म्हणणारे नेते कसे निवडून आले की सुस्तावतात तसे परीक्षा झाल्यावर व्हायचे. भरपूर झोपण्याचा पहिला प्लान पहिल्याच दिवशी मोडीत निघायचा. गजर वाजण्याआधीच जाग. दर परीक्षेनंतर त्या परीक्षेचे सामान आवरणार्या आईने शेवटच्या परीक्षेचा ढीग आमच्यावर सोपवलेला. कालपर्यंत आवडणार्या अभ्यासाचे आज दर्शनही नकोसे होत असताना त्या ढिगाकडे ढुंकूनही पाहणे नकोसे झालेले असायचे तेव्हा तो आवरणे हे अगदीच अप्रिय होऊन जायचे. गावी जाणे हा एकमेव प्लान तिकिटे काढून झाल्याने निश्चित असायचा पण त्यालाही पुष्कळ अवकाश असायचा.
एकूण काय तर पहिलाच दिवस अगदी डब्बा व्हायचा आणि सुट्टीपेक्षा प्लानिंगच बरे असे म्हणावे वाटायचे.
No comments:
Post a Comment