घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
घराभोवती सुरेख अंगण,
अंगणात त्या वृक्ष मनोहर।
पक्षी कूजने हर्षे परिसर,
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
अंगणात ही तुळस मंजिरी,
पाविझयाचे जणू प्रतीकही।
आशीर्वादे देई अभयकर
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
पारिजात मोगरा अबोली
जास्वंदी ही इथेच फ़ुलली
जाईजुईचा बहर सुखकर।
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
आम्रवृक्ष तो उभा निरंतर,
पक्षी विसावा घेती त्यावर।
कोकिळकूजन चाले सुस्वर,
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर अणि मनोहर।
सखे सोबती साद घालती,
स्नेहाची ही दृढ ती नाती।
कालचक्र परी फ़िरते झरझर,
घर ते होते असेच सुंदर,
अतिव सुंदर आणि मनोहर।
दिवेलागणी होती मग ती,
गोष्टी पाढे पावकी निमकी।
पंचपदी चे सूर शुभंकर,
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर अणि मनोहर।
आजी आजोबा प्रेमळ मूर्ती,
संस्कारे ती आम्हा घडविती।
ममतेची ही त्याला झालर
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
भांडण तंटण रुसवे फ़ुगवे,
एक्य होते त्याही मध्ये
प्रेमाची मग लाभे फ़ुंकर
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
ती वास्तू ती खिडक्या दारे
साद घालती लवकर या रे,
फ़िरुन वाटे जावे सत्त्वर।
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
ध्येय मंदिरी मार्ग चालता,
नवी क्षितीजे नवीन वाटा,
सौख्याचा परी इथेच अंकुर।
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर.
No comments:
Post a Comment